Thursday, 23 July 2026

नाशिक गोदावरीला महापूर.

दुतोंड्या मारुती संपूर्ण पाण्याखाली.

नारोशंकराच्या घंटेला पाणी लागणार का?



नाशिक पुर

नाशिकमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच गंगापूर धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. गोदा घाट परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.


वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने तातडीने हटवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी नदीपात्र, घाट परिसर आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.




Wednesday, 22 July 2026

गोदावरीच्या पात्रातील गंगास्नानाचे दुर्मिळ छायाचित्र

 इ.स. १८७० च्या सुमारास ब्रिटिश छायाचित्रकाराने काढलेले गोदावरीच्या पात्रातील गंगास्नानाचे दुर्मिळ छायाचित्र

 



गोदावरीच्या पात्रात सुरू असलेले गंगास्नान, घाटांवर धार्मिक विधी, दूरवर दिसणारी मंदिरे आणि पंचवटीचे शांत वातावरण...

कौलारीं घरांनी व्यापलेली जुन्या नाशिकची स्काय लाईन...

गंगा स्नानासाठी जमा झालेली इतकी गर्दी पाहता, नक्की हे छायाचित्र काढले तो दिवस एखाद्या सण-उत्सवाचा दिवस असावा.

हे दुर्मिळ छायाचित्र नाशिकच्या रामकुंडावरील त्या काळातील दैनंदिन जीवनाचे जिवंत दर्शन घडवते. गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करणारे भाविक, घाटांवर सुरू असलेले धार्मिक विधी, मंदिरांच्या साक्षीने वाहणारी गंगा आणि आध्यात्मिक वातावरणाने भारलेली पंचवटी. या दुर्मिळ छायाचित्रात दिसणारा प्रत्येक व्यक्ती श्रद्धेने गोदावरीत स्नान करत आहे. त्यांच्यासाठी ही नदी केवळ जलप्रवाह नव्हती, तर मोक्ष, शुद्धी आणि अध्यात्माचा मार्ग होती.


हे केवळ गोदा घाटावरील स्नानाचे छायाचित्र नाही, तर नाशिकच्या जीवनसंस्कृतीचे जिवंत चित्र आहे. त्या काळी रामकुंड हे केवळ तीर्थक्षेत्र नव्हते, तर नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे स्पंदन होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले यात्रेकरू येथे स्नान करून पुण्यप्राप्तीची भावना मनात घेऊन परतत असत.


आजही तीच श्रद्धा, तोच विश्वास आणि तीच परंपरा अखंड सुरू आहे.


"काळ बदलला... पिढ्या बदलल्या... पण गोदावरीच्या पवित्र जलाशी नाशिकचे नाते आजही तेवढेच अढळ आहे."


याच घाटांवरून नाशिकची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा शतकानुशतके अखंडपणे वाहत आली आहे.


#नाशिकप्रतिबिंब #रामकुंड #गोदावरी #जुनेनाशिक #HistoryOfNashik #VintageNashik #Panchavati #Heritage #गंगास्नान








Monday, 13 July 2026

"Bazaar Day on the River Godawari, Nasik" – इ.स. १८९० गोदावरीच्या तीरावर भरलेला नाशिकचा बाजार – सुमारे इ.स. १८९०


गोदावरीच्या तीरावर भरलेला नाशिकचा बाजार – सुमारे इ.स. १८९०






हे दुर्मिळ ऐतिहासिक छायाचित्र आहे इ.स. १८९० च्या सुमारास गोदावरी नदीकाठी भरणाऱ्या नाशिकच्या बुधवारच्या बाजार दिवसाचे. 


आज जिथे भाविकांची गर्दी आणि आधुनिक घाट दिसतात, त्याच गोदावरीच्या काठावर सुमारे १३५ वर्षांपूर्वी अशी गजबजलेली बाजारपेठ भरत असे.


घाटावर व्यापारी, शेतकरी, भाविक, होड्या, बैलगाड्या आणि दैनंदिन व्यवहारांची लगबग... या एका छायाचित्रात त्या काळातील नाशिकचे सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी जीवन जिवंत झाले आहे.


डावीकडे उभा असलेला यशवंतराव महाराज मंदिराचा कळस, मध्यभागी घाटावरील वर्दळ आणि शांतपणे वाहणारी गोदावरी – हे दृश्य त्या काळच्या नाशिकच्या समृद्ध परंपरेची साक्ष देते.


हे केवळ छायाचित्र नाही, तर जुन्या नाशिकच्या जीवनशैलीचे, संस्कृतीचे आणि व्यापारवैभवाचे जतन केलेले ऐतिहासिक दस्तऐवज आहे. 




#नाशिकप्रतिबिंब #जुनेनाशिक #गोदावरी #पंचवटी #नाशिकइतिहास #VintageNashik #OldNashik #Heritage #HistoryOfNashik

Friday, 10 July 2026

नाशिकचे नारोशंकर मंदिर व्हिडिओ.

 नाशिकचे नारोशंकर मंदिर इसवी सन १८५० मध्ये कसे दिसत असेल याची कल्पना करणारा हा व्हिडिओ.





हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला काॅमेंट मध्ये नक्की सांगा.

Thursday, 2 July 2026

सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन १८७५–१८७८च्या दरम्यान)

📜 ऐतिहासिक छायाचित्र : सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन  १८७५–१८७८च्या दरम्यान)





एका अज्ञात छायाचित्रकाराने काढलेले हे दुर्मीळ छायाचित्र इ.स. १८७५ ते १८७८ च्या दरम्यानचे मानले जाते. यात नाशिकच्या पंचवटीतील सुंदर नारायण मंदिर आणि मंदिरासमोरील गोदावरी नदीकडे उतरणाऱ्या दगडी पायऱ्या (घाट) स्पष्टपणे दिसतात. त्या काळातील नाशिकचे धार्मिक, सामाजिक आणि स्थापत्य वैभव या एका छायाचित्रातून अनुभवता येते.


छायाचित्राच्या मध्यभागी उभे असलेले सुंदर नारायण मंदिर हे नाशिकमधील अत्यंत सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. पेशवेकालीन स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर भगवान विष्णूच्या सुंदर नारायण स्वरूपाला समर्पित आहे. मंदिरावरील नक्षीकाम, कमानी आणि शिखर त्या काळातील उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देतात.


मंदिरासमोरील विस्तीर्ण दगडी घाट त्या काळी गोदावरीत स्नान, धार्मिक विधी, संध्यावंदन आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होते. छायाचित्रात घाटावर बसलेले साधू, स्नान करणारे भाविक आणि स्थानिक नागरिक दिसतात. त्यामुळे त्या काळातील नाशिकचे सामाजिक जीवनही जिवंतपणे समोर येते.


विशेष म्हणजे त्या वेळी नदीकाठावरील परिसरात मोठमोठी वड आणि पिंपळाची वृक्षराजी, मातीची व दगडी घरे आणि अत्यंत नैसर्गिक वातावरण होते. आजच्या शहरीकरणापूर्वीचे पंचवटीचे शांत, हिरवेगार आणि आध्यात्मिक स्वरूप या छायाचित्रातून स्पष्ट जाणवते.


हे छायाचित्र केवळ एका मंदिराचे अथवा परिसराचे नसून, दीडशे वर्षांपूर्वीच्या नाशिकच्या सांस्कृतिक वारशाची आणि गोदावरी तीरावरील जीवनशैलीची अमूल्य ऐतिहासिक नोंद आहे. इतिहासप्रेमी, संशोधक आणि नाशिककरांसाठी हा एक अनमोलठेवा आणि  महत्वाचा दस्तऐवज आहे.

Wednesday, 1 July 2026

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणातील अमृतकुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंगाचे दुर्मिळ दर्शन.





त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अमृतकुंडाची साफसफाई सध्या सुरू असून, कुंडातील पाणी काढण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच दर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे.

या कुंडाच्या तळाशी एके खड्ड्यात भगवान महादेवांची पिंड असून त्यावर कायमस्वरूपी पाणी साचलेले असते. ब्रह्मगिरी पर्वतावरील पंचलिंग डोंगरातून येणारे पाणी या कुंडात येते आणि हे पाणी आजवर कधीही पूर्णपणे आटले नसल्याचे सांगितले जाते. याच अमृतकुंडातील पाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पूजेसाठी वापरले जाते. समुद्रमंथनावेळी अमृताचे थेंब येथे पडल्याची आख्यायिका प्रचलित असून, त्यावरूनच या कुंडाला 'अमृतकुंड' हे नाव पडल्याचे मानतात.

या दुर्मिळ दर्शनामुळे भाविकांमध्ये आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, अनेक जण याला अत्यंत शुभ मानत आहेत.

🚩 हर हर महादेव!

Vintage photographs of Trimbakeshwar

  Restored image