Monday, 21 September 2026

नाशिक जिल्ह्यातील जागृत गणेशस्थाने: ढोल्या गणपती, शमी गणेश, सिद्धिविनायक आणि इच्छापूर्ती गणेश

मागील लेखात आपण नाशिक शहरातील प्राचीन गणेश स्थानांबद्दल माहिती जाणून घेतली होती. गोदाकाठची नवश्या, मोदकेश्वर, तिळा या गणेशमूर्तींइतकीच श्रद्धा जिल्ह्यातील इतर काही स्थानिक गणेशस्थानांनाही लाभलेली आहे. या लेखात आपण नाशिक शहरातील ढोल्या गणपती, ओढा येथील शमी गणेश, सटाणा तालुक्यातील ठेगोंडा येथील सिद्धिविनायक आणि चांदवडजवळील इच्छापूर्ती गणेश या चार स्थानांचा परिचय करून घेऊया. 

नाशिकचा ढोल्या गणपती : 

 


नाशिक शहरातील अशोकस्तंभ परिसरात वसलेले हे मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वी, स्थापन झाले असल्याचे मानले जाते. येथील मूर्ती अत्यंत भव्य, लंबोदर आणि विशालकाय स्वरूपाची असल्याने या गणपतीला "ढोल्या गणपती" असे नाव पडले. तिची उंची ७ फूट उंच व ४ फूट रुंद आहे. ही मूर्ती काळ्या दगडाची असून, तिला नित्याने शेंदूर लावल्याने मूर्ती शेंदरी रंगाची झाली आहे. 

जुन्या काळी गावाच्या सीमेवर मारुती, गणपती आणि भैरवनाथ यांची मंदिरे स्थापण्याची परंपरा होती - कारण या तिन्ही देवता संकटमोचक आणि विघ्नहर्त्या मानल्या जात. याच परंपरेनुसार त्या काळी नाशिक शहराच्या हद्दीवर असलेल्या अशोकस्तंभाजवळ ढोल्या गणपतीचे मंदिर उभारले गेले. आज शहराचा विस्तार वाढल्याने हे मंदिर नाशिकच्या मध्यवर्ती भागात आले आहे, तरीही त्याचे मूळचे स्थानमाहात्म्य कायम आहे. 

ढोल्या गणपती मानाचा, नवसाला पावणारा व प्रचंड श्रध्दा असलेला असल्याने संकष्टचतुर्थीच्या दिवशी असंख्य भाविक गजाननाचे दर्शन घेण्यास येतात. या दिवशी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच या मंदिरात गणेश उत्सवही मोठा प्रमाणात साजरा केला जातो. यावेळेस मंदिरात उत्सवाचे वातावरण असते.


ओढा येथील शमी गणेश :


नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा या ठिकाणी गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. त्याला ओढ्याचा ‘शमी गणेश’ असे म्हणतात.  गोदावरीच्या काठी असलेले हे मंदिर अत्यंत विलोभनीय आहे.

 या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची पहिली किरणे गणपतीच्या पायावर पडतात व तिथून परावर्तित होऊन समोर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जातात. याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक पहाटे दर्शनाला हजेरी लावतात. ओढा हे गाव तसे ऐतिहासिक. ब्रिटीशांच्या कालावधीत पेशव्यांचे राज्य असताना रंगराव ओढेकर नावाचे ब्राह्मण या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांनीच नाशिकच्या काळाराम मंदिराची उभारणी केली. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने व त्यांना नित्य गणपतीची पूजा करण्याची सवय असल्याने त्यांनी ओढा येथे गणेशाच्या मंदिराची स्थापना केली. ओढेकर सरदारांची ओढा येथे मोठी गढी होती. आजही या गढीचे भग्नावशेष पाहायला मिळतात. 

हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम अविष्कार आहे. मंदिरात कमानीतून प्रवेश करतांना समोरच रूद्रहनुमान मंदिर व नीळकंठेश्वर महादेवाची मंदिरे दृष्टीस पडतात. दगडाच्या पायऱ्या उतरून खाली घाटाकडे गेल्यास गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती चार भुजांची आहे. तिच्या एका हातात अंकुश असून दुसऱ्या हातात पाश आहे. दोन्ही हातांनी तो श्रद्धा आणि भक्ती मागतो. उदराला नाग आहे. गणपती मूर्ती चौरंगावर स्थापन्न झालेली असून पूर्वाभिमुख आहे. तसेच हातात कडे, पायात कडे तर डोक्यावर मुकूट आहे. काही वर्षांपूर्वी गावातल्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. या जीर्णोद्धारात मूळ मंदिराला धक्का न लावता समोरील मोठे दगड दूर करून सभामंडपाची उभारणी केली. या मंदिराचे बांधकाम एकाच शिळेतील असल्याने मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही. विस्तिर्ण अशा सभामंडपामुळे भाविकांना प्रसन्नता लाभते. 

या मंदिराच्या परिसरात शमी वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्या झाडांच्या सावलीत गणपतीचे मंदिर होते. त्यामुळे या गणपतीला ‘शमी गणेश’ म्हणूनही संबोधले जाते. त्याचप्रमाणे उजव्या सोंडेची मूर्ती असल्याने तिला काही भाविक ‘सिद्धिविनायक’ देखील म्हणतात. दर चतुर्थीला येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात.


ठेंगोडा येथील सिद्धिविनायक :


नाशिक - सटाणा महामार्गावर सटाण्यापासून १० किमी. वर हे टुमदार मंदिर आहे. या मंदिराच्या इतिहासात नोंदी नसल्या, तरी जोशी कुटुंबीयांची पाचवी पिढी सध्या इथे कार्यरत आहे. त्यामुळे मंदिर जुने असल्याचे जाणवते. १९६९ मध्ये गिरणा नदीला आलेल्या पुरानंतर या ठिकाणाची ओळख वाढली. आसपास पुराचे पाणी असूनही मंदिर, गणपतीची मूर्ती, दिवे, घंटा, साखळदंड यांना कसलीही हानी पोहोचली नाही. तेव्हापासून या गणपतीची ख्याती वाढली. सूतगिरणीच्या कामगारांचे ठेकेदार असलेल्या श्री. पटेल यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला.

नाशिक जिल्ह्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे फार कमी आहेत. त्यापैकी ठेंगोड्याच्या गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून  पूजाविधी कडक आहेत. माघी गणेश जन्म सोहळा, भाद्रपद गणेशोत्सव, श्रावणी सोमवार हे सण इथे विशेष आहेत. श्रावणी सोमवारी इथे सामुदायिक सत्यनारायण पूजा संपन्न होतात. मंदिराचे अधिकृत ट्रस्ट असून त्यामार्फत गणेशोत्सव काळात अन्नदान तसेच इतर लोकोपयोगी कामे वर्षभर केली जातात. गणपती नवसाला पावतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक जण नवस पूर्तीसाठी या मंदिरात येतात. 


चांदवडचा इच्छापूर्ती गणेश :




चांदवड तालुक्यातील वडबारे गावाजवळ, प्रसिद्ध रेणुका देवी मंदिराच्या परिसरात इच्छापूर्ती गणेशाचे भव्य मंदिर आहे. या मंदिराला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सांगितले जाते की, बीड येथील मूळ रहिवासी असलेले बाबा पाटील यांना होळकरांनी इसवी सन १७३० मध्ये आपल्या सेवेत घेतले. त्यांनी वडबारे गावाची स्थापना करतानाच होळकरांची सेवाही सुरू ठेवली. याच काळात एकदा डोंगरात फेरफटका मारताना त्यांना एका "बारी"त (डोंगरातील घळई अथवा दरीसदृश जागेत) स्वयंभू गणेशमूर्ती सापडली. त्यांनी तिची विधिवत प्रतिष्ठापना केली, आणि तेव्हापासून हा गणपती "बारीतील गणपती" आणि तो परिसर "गणेशबारी" या नावाने ओळखला जाऊ लागला. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा म्हणून या गणेशाला "इच्छापूर्ती गणेश" असे नाव प्राप्त झाले. आजही गणेशोत्सवात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, आणि चांदवडच्या ऐतिहासिक वारशामध्ये (अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल, चंद्रेश्वर मंदिर, जैन लेणी) या मंदिराचीही महत्त्वाची नोंद घेतली जाते.

नाशिक जिल्हा हा केवळ मोठ्या, सुविख्यात तीर्थक्षेत्रांपुरता मर्यादित नसून, त्याच्या प्रत्येक तालुक्यात, गावागावांत श्रद्धेने जपलेली छोटी-मोठी गणेशस्थाने विखुरलेली आहेत. ढोल्या गणपती आणि इच्छापूर्ती गणेश यांसारख्या स्थानांना दस्तऐवजीकृत इतिहास लाभला असला, तरी ओढ्याचा शमी गणेश व थेंगोड्याचा सिद्धिविनायक यांसारखी असंख्य स्थाने केवळ स्थानिक भाविकांच्या मौखिक परंपरेतून आणि अखंड श्रद्धेतूनच जिवंत राहिली आहेत. अशा स्थानिक देवस्थानांची सविस्तर माहिती, आख्यायिका आणि ऐतिहासिक नोंदी जपणे व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे नाशिकच्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम आहे.


No comments:

Post a Comment

नाशिक जिल्ह्यातील जागृत गणेशस्थाने: ढोल्या गणपती, शमी गणेश, सिद्धिविनायक आणि इच्छापूर्ती गणेश

मागील लेखात आपण नाशिक शहरातील प्राचीन गणेश स्थानांबद्दल माहिती जाणून घेतली होती. गोदाकाठची नवश्या, मोदकेश्वर, तिळा या गणेशमूर्तींइतकीच श्रद्...