आज माघ शुद्ध नवमी म्हणजेच दासबोध जयंती...
समर्थ रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य व लेखनिक कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध या ग्रंथराजाची रचना केली. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली.
हा ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेतच असल्याने, मराठी बोली भाषा येणा-या कुणालाही तो सहज समजेल असा आहे. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
दासबोधाची वैशिष्ट्ये :
गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन, सरस्वती वंदन, गुरू वंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याची प्रचिती प्रत्येक समासात येते. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या असंख्य विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे.
दासबोधातील दशकांची नावे :
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत.
स्तवनाचा दशक, मूर्खलक्षणांचा दशक, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्रांचा दशक, देवशोधन, चौदा ब्रह्मांचा दशक, मायोद्भवनाम ज्ञानदशक, गुणरूप दशक, जगज्जोतिनाम दशक, भीम दशक, विवेक वैराग्य दशक, नामरूप दशक, अखंड ध्याननाम दशक, आत्म दशक, सप्ततिन्वयाचा दशक, प्रकृती पुरुष दशक, बहुजिनसी दशक, शिकवण दशक आणि पूर्ण दशक. या दशकांच्या केवळ नावावरून समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते.
No comments:
Post a Comment