आज कार्तिक शुद्ध अष्टमी. सद्गुरू श्रीशंकर महाराज यांचा प्रकटदिन.
पुत्रलाभ झाला सुंदर । त्या दिवशी शंकराचाच होता वार
तो म्हणजेच सोमवार । कार्तिक शुद्ध अष्टमी ।।
साधारणपणे इसवीसन । अठराशे सुमारास जाण
महाराजांचा जन्मदिन । याप्रमाणे असेच ।।
जन्म साल जरी न निश्चित । मिती मात्र निश्चित असत
कार्तिक शुद्ध अष्टमी होत । जन्म दिवस हा असे हो ।।
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे चिमणाजी हिरे व त्यांची अर्धांगिनी सौ. पार्वती हे दांपत्य राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला.
अंतापुरी पाहुनी भक्ती
अवतरली ती बाल मूर्ती
भक्ती बळाने कोंडुनी ठेवी
अंगणी अनंता.. ।।१।।
अनंत रुपे घेऊनी जगती
तुम्ही अवतरता
जय जय शंकर गुरुनाथा..।।धृ।।
नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’
अशा योगीराज श्री शंकर महाराजांचे वर्णन त्यांचे अहमदनगरचे निस्सीम भक्त सरदार नानासाहेब मिरीकर यांनी स्वरचित अभंगात असे केले आहे.
वेष घेतला बावळा, अंतरी शुध्दज्ञानकळा | ऐसा सद्गुरु लाघवी, नानारंगी जन खेळवी |
बाल पिशाच्य उन्मत्त, लीला दावी तो विचित्र | लूळा पांगळा, जडमूढ,सांगेना अंतरीचे गुढ |
शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण ||
अशा या योगी श्री शंकर महाराजांच्या प्रकटस्थानी त्यांच्या जन्मगावी अंतापूर येथे श्री शंकर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराबद्दल आज प्रकटदिनानिमित्त आपण जाणून घेऊयात.
सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या जन्मगावी अंतापूर येथे एक छानसे मंदिर आहे. या मंदिरात गर्भगृहामध्ये श्रीशंकरमहाराजांच्या मूर्तीसह शिवलिंग स्थापन्यात आले आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस स्वतः श्रीशंकरमहाराजांनी भूमीतून वर काढलेली श्रीगणेशमूर्ती, शिवलिंग व नंदी स्थापिले आहे. तर मारुतीराया स्वतंत्रपणे या मंदिरासमोरच एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहेत. सध्याच्या मंदिराचे जे गर्भगृह आहे त्याच्या डाव्या बाजूस फार पूर्वी मोठी चिंच होती. त्याच्या मुळाशीच श्रीगणेश, नंदी व श्रीमारुती सापडले, तो प्रसंगही फार विशेष आहे.
महाराजांचे अंतापूरमधील एक वंशज गोविंद हिरे यांना श्रीशंकरमहाराज एकदा म्हणाले की, चल! तुला डबोलं काढून देतो. हे ऐकताच गोविंद हिरे एकदम आशातूर झाले. डबोलं म्हणजे फार मोठा लाभच होणार व दारिद्र्य विवंचना संपणार असे गृहीत धरून ते महाराजांसमवेत निघाले. काही गावकरीही आले. महाराजांनी सर्वाना चिंचेखाली खणण्यास सांगितले. काही फुटांवरच या मूर्ती सापडल्या. गोविंद हिरेंच्या कल्पनेतले डबोले मिळाले नाही तरी देवतांच्या मूर्ती सापडल्याने सर्वच हरखून गेले. मग मूर्ती वर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. मारुतीरायाची मूर्ती काही केल्या वर येईना. तेव्हा त्या मूर्तीला दोरखंड बांधून पुढे दोन रेड्यांस खेचण्यासाठी जुंपण्यात आले. पण मूर्ती तसूभरही हलेना. एका बाजूस स्वानंदमग्न अवधूतमूर्ती श्रीशंकरमहाराज सारी गंमत न्याहाळत होते. ते पुढे होऊन खड्ड्यात उतरले. त्यांनी मूर्तीला केवळ आपली करांगुली लावली. मग काय ! पुढच्याच मिनिटात श्रीमारुतीराया खड्याबाहेर दाखल झाले! अन्य मुर्तीनाही श्रीशंकर महाराजांनी स्पर्श करताच त्या विनासायास बाहेर निघाल्या.
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
घर सोडल्यानंतर संपूर्ण आयुष्यात शंकर महाराज आपल्या जन्मगावी म्हणजे अंतापूरला फक्त एकदाच आले होते. ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे.
मागावे काय आम्ही सदगुरूंना
सर्व ठावे ते माझ्या शंकराला
गुरुभक्तांचा गुरुचरणी भार
बाबा घेतील त्यांचा कैवार ।।
No comments:
Post a Comment