Monday, 31 August 2026

नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.

 आज तिसरा श्रावणी सोमवार. आज जाणून घेऊया नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.


श्री कपालेश्वर मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव शिवमंदिर आहे , जिथे शिवलिंगासमोर नंदी नाही. कपालेश्वर मंदिर हे नाशिक शहरातील पंचवटी भागात, पवित्र गोदावरी नदीच्या व रामकुंडाच्या अगदी समीप वसलेले एक अतिप्राचीन शिवमंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे जसे नाशिकचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते, तसेच कपालेश्वर हे नाशिकमधील सर्वांत पूजनीय व जागृत शिवस्थान मानले जाते.


या मंदिराचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे — इथे शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही शिवमंदिरात प्रथम नंदीचे दर्शन घेऊन, त्याच्या दोन शिंगांमधून शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा असते. कपालेश्वर मंदिर या नियमाला अपवाद असल्यामुळे त्याला 'त्रैलोक्यातील एकमेव मंदिर' असे संबोधले जाते.

पद्मपुराणात व स्थानिक परंपरेत कपालेश्वर नावामागील आणि नंदीच्या अनुपस्थितीमागील कथा वेगवेगळ्या प्रकारे वर्णिल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार, या दुर्मिळ मंदिराची कथा प्राचीन काळातील सर्वात आदरणीय ऋषींपैकी एक असलेल्या मार्कंडेय ऋषींनी पद्मपुराणात सांगितली आहे. भगवान ब्रह्मदेवाला पाच मुखे होती. त्यापैकी चार मुखे वेदांचे पठण करण्यासाठी वापरली जात , तर पाचवे मुखे अनेकदा भगवान विष्णूवर टीका करत असे. एका दिव्य सभेत, जेव्हा ब्रह्मदेवाने विष्णू आणि शिव दोघांचाही अपमान करण्यास सुरुवात केली, तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे शस्त्र हिसकावून घेतले आणि आपल्या करंगळीच्या नखाने पाचवे मुंडके कापले. तथापि, या कृत्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागले आणि ते कपाल त्यांच्या हातालाच चिकटून राहिले. 

या पापाच्या परिमार्जनासाठी शिवशंकर हातात कपाल घेऊन कपाली (भिक्षाटन करणारा योगी) वेशात तीर्थाटन करू लागले. पौराणिक परंपरेनुसार अनेक तीर्थक्षेत्रांतून भ्रमण करत असताना, आपल्या यात्रेदरम्यान, भगवान शिव नाशिक येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरी विश्रांती घेण्याचे ठरवले. विश्रांती घेत असताना, भगवान शिवांनी एका गायीचे आणि तिच्या वासराचे संभाषण ऐकले; ते वासरू म्हणजे नंदीचाच पुनर्जन्म होता. वासराने आपल्या आईला सांगितले की या ब्राह्मणाने त्याचा छळ केला होता आणि तो त्याचा बदला घेईल. त्याच्या आईने त्याला बजावले की ब्राह्मणाला मारणे हे मोठे पाप आहे — ब्रह्महत्या . वासराने उत्तर दिले की भगवान शिवांनीही तेच पाप केले आहे, पण ते त्याचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग नक्कीच शोधतील. हे ऐकून, भगवान शिवांना जाणीव झाली की त्यांच्या स्वतःच्या तपश्चर्येचा उलगडा लवकरच होणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी, नंदीने त्या ब्राह्मणावर हल्ला करून त्यांना ठार मारले आणि ब्रह्महत्या केली . स्वतःला शुद्ध करण्यासाठी, नंदीने पंचवटी येथील पवित्र गोदावरी नदीत स्नान केले. पाण्यातून बाहेर आल्यावर, त्याचा काळा रंग पुन्हा दुधाळ पांढरा झाला — हे त्याचे पाप क्षमा झाल्याचे चिन्ह होते. हे पाहून, भगवान शिवानेही शुद्धीकरणाचा तोच मार्ग अवलंबला आणि याच स्थानी गोदावरी व रामकुंडाच्या पवित्र जलात स्नान केल्यानंतर व रामकुंडाशेजारी असलेल्या टेकडीवर तप  केल्यानंतर  त्यांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती मिळाली. शिवशंकरांच्या हातातील कपाल गळून पडले, आणि त्याच पुण्यक्षणी हे स्थान 'कपालेश्वर' म्हणून पावन झाले — ही या मंदिराच्या नावामागील मूळ कथा आहे.

असे मानले जाते की, स्वतः भगवान विष्णूंनी येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचे नाव 'कपालेश्वर' ठेवले, ज्याचा अर्थ 'ज्याने मस्तक (कपाल) काढले तो देव' असा होतो. नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात प्रार्थना केल्याने पापांचे क्षालन होते आणि आत्म्याला मोक्षाकडे - म्हणजेच अंतिम मुक्तीकडे - नेले जाते, असे म्हटले जाते.

नंदी येथे 'वाहन' नव्हे, तर 'गुरु' का?

नंदीच्या अनुपस्थितीबाबत स्थानिक परंपरेत एक स्वतंत्र कथा सांगितली जाते. शंकरांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्याचा मार्ग स्वतः महानंदीने सुचवला, असे मानले जाते — त्यांनीच शंकरांना नाशिकच्या रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला दिला. या उपकाराच्या कृतज्ञतेपोटी भगवान शंकरांनी नंदीला येथे 'वाहन' किंवा 'सेवक' म्हणून नव्हे, तर गुरुस्थान बहाल केले. गुरु हा शिष्यासमोर सेवक म्हणून उभा राहत नाही, या तत्त्वानुसार कपालेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर नंदीची स्वतंत्र मूर्ती स्थापित केलेली नाही — ही या मंदिराची जगावेगळी ओळख आहे.

या कथेला जोडूनच आणखी एक आख्यायिका सांगितली जाते, ज्यात सोमेश्वर परिसरात गाय व वासराच्या घटनेतून शंकरांवर गोहत्येचा प्रसंग ओढवल्याचा उल्लेख येतो — त्यानंतर नंदीनेच शंकरांना नाशिकला येऊन गोदावरीत स्नान करण्यास सुचवले, असाही एक पाठभेद प्रचलित आहे. अशा प्रकारे कथेच्या वेगवेगळ्या रूपांतही नाशिक व गोदावरी-स्नान हा मुक्तीचा गाभा कायम राहतो.

कपालेश्वर मंदिराचा नेमका स्थापनाकाळ निश्चित करणारा एकसंध ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही, परंतु काही ठोस खुणा व नोंदी या मंदिराच्या प्राचीनतेला पुष्टी देतात.


शिलालेखीय पुरावा : कळसाजवळील देवनागरी शिलालेख

मंदिरात पारंपरिक मराठा स्थापत्यशैलीतील नक्षीकाम व शिल्पकला पाहायला मिळते. मंदिराच्या कळसाजवळ 'श्री गणेशाय नमः श्री कपालेश्वर' असा देवनागरी लिपीतील शिलालेख कोरलेला आढळतो. या लिपीच्या वळणावरून व अक्षररचनेवरून तो जुन्या काळातील असल्याचे अभ्यासक सांगतात — हा या मंदिराच्या प्राचीनतेचा एक प्रत्यक्ष, जागेवर उपलब्ध असलेला पुरावा आहे.

या मंदिराची मूळ रचना आणि स्थापत्यशैली यादव कालखंडातील (अंदाजे ११ वे ते १३ वे शतक) असल्याचे दिसून येते. त्यापूर्वीही येथे महादेवाची पिंड अस्तित्वात होती. स्थानिक मान्यतेनुसार इ.स. सुमारे ११०० च्या दरम्यान तत्कालीन गवळी राजाने सुमारे पाच हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे सांगितले जाते. गवळी राजसत्तेसंबंधीचे ऐतिहासिक तपशील तुलनेने अपुरे असल्याने ही नोंद परंपरागत मानली जाते.

ऐतिहासिक संदर्भानुसार , इ.स. १६८० मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या एका सरदाराने या मंदिराचे नुकसान केले होते. पुढे इ.स. १७३८ मध्ये स्थानिक लोक व कोळी समाजाने पुढाकार घेऊन ५ हजार रुपये खर्च करत भग्न झालेल्या मंदिरात सुधारणा केल्या आणि पूजाविधीसाठी 'शैव-गुरवांची' नेमणूक केली. त्यानंतर नाशिक मराठा साम्राज्यात सामील झाल्यानंतर या मंदिराला भव्य स्वरूप मिळाले. सरदार जगजीवनराव पवार यांनी १० हजार रुपये खर्च करून मंदिराचा मुख्य सभामंडप  बांधला, तर त्यांचे नातेवाईक कृष्णाजी पवार पाटील यांनी १५ हजार रुपये खर्च करून मंदिराच्या भव्य दगडी पायऱ्या बांधल्या. 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (२०२६-२०२७) पार्श्वभूमीवर सध्याच्या मंदिर प्रशासनाकडून सध्या कपालेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.

गर्भगृहातील शिवलिंग आकाराने लहान असूनही अत्यंत जागृत मानले जाते. मंदिर पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत भाविकांसाठी खुले असते; पहाटेची पूजा-अभिषेक-आरती आणि सायंकाळची आरती अशा दोन प्रमुख नित्यविधी येथे पार पडतात.

या मंदिराचे आणखी एक वैशिट्य म्हणजे श्री कपालेश्वराचा 'पंचमुखी मुखवटा. पालखीसोहळ्यात मिरवला जाणारा हा आगळावेगळा पंचमुखी मुखवटा अत्यंत तेजस्वी भासतो. शिवशंकराच्या पाच मुखांच्या जटामुकुटात गंगा विराजमान आहे. तिच्या शिरावर पंचमुखी नागराजांनी आपली छत्रछाया धरली आहे. 

या मुखवट्याच्या निर्मितीची कथा मोठी अद्भुत आहे. नाशिकच्या जुन्या तांबट आळीत रहाणारे दादा उमाशंकर वैद्य  हे निस्सीम शिवभक्त. कपालेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. एकदा त्यांना कपालेश्वराचा द्रुष्टांत झाला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर चरणी चांदीचा मुखवटा अर्पण करण्याचे ठरवले. ही गोष्ट १८९३ सालची. सोनार  समाजातील तत्कालीन कसबी सुवर्णकार श्री रामचंद्र रावजी इंदोरकर यांच्याकडे हे  काम सोपवण्यात आले. आपले सर्व कसब कारागीरी  पणाला लावुन त्यांनी हा पंचमुखी शिवाचा मुखवटा घडवला. आणि त्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा तो कपालेश्वर पालखीत मिरवण्यात आला.

तेव्हापासून श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या या महापर्व कालात वैद्य कुटुंबाकडे असलेला मुखवटा भगवान कपालेश्वराच्या पालखीत मिरवला जातो. वंशपरंपरेने या पालखी सोहळ्याचा खर्च आणि परंपरा वैद्य कुटुंबाकडे राहील हेही तेव्हाच ठरवण्यात आले. वैद्य कुटुंबीयांनी दादा उमाशंकरांची ही परंपरा निष्ठेने पुढे चालु ठेवली आहे. 

कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. त्यानंतर विधीवत पूजा आणि श्रुंगार करून सवाद्य पालखी सोहळा संपन्न होत असतो.


असे हे आगळेवेगळे दुर्मिळ नंदी विरहीत शिव मंदिर.





































 

No comments:

Post a Comment

नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.

 आज तिसरा श्रावणी सोमवार. आज जाणून घेऊया नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी. श्री कपालेश्वर मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव शिवमंदिर आहे ,...