Sunday, 16 July 2023

जगात सर्वांना मोहिनी घालणारा नासिक(नसक Nassak Diamond) हिरा नेमका कसा आहे?

Eye of Shiva म्हणजे महादेवाचा डोळा म्हणवला जाणारा हा हिरा त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुवर्णमुखवटा व प्राचीन रत्नजडित मुकुटात जडलेला होता असे मानतात. १८१८ साली त्रंबकेश्वर येथुन ब्रिटिशांनी त्रंबकराजचा खजिना लुटला. यात आपल्या नाशिकचा वारसा असलेला नासक हिरा ही लुटला गेला. त्यानंतर या हिऱ्याचा जगप्रवास सुरू झाला व त्याच्या सोंदर्याने सर्व जगाला वेडं करून सोडले.  


असा हा आपला नासिकचा हिरा नेमका कसा होता, त्याची रोमांचक कहाणी काय आहे हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये...  



https://youtu.be/sa_tgZZjkhU

https://youtu.be/sa_tgZZjkhU

https://youtu.be/sa_tgZZjkhU


Monday, 19 June 2023

त्र्यंबकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मृतीस्थळ

 श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेच्या दर्शनबारीच्या समोर निर्माण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मृतीस्थळ. 

 

सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारीसाठी जाताना ३१ डिसेंबर १६६३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्र्यंबकराजाला अभिषेक करून दर्शन घेतले होते व हा परिसर मुघलांच्या ताब्यातून सोडवण्याचा संकल्प केला होता, तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मुघल बादशहा औरंगजेब याने विध्वंस केलेल्या जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्याच्या मंदिराची उभारणी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांचे एकत्रित असलेले हे कदाचित पहिलेच व एकमेव स्मारक असावे. 

हा सर्व इतिहास श्री त्र्यंबकेश्वर  ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मंदिरात जाण्यापूर्वीच या स्मृतिस्थळाचे दर्शन घेताना ज्ञात होत आहे. 



Tuesday, 6 June 2023

शिवराज्याभिषेक - सोहळा अस्मितेचा, सोहळा अभिमानाचा

 #शिवराज्याभिषेक #सोहळाअस्मितेचा #सोहळाअभिमानाचा



छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस #राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा #सोहळा पार पडला. शिव राज्याभिषेक सोहळा हा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी #छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे पृथ्वीवर छत्र धारण करून तिचे संरक्षण व प्रतिपालन करणारा सार्वभौम राजा. महाराजांनी राज्याच्या कारभारासाठी #अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. #छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.

राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा तत्कालीन विद्वानांना माहित नव्हती. त्यासाठी कशी येथील प्रकांड पंडित गागाभट्ट यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. अनेक प्रकारच्या धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे #आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते #प्रतापगड वरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८मेला प्रायश्चित्त केले. जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ला #राज्याभिषेक विधी संपन्न झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, #कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा #अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरछत्रपती शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’, 'शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित #गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत '#शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर,छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

अशाप्रकारे शेकडो वर्षांनंतर हिंदुस्थानात अभिषिक्त राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य मराठी रयतेस लाभले.


आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम
महाराsssssज, गडपती
गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत,अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित,शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर,प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.  

#छत्रपतीशिवाजीमहारज
#शिवराज्याभिषेकसोहळा

Friday, 5 May 2023

बुद्ध पौर्णिमा...

 आज बुद्ध पौर्णिमा...  


अत्त दीपो भव:

नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यातील बुद्धाची प्रतिमा.


शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा. याच दिवशी त्यांना जन्म,ज्ञान व महानिर्वाण प्राप्त झाले.

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसारले. यासाठी स्वतःचे घरदार सोडुन ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. बुद्धांनी जीवनात अतिरेक टाळून सम्यकतेचा आग्रह धरला. अष्टांगमार्ग व पंचशील अनुसरण्याचा उपदेश केला. अपूर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास. 


अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!


#buddhapurnima #बुद्धपौर्णिमा 




Thursday, 4 May 2023

छिन्नमस्ता माता जयंती

 आज छिन्नमस्ता माता जयंती. 


छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते. छिन्नमस्ता हे देवी पार्वतीचे अथवा चिंतापूर्णी देवीचे रूप मानतात. ती दशमहाविद्यांपैकी एक अत्यंत महत्वाची देवता मानली जाते. आहे. या देवीला  प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका अशा इतरही नांवांनीं ओळखले जाते. 


उग्र स्वरूप असलेल्या या देवीचे रूप दिसण्यास अत्यंत भीषण असून या देेेवीच्या एका हातात तिचे कापलेले मस्तक व एका हातात शस्त्र आहे. कापलेल्या शिरविहीन धडातून रक्ताच्या तीन धारा निघून त्या शेजारी असलेल्या देवीच्या दोन्ही मैत्रिणींच्या तोंडात पडत आहेत. गळ्यात कवट्यांची माळ आहे. व ती एका मैथुनरत जोडप्याच्या पाठीवर उभी आहे. 


हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात. 


छिन्नमस्ता देवीची साधना ।। ओम  श्रीं ह्रीं क्लीं ऐं वज्र वैरोचनीयै हूं हूं फट स्वाहा: ।। या बीजमंत्राने करतात. 


सोबतच्या छायाचित्रात दाखविलेली छिन्नमस्ता देवीची आदिम शैलीतील धातूची मूर्ती नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात पाहावयास मिळते. 







Sunday, 16 April 2023

भारतीय रेल्वेचा शुभारंभ


'साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलाची गाडी कशी ढकली रे! 


हाच तो दिवस आणि हीच ती तारीख.... आजच घडली ती भारताला आधुनिक करणारी घटना.. आणि याच दिवशी जगाच्या इतिहासातील एका प्रकरणात


भारतीय रेल्वेचा शुभारंभ झाला. बरोब्बर १७० वर्षांपूर्वी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ती आजच्याच दिवशी. ब्रिटिश राज मध्ये कलकत्त्यावर मात करून प्रवासी रेल्वेचा शुभारंभ करण्याचा मान मुंबई शहराने मिळवला. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. 

दुपारी ३.३० वाजता २१ तोफांची सलामी घेऊन या रेल्वेने आपला प्रवास सुरू केला. १४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० भाग्यवान प्रवासी बसले होते. सिंध, सुलतान आणि साहिब या तीन वाफेच्या इंजिनांनी या ट्रेनला ५७ मिनिटात ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचवले. या मार्गावर तेंव्हा कुर्ला आणि भायखळा ही दोनच स्थानके होती. या रेल्वेनं वाटेत पाणी भरण्यासाठी सायन येथे एक थांबा घेतला. ४.४५ वाजता ही गाडी ठाणे स्थानकात पोहोचली तेंव्हा स्वागतासाठी शेकडो ठाणेकर उपस्थित होते. या गाडीने पहिला प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना शाही खाना देण्यात आला. 


वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी गाडी पाहून 

' साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलांची गाडी कशी ढकली रे ' असं गाणं ही तेंव्हा लोकप्रिय झालं होतं. 



Thursday, 6 April 2023

हनुमान जयंती



मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥


https://tinyurl.com/bbjdpkte


भक्ति, शक्ती, बुद्धी, समर्पण आणि अचल निष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक असलेले महाबली हनुमान यांची आज जयंती. हनुमानाची दैवत म्हणून उपासना होत असली, हनुमान जयंती साजरी होत असली तरी हनुमानाबद्दल तपशीलवार माहिती असतेच असं नाही.


हनुमानाच्या जन्माची कथा मोठी रोचक आहे. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. 


व्युत्पत्ती : वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही. हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही. केमिली बुल्के त्यांच्या ‘रामकथा: उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.


हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.


हनुमानाचे जन्मस्थान: हनुमानाच्या जन्मस्थानाबद्दल विविध प्रांतातील लोक दावे करतात. नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत

कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत, हरियाणातील गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे, अंजनधामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत, पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल इ. विविध ठिकाणी त्याचे जन्मस्थळ आहे असे तेथील स्थानिक लोक मानतात. मात्र बहुतांशी लोक नाशिकजवळील अंजनेरी पर्वत अथवा हंपीजवळील अंजनेय पर्वत या दोन ठिकाणांना जन्मस्थळ म्हणून मान्यता देतात. 


हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात, संगीत् रत्नाकार इ. ग्रंथांतून प्राचीन संगीताचार्यांबरोबर अंजनेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.


हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे.  हनुमानाची पंचमुखी मूर्ती  रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.


रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.


हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्त वर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे. 


आज हनुमान जयंतीच्या मुहुर्ताव हनुमंताची समर्पण वृत्ती, पराक्रम आणि संकटांवर मात करण्याची जिद्द् आत्मसात करण्याचा आपण संकल्प करूया. मारुतीरायांचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच या मंगलदिनी प्रार्थना आहे. 


संकट कटै मिटै सब पीरा।

जो सुमिरै हनुमत बलबीरा।।


#हनुमानजयंती


सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...