जागतिक सायकल दिन
३ जून, आज जागतिक सायकल दिन. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १२ एप्रिल २०१८ मध्ये एका ठरावाद्वारे ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून जगभर ३ जून जागतिक सायकल दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे, प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाप्रती त्यांची बांधिलकी समजून देऊन प्रदूषण कमी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे. सायकल ही पर्यावरणाला प्रदूषणापासून दूर ठेवतो. इतर स्वयंचलित वाहनांसारखे सायकल कुठल्याही प्रदूषण निर्माण करत नाही.
पहिली दुचाकी सायकल बनवण्याचा मान जर्मनीच्या कार्ल वॉन डॅरेस यांना जातो. इसवी सन १८१७ मध्ये, तेथील उमराव व हौशी संशोधक कार्ल वॉन डॅरेस यांनी जगातील पहिली दुचाकी सायकल बनवली होती. मात्र या दुचाकीला आतासारखे पेडल नव्हते. ती पायांनी जोर लावून पळवावी लागत असे. कालांतराने इतर संशोधकांनी त्यात आवश्यक त्या गरजेप्रमाणे सुधारणा केल्या व तिला आताचे स्वरूप प्राप्त झाले.
आजच्या काळात सायकल चालवणे किती महत्वाचे आहे याबद्दल अनेक जण जनजागृती करताना पाहायला मिळतात. परंतु प्रत्यक्षात अगदी मोजकेचं नागरिक सायकलीचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करताना पाहायला मिळतात. सायकल चालवणे पर्यावरणाबरोबरच वैयक्तिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत कमी खर्चात सामान्य माणूस देखील या वाहनाचा वापर करू शकतो आणि त्यामुळेच सायकल हे वाहन सगळ्यांच्या पसंतीस उतरणारे वाहन आहे.
सायकल चालवणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. केवळ इंधनाची बचतच नाही तर निरनिराळ्या शारीरिक व्याधी आणि आजारांपासून संरक्षण करण्याचे काम सायकल करते. आजच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेळ काढणे सर्वांनाच शक्य नसते. परंतु सायकल चालवणे हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील ती हातभार लावते.
विविध संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार दररोज ३० ते ४० मिनिटे सायकल चालवल्यास आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. सायकलिंगचा केवळ शारीरिक फायदा होत नाही. उलट, मानसिकदृष्ट्याही सायकल चालवण्याचे बरेच फायदे आहेत. आपण नैराश्याने किंवा अस्वस्थतेने ग्रस्त असल्यास सायकल चालविणे सुरू करा.
नियमित सायकल चालविण्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. सायकलिंगचा सर्वात मोठा फायदा कॅलरी बर्न करणे आणि वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. सायकल चालवणा-यांमध्ये इतरांपेक्षा प्रतिकारशक्ती जास्त असते. जेव्हा आपण सकाळी मोकळ्या हवेत सायकल चालवता तेव्हा शरीराला थंडीचा सामना करावा लागतो. थोड्या वेळाने, शरीर गरम होते आणि नंतर तीव्र उष्णता देखील सहन करते. सर्दी आणि उष्णता सहन करण्याची ही प्रक्रिया शरीराच्या टी-सेल्सला सामर्थ्य देते आणि आपण प्रत्येक ऋतूसमवेत येणा-या आजारांशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकते.
पोहणे, जिम, धावणे यासारखे व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. मात्र तथापि, सायकल चालविणे सर्वोत्कृष्ट आहे कारण ते आपल्या दिनचर्यामध्ये सहज बसते. उदाहरणार्थ, जिम, स्विमिंग पूल, स्पोर्टससाठी आपल्याला स्वतंत्रपणे वेळ काढावा लागतो. सायकलिंग मात्र आपण ऑफिस, बाजार, शाळा, महाविद्यालयात जाताना करू शकता.
आजच्या जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल चालवण्याचा आणि सायकलला ग्लॅमर मिळवून देण्याचा संकल्प करायला हरकत नाही. त्यासाठी गरज आहे एक पेडल मारायची, सायकलकडे अधोगतीची नाही तर प्रगतीची चाकं म्हणून पाहण्याची. ही प्रगती केवळ तुमची नसणार आहे तर ती पर्यावरणाची, आरोग्याची, देशाची आणि सर्वार्थाने आपल्या विचारांची प्रगती असणार आहे.
No comments:
Post a Comment