श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती, टाकळी, नाशिक
समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतींपैकी असलेला सर्वप्रथम टाकळीचा मारुती. बोहल्यावरून पलायन केल्यावर रामदास स्वामी नाशिकच्या काळाराम मंदिरात आले. तेथे त्यांनी रामाची उपासना सुरू केली. राममंदिरात ५ दिवस ५ रात्र राहिल्यानंतर त्यांना रामाने दृष्टांत दिला आणि सांगितले की, 'गोदावरी, नंदिनी, संगमावर तपश्चर्येला सुरुवात कर' त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी टाकळीला संगमावर तपश्चयेर्ला सुरुवात केली. तेथेच त्यांना 'श्रीराम जयराम जय जय राम' या मंत्राचे स्फुरण झाले. १६२० मध्ये ते टाकळीला आले. १६२० ते १६३२ पर्यंत त्यांनी १२ वर्षे गायत्री मंत्र व राम मंत्राचे पुरश्चरण केले. या ठिकाणी त्यांनी १३ कोटी मंत्रांचे पुरश्चरण केले. गोदावरीच्या पाण्यात उभे राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला.
१६३२ मध्ये रामदास स्वामींनी टाकळी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपला शिष्य उद्धवस्वामी याच्यासाठी या मंदिराची स्थापना केली. मठात असणाऱ्या कपिला गायीच्या शेणापासून या मंदिरातल्या मारुतीची स्थापना करण्यात आलेली आहे. गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा या दिवशी दुधात शेंदुर कालवून या मूर्तीला लेप दिला जातो. या मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्याही मूर्ती आहेत. येथील गाभार्याबाहेर एक मोठा सभामंडप आहे. येथे काचेच्या मोठ्या पेटीत रामदास स्वामींची मोठी सुबक मूर्ती आहे. या ठिकाणी दासनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव असतो.
नाशिक येथील टाकळी येथील समर्थांनी स्थापन केलेला मठ हा पहिला मठ आहे. त्यामुळे समर्थांच्या टाकळी येथील मठाला रामदासी संप्रदायात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे.
No comments:
Post a Comment