५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन - म्हणून साजरा केला जातो.
१९७४ पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.
पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.
दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश यजमान म्हणून निवडला जातो. २०२१वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.
वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय. जगभरामध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी ५०टक्के प्रवाळ (Corals) नष्ट झाली असून २०५०पर्यंत ९० टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविलेला आहे.
पर्यावरणाची ही हानी रोखत, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न, ही यावर्षीची थीम आहे. पाकिस्तानकडे यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद आहे. दरवर्षी एका देशाकडे या दिनाचं यजमानपद असतं आणि या देशात अधिकृत कार्यक्रम पार पडतात.
२०२१ पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.
जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या परिसंस्था - इकोसिस्टीम (Ecosystem) चं नुकसान रोखत, ते थांबवून ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीलाही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल (Climate Change) कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत, असं आवहन युनायटेड नेशन्सने केले आहे.
जगभरात विविध व्यक्ती, संस्था, उद्योग यांनी पर्यावरणाच्या हितासाठी काही उपक्रम राबवावेत, आपल्या कार्यपद्धतीत पर्यावरणस्नेही वा पर्यावरणपूरक बदल घडवून आणावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
#GenerationRestoration हा हॅशटॅग यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ठरवण्यात आलाय.
No comments:
Post a Comment