#महाशिवरात्र
माघ महिन्यातील कृ चतुर्दशीला 'महाशिवरात्र' असते. तसतर प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्र असतेच पण माघ कृष्ण चतुर्दशीला 'महाशिवरात्र' असे म्हणतात. या दिवशी सर्वजण भगवान शंकराची आराधना, प्रार्थना आणि पुजा करतात. उपवास करतात. कधीही कोणतेही उपास न पाळणारे लोकं सुध्दा आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्यांना तसेच महाशिवरात्रीला उपवास हमखास करत असतात.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विशेष यात्रा भरत असतात, तसेच भारतभर जवळपास सर्वच गावागावांत शिवमंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊन 'ॐ नमं शिवाय' चा गजर करतात.
पुराणांमध्ये अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराणांमध्ये या महाशिवरात्रीचे महत्व वर्णन केलेले आहे. 'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली ती याच तिथीला मध्यरात्री म्हणुनच या दिवशी भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण करून तांडव नृत्य केले, अशी एक आख्यायिका आहे. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.
‘शिवलिलामृत’ मध्ये एक रंजक कथा आहे ती अशी : असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा, पण, दिवस गेला-संध्याकाळ झाली, तिन्ही सांजा होऊ लागली, सूर्य अस्ताला गेला, तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन् शिकार मिळाली नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या! तू शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार.
खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे पण सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.” हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली.
आता रात्र कशी काढायची या विचारात तो झाडावरच बसुन राहीला. तोच दूरवरच्या मंदिरातून त्याला घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय ऐकु येऊ लागले. नकळत नाममंत्राची त्या पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी बेलाच्या वृक्षाखाली असलेल्या शिवपिंडीवर पडत होती. त्याच्या नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.
तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय.! मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “नाही, मला मारा, ते माझे पती आहेत. त्यांच्या आधी मला मारा. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली "त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे."
एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये.? मी त्यांची शिकार करून पापाचा धनी का होऊ.? पारध्यानं सर्वांनाच जीवनदान दिले.
यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना आशिर्वाद देऊन उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याध नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तोही दिवस होता महाशिवरात्रीचाच.
#आपले_सण_आपले_उत्सव
#ॐनमःशिवाय
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग
श्री कपालेश्वर महादेव
No comments:
Post a Comment