मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो.
हे इसवी सन १९३० साली काढलेले जुने छायाचित्र मनमाड रेल्वे स्थानकाच्या इतिहासातील एक अनमोल क्षण जपून ठेवते.
फलकावर दिसणारे “MANMAD” हे नाव आणि त्याखाली नमूद केलेली समुद्रसपाटीपासूनची उंची, बाजूला उभे असलेले प्रवासी, हमाल, मालाच्या गाठोड्यांनी भरलेली हातगाडी आणि सावली देणारी भलीमोठी झाडे—हे दृश्य आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जाते.
त्या काळात रेल्वे स्थानक म्हणजे केवळ प्रवासाचे ठिकाण नव्हते; ते गाव-शहरांना जोडणारे, व्यापाराला चालना देणारे आणि असंख्य माणसांच्या आयुष्याच्या कथा एकत्र आणणारे केंद्र होते.
आज मनमाड स्टेशन पश्चिम भारतातील सर्वात महत्वाचे जंक्शन आहे. मात्र तीनशे वर्षांपूर्वी ते एक लहानसे खेडे होते. जवळच अनकाई टणकाई हे यादवकालीन किल्ले व लेण्या आहेत. यादवांच्या काळात उत्तरेकडे कान्हदेशा म्हणजेच खान्देशात जाण्यासाठीचा रस्ता ह्या दोन किल्ल्यांच्या मघोमध असलेल्या दरीतून जातो. दक्षिणेकडे पुण्याकडे जाणारा एकमेव मार्गही ह्याच दोन किल्ल्यांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यातून जातो. त्याच रस्त्यावर "मनमाडी" नावाचे हे जुने खेडे होते.
ब्रिटिशांनी ह्याच पठाराची निवड रेल्वेचे जंक्शन निर्माण करताना केली. मुंबई ते मनमाड, मनमाड ते हैदराबाद, मनमाड ते आग्रा, मनमाड ते दौंड असे चार रेल्वेमार्ग एकाच स्टेशनला जोडण्यात आले आणि ह्या लहानश्या हिलस्टेशनची भरभराट सुरू झाली. ह्या स्टेशनला मनमाड असे नाव ब्रिटिशकाळी पडले. ह्याच काळात शेकडो पंजाबी लोकांनी मनमाड शहरात वास्तव्य केलं. भारतातील तिसरा सर्वात मोठा गुरुद्वारा गुपतसर इथे उभा आहे. ह्या पंजाबातील शीख बांधवांचे हजारो मराठी वंशज आजही मनमाडमध्ये पंजाबी-मराठी ही ओळख घेऊन राहतात.
मोठ्या रेल्वेस्टेशनमुळे भारत सरकारने मनमाडमध्ये धान्य गोदाम तयार केले. हे त्याकाळात आशिया खंडातील सर्वात मोठे धान्य गोदाम होते. मनमाडजवळील थंब्सअप चा आकार असलेला डोंगर जगप्रसिद्ध आहे. ह्या डोंगरावर अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे. स्थानिक लोक ह्याला हडबीची शेंडी म्हणून ओळखतात.

No comments:
Post a Comment