Wednesday, 10 April 2024

चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन

 


आज चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन मानला जातो.

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता ||१||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ ||२||

स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही खात्रीशीर अशी माहिती नाही पण एका हकीकतीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हरियाणातील छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ प्रकट झाले होते असे मानले जाते. स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जावून तेथिल पुरोहितांमधील हरीहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत. याचा दाखला देऊन तेथिल काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्र प्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदिनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथिल पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरणार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैद्राबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले.  स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथिल चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबधी व चरित्रासंबंधी खात्रीशिर आणि सुत्रबध्द माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास २३ वर्षे वास्तव्य होते. आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार यागोष्टी पाहता, स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म स्वरुप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे.

दरम्यान, स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरात आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १८७८ होता.  त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामिसुत महाराजांनी सुरु केला आहे. तेव्हापासून दरवर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जातो.

स्वामी समर्थांचे परम शिष्य असलेल्या स्वामीसुत महाराजांनी त्यांचा स्वामींशी झालेल्या संवादावर जे काही अभंग रचले आहेत त्यात त्यांनी स्वामींच्या प्रकटण्याबद्दल वर्णन केले आहे.  

दत्त माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥०१॥
छेलीखेड्या ग्रामामाजीं । झाला अवतार हा सहजी ॥०२॥
गोटी खेळण्याचा रंग । तेव्हां मनी झालो दंग ॥०३॥
तेथे होता विजयसिंग । आतां येथे करू रंग ॥०४॥
गजानन आनंदला । पाहुनियां त्या खेळाला ॥०५॥
नाचताती चहू कोणीं । नुपुरें वाजतीं चरणीं ॥०६॥
गोटी गोटीचा हा वाद । हरीचा हसण्याचा छंद ॥०७॥
हंसू लागे वक्रतुण्ड । हलवूनी प्रीती सोंड ॥०८॥
विष्णु स्तंभी प्रकटलें । दत्त गोटी फोडूनि आले ॥०९॥
माझ्या स्वामीचीं करणीं । कंप होतसे धरणीं ॥१०॥
गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय करीं ॥११॥
गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग ॥१२॥
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली ॥१३॥
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ ॥१४॥
एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती लीला ॥१५॥
स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या काजाला ॥१६॥

स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथेच 'वटवृक्ष  समाधी मठ स्थानी' आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. मात्र, आजही लोकांमध्ये स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

 







 

Tuesday, 13 February 2024

श्री गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेशाची माघी जयंती


 

आज श्री गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेशाची माघी जयंती. माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरदा चतुर्थी अशी या चतुर्थीची नावे आहेत.  गणपतीचे अनेक अवतार आणि अनेक रूपे असून त्यातल्या एका अवताराचा हा जन्म दिवस अर्थात वाढदिवस आहे। चौथाच दिवस का तर माणूस मातेच्या उदरात असताना सुद्धा चौथ्या महिन्यात त्याचा जीवात्मा शरीरात प्रवेश करत असतो.

मग भाद्रपद चतुर्थी आणि माघी चतुर्थी मध्ये काय फरक आहे.  तर आज जयंती असलेला विनायक हा गणेशाचा वेगळा अवतार आहे। भाद्रपद चतुर्थीला आपण पूजन करतो तो शिव - पार्वतीचा पुत्र गणपती किंवा गणेश हा नव्हे. आज जयंती असलेला महोत्कट विनायक हा दशभुज म्हणजे दहा हात असलेला, रक्तवर्णी म्हणजे रक्ताचा लाल रंग असलेला अवतार.  वाहन सिंह.  माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी ऋषी कश्यप यांना अदिती या त्यांच्या पत्नीपासून “महोत्कट विनायक” हा पुत्र झाला.   कश्यप ऋषींना दिती, अदिती सहित एकूण १३ पत्न्या होत्या. कश्यप ऋषी आणि दिती यांच्या पोटी हा जन्माला आला. म्हणून काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.  

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी सुद्धा गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि तोही श्री गणेशाचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो.  आपण लहानपणापासून गणेश जन्माची एक कथा ऐकत आलेले असतो.  ती ही की पार्वतीच्या मळापासून तिने गणपती बनवला आणि दारावर त्याला बसवला.  मग शिवशंकरांना त्याने आत सोडलं नाही म्हणून त्यांनी त्याचं मस्तक  उडवलं आणि नंतर सत्य परिस्थिती कळल्यावर हत्तीचं मस्तक आणून जोडलं. ही कथा  भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी घडलेली होती

महोत्कट विनायक हा भगवान श्री गणेशाच्या ६४ अवतारांपैकी पहिला अवतार आहे.  नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन राक्षस भावांच्या नाशासाठी हा अवतार अवतरला होता.  त्यांचे वडील कश्यप प्रजापती होते आणि आई अदिती.  त्याच्या नऊ हातांमध्ये शस्त्रे आहेत.  त्याच्या हातात सुदर्शन चक्र, तलवार, बाण, धनुष्य, त्रिशूळ, शंख, कमळ, गदा आणि परशू आहे आणि ते दहाव्या हाताने आपल्या भक्तांना इच्छित परिणामांचा आशीर्वाद देतात.  या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा आणि धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.  म्हणून माघी चतुर्थी या महोत्कट विनायकाची उपासना करून साजरी केली जाते. अशी स्कंद पुराणात या अवताराबाबत कथा आहे. कृष्णावर याच माघी चतुर्थीला चंद्र दर्शन झाल्यामुळे चोरीचा आळ आला होता असा पुराणात उल्लेख आहे.

या दिवशी गणेशाची हळद किंवा शेंदुरापासून बनवलेली प्रतिमा पुजली जाते. काही ठिकाणी गाईच्या शेणापासून सुद्धा ही प्रतिमा बनवली जाते. पाण्यात तीळ भिजवून किंवा तिळाची पेस्ट अंगाला लावून आज आंघोळ करायची असते.  जेणे करून अंग मऊ व्हावे, कारण थंडीमुळे अंग कोरडं आणि रुक्ष होऊन त्वचा तडकलेली असते आणि त्यामुळे अंगाला खाज सुटत असते.  आजच्या दिवशी गणेशाची पूजा विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी करण्याचा प्रघात किंवा परिपाठ आहे.  या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. बरेच जण एकभुक्त (एक वेळ उपाशी राहून) या दिवशी जागरण करतात.  माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.  

Monday, 25 December 2023

एकमुखी दत्त मंदीर,नाशिक

।।श्री.एकमुखी दत्त मंदीर,नाशिक।।

हे मंदीर नाशिकच्या श्रीक्षेत्र गंगाघाटावर असुन सुमारे ३५०वर्षा पूर्वीचे आहे.

श्री.एकमुखी दत्त मंदिरातील महंत श्री. बर्वेंनी गोदातिरी एकमुखी दत्त मुर्तिची स्थापना केली होती.

प. पुज्य रघुनाथ भटजी महाराज हे भृगुऋषींचे विभूति रूप मानले जाते. निरंजन स्वामी कृत श्री रघुनाथ चरित्रात माघ वद्य १४ शके १९३९ (सन १८१७)  रोजी समाधी घेतल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच ती समाधी २०५ वर्षांची आहे. या वरुन हे मंदिर ३५० वर्षाचे असावे असा अंदाज आहे.
श्री दत्त उपासकां मधे नाशिकचे श्री एकमुखी दत्त मंदिर हे प्रति गाणगापुर मानले जाते, म्हणुन या मंदिरा मधे नाशिककरांची विशेष आस्था आहे.


     ।। श्री गुरूदेव दत्त ।।

Monday, 20 November 2023

श्री क्षेत्र अंतापूर - श्री शंकर महाराजांचे प्रकटस्थान

 आज कार्तिक शुद्ध अष्टमी. सद्गुरू श्रीशंकर महाराज यांचा प्रकटदिन. 



पुत्रलाभ झाला सुंदर । त्या दिवशी शंकराचाच होता वार 

तो म्हणजेच सोमवार । कार्तिक शुद्ध अष्टमी ।।

साधारणपणे इसवीसन । अठराशे सुमारास जाण 

महाराजांचा जन्मदिन । याप्रमाणे असेच ।।

जन्म साल जरी न निश्चित । मिती मात्र निश्चित असत

कार्तिक शुद्ध अष्टमी होत । जन्म दिवस हा असे हो ।।


नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे चिमणाजी हिरे व त्यांची अर्धांगिनी सौ. पार्वती हे दांपत्य राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. 


अंतापुरी पाहुनी भक्ती

अवतरली ती बाल मूर्ती

भक्ती बळाने कोंडुनी ठेवी

अंगणी अनंता.. ।।१।।


अनंत रुपे घेऊनी जगती

तुम्ही अवतरता

जय जय शंकर गुरुनाथा..।।धृ।।


नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’

अशा योगीराज श्री शंकर महाराजांचे वर्णन त्यांचे अहमदनगरचे निस्सीम भक्त सरदार नानासाहेब मिरीकर यांनी स्वरचित अभंगात असे केले आहे. 

वेष घेतला बावळा, अंतरी शुध्दज्ञानकळा | ऐसा सद्गुरु लाघवी, नानारंगी जन खेळवी |

बाल पिशाच्य उन्मत्त, लीला दावी तो विचित्र | लूळा पांगळा, जडमूढ,सांगेना अंतरीचे गुढ |

शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण ||


अशा या योगी श्री शंकर महाराजांच्या प्रकटस्थानी त्यांच्या जन्मगावी अंतापूर येथे श्री शंकर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराबद्दल आज प्रकटदिनानिमित्त आपण जाणून घेऊयात. 


सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या जन्मगावी अंतापूर येथे एक छानसे मंदिर आहे. या मंदिरात गर्भगृहामध्ये श्रीशंकरमहाराजांच्या मूर्तीसह शिवलिंग स्थापन्यात आले आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस स्वतः श्रीशंकरमहाराजांनी भूमीतून वर काढलेली श्रीगणेशमूर्ती, शिवलिंग व नंदी स्थापिले आहे. तर मारुतीराया स्वतंत्रपणे या मंदिरासमोरच एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहेत. सध्याच्या मंदिराचे जे गर्भगृह आहे त्याच्या डाव्या बाजूस फार पूर्वी मोठी चिंच होती. त्याच्या मुळाशीच श्रीगणेश, नंदी व श्रीमारुती सापडले, तो प्रसंगही फार विशेष आहे.














महाराजांचे अंतापूरमधील एक वंशज गोविंद हिरे यांना श्रीशंकरमहाराज एकदा म्हणाले की, चल! तुला डबोलं काढून देतो. हे ऐकताच गोविंद हिरे एकदम आशातूर झाले. डबोलं म्हणजे फार मोठा लाभच होणार व दारिद्र्य विवंचना संपणार असे गृहीत धरून ते महाराजांसमवेत निघाले. काही गावकरीही आले. महाराजांनी सर्वाना चिंचेखाली खणण्यास सांगितले. काही फुटांवरच या मूर्ती सापडल्या. गोविंद हिरेंच्या कल्पनेतले डबोले मिळाले नाही तरी देवतांच्या मूर्ती सापडल्याने सर्वच हरखून गेले. मग मूर्ती वर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. मारुतीरायाची मूर्ती काही केल्या वर येईना. तेव्हा त्या मूर्तीला दोरखंड बांधून पुढे दोन रेड्यांस खेचण्यासाठी जुंपण्यात आले. पण मूर्ती तसूभरही हलेना. एका बाजूस स्वानंदमग्न अवधूतमूर्ती श्रीशंकरमहाराज सारी गंमत न्याहाळत होते. ते पुढे होऊन खड्ड्यात उतरले. त्यांनी मूर्तीला केवळ आपली करांगुली लावली. मग काय ! पुढच्याच मिनिटात श्रीमारुतीराया खड्याबाहेर दाखल झाले! अन्य मुर्तीनाही श्रीशंकर महाराजांनी स्पर्श करताच त्या विनासायास बाहेर निघाल्या.


मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।

दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।

यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।

पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।


घर सोडल्यानंतर संपूर्ण आयुष्यात शंकर महाराज आपल्या जन्मगावी म्हणजे अंतापूरला फक्त एकदाच आले होते. ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे.


मागावे काय आम्ही सदगुरूंना

सर्व ठावे ते माझ्या शंकराला

गुरुभक्तांचा गुरुचरणी भार

बाबा घेतील त्यांचा कैवार ।।


Wednesday, 25 October 2023

वल्कले परीधान केलेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई

 विजयादशमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तींना विशेष वस्त्र परिधान करण्यात येते. ह्या वस्त्राना वल्कले म्हणतात.  प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सितामाई जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा त्यानी वल्कले  परिधान केली होती. वृक्षांच्या सालींपासून हे वस्त्र बनवतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे देव रथात आरूढ होऊन सिमोल्लंघन करण्यासाठी चालले आहे असा देखावा मांडण्यात येतो व देवांना पारंपारिक आभूषणे  देखील चढवण्यात येतात. 








Thursday, 19 October 2023

स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक



 स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक 



ब्रिटिशांच्या दास्यातून भारतमातेची मुक्तता या अनिवार ध्यासातूनच सावरकरांना ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हा महन्मंगल मंत्र स्फुरला. या मंत्राच्या सिध्दीसाठी त्यांनी ’अभिनव भारत’ या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. सावरकर लंडनला गेले, तेही त्यासाठीच. हि कथा आहे सावरकरांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मीची व अभिनव भारत संस्थेची. 


१८९८ मध्ये भगूर व आजूबाजूच्या गावांमध्ये प्लेगचा उद्रेक झाल्याने बाबाराव व तात्याराव सावरकर हे दोघे सावरकर बंधू नाशिकच्या तीळभांडेश्वर गल्ली येथील वर्तकांच्या वाड्यात वास्तव्यास आले. सुरुवातीला वर्तकांच्या वाड्यात राहणारे सावरकर कुटुंबीय नंतर तो वाडा सोडून दातारांच्या घरात वास्तव्य करू लागले. ही सर्व मंडळी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम या राष्ट्रीय भावनेने भारावलेली होती. ‘आपला भारत देश या जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीत अडकला आहे. भारतीय जनता भरडली जात आहे. आपण आपल्या परीने जमेल तशी सशस्त्र क्रांती करून इंग्रजांच्या विरोधात लढले पाहिजे,‘ असे या सर्वांचे ठाम मत होते. यातूनच नोव्हेंबर १८९९ मध्ये या सर्व मित्रांनी म्हणजेच सावरकर बंधू, दातार बंधू, वर्तक, चिपळूणकर, म्हसकर, पागे या सर्वांनी मिळून ‘राष्ट्रभक्त समूह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. याची प्रकट शाखा म्हणून दि. १ जानेवारी १९०० ला ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना केली. ‘मित्रमेळा’च्या बैठकांमध्ये तत्कालीन इंग्रज करत असलेले जुलूम-जबरदस्ती व अन्याय कृतींबाबत चर्चा केली जात असे. 


‘स्वातंत्र्य हेच साध्य आणि सशस्त्र क्रांती हेच साधन’ हे ‘मित्रमेळ्या’चे ब्रीदवाक्य होते. ‘मित्रमेळ्या‘त जातीभेद नव्हता, शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने ‘मित्रमेळा‘ समूहातर्फे नाशिकमध्ये साजरे केले जात. विनायक सावरकर हा तरुण मुलगा तेथीलच जवळील पिंपळाच्या पारावर उभा राहून देशाची सध्याची परिस्थिती आपल्या भाषणातून सांगत असे. ‘देश स्वतंत्र व्हावा, यासाठी सर्वांनी आपापसातील वैयक्तिक हेवेदावे विसरून राष्ट्रभक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरोधात लढले पाहिजे,‘ असे हा तरुण विनायक सर्व नाशिककरांना सांगत असे. विनायकाची भाषणे ऐकण्यासाठी दुरून लोक नाशिकला येत असत. पिंपळपार परिसरामध्ये जमत असत. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदूमून जात असे. 


 ‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.


१९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना कळावं, सार्‍या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्‍या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्‍यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले. 


दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.


तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.


दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.


सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते. त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदीर, नाशिक येथील स्वातंत्र्यलक्ष्मीची मुर्ती १९५६ छायचित्राखालिल अक्षर बहुदा स्वत: स्वातंत्र्यवीरांचे आहे. (हे मूळ फोटोच्या मागे लिहिले आहे)पोस्ट साभार- चंद्रशेखर साने








Saturday, 14 October 2023

नाशिकची ग्रामदेवता कालिका माता

 नाशिक शहराची ग्रामदेवता असलेले कालिका मातेचे मंदिर 


नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता. 


मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. 


येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.


स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.


पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे.  मंदिराच्या आवारातील उद्यानात  कालिका मातेचे परमभक्त असलेले रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. 


मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर.

सध्याचे कालिका मंदिर 


महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती यांच्या देखण्या मूर्ती 



अठराव्या शतकातील कालिका मंदिराचे कल्पनाचित्र 







सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...