Monday, 31 May 2021

कसारा घाटातील अहिल्याबाई होळकर विहीर उर्फ टोपाची विहीर

 कसारा घाटातील अहिल्याबाई होळकर विहीर उर्फ टोपाची विहीर

https://youtu.be/KrLWUk4-p5M

मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम दिसते. हे बांधकाम म्हणजे सुमारे  तीस ते पस्तीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात.

जुन्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर असलेले बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले. सुमारे २५० वर्षे जुनी असलेली ही विहीर अद्यापही सुस्थितीत व वापरात आहे. इतक्या उंचावर असूनही कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला भरपूर पाणी असते हा एक चमत्कारच मानावा लागेल. 

अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षात आसेतुहिमाचल असंख्य तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत. 

अशा या प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, रणरागिणी, धर्मपरायण व तपस्विनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना  जयंती निमित्त निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!!!





Thursday, 27 May 2021

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

२८ मे - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती...

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

भारत मातेचे कोणत्याही पुरस्कारापलीकडचे सुपुत्र क्रांतिकारक, समाज सुधारक  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर -  अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. 

पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.  त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

देवाकडे जाताना मध्ये देश लागतो,
कायम देशभक्तीची मशाल मनात पेटविणारे!
एकच क्रांतीवीर,स्वातंत्रवीर सावरकर !

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !  🙏

२८ मे २०२१ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३८ वी जयंती ! या महायोद्ध्यास विनमार्च अभिवादन 

#वीर_सावरकर_जयंती 


Tuesday, 25 May 2021

नृसिंह जयंती

आज श्री नृसिंह जयंती,

वृषभे स्वाति नक्षत्रे चतुर्दश्यां शुभे दिने ।
संध्याकालेऽनुजे युक्ते स्तम्भोद्भूतो नृकेसरी ॥

(वृषभ राशि मध्ये सूर्य, स्वाति नक्षत्र, वैशाख शुद्ध चतुर्दशी च्या शुभ दिनी सायंकाळी च्या वेळी भगवान श्री नृसिंह स्तंभातुन प्रकट झाले).

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या ओवरीत असलेली लक्ष्मी-नृसिंह मुर्ती

Monday, 24 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ५) लेणी क्रमांक १० ते १५

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक 

लेणी क्रमांक १० ते १५


लेणे क्रमांक १० "नहपान विहार" :



हे लेणे हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा विहार आहे. स्तंभ, व्हरांडा, विहार व आतल्या खोल्या अशी या विहाराची रचना आहे. यात नहपानांचे एकूण सहा शिलालेख आहेत. 

हे लेणे क्र. १०  विदेशी क्षत्रप नहपान यांनी ख्रिस्ताब्द शके १२० मध्ये खोदवून घेतले. त्यामुळे हे लेणे 'नहपान विहार' म्हणून ही ओळखले जाते. 

इथे लेणी क्र.३ प्रमाणेच लेण्याची सुरूवात व्हरांड्यातील स्तंभांपासून होते. इथे सहा स्तंभ(दोन भित्तीस्तंभांसह - Pilasters) कोरलेले आहेत. हे स्तंभ या लेणीसमूहातील इतर लेण्यांपेक्षा अधिक कलात्मकरित्या कोरलेले आहेत. या स्तंभाचा आधार असलेले घट घाटदार असून स्तंभशीर्ष असलेले उलट्या घटांचा आकारही नजाकतदार कोरलेला आहे. या स्तंभांवर दर्शनी बाजुला वरच्या भागात हत्ती,बैल, सिंह इ. प्राणी कोरलेले आहेत. तर मागील बाजूस स्फिंक्ससदृश्य प्राणी (म्हणजे शिर मनुष्याचे व धड प्राण्याचे, बोकड, गरुडाचे डोके व चोच असलेला व चतुष्पाद  प्राण्याप्रमाणे शरीर असलेला प्राणी इ. प्राणी कोरलेले आहेत. हे प्राणी आपल्याला इजिप्त किंवा ग्रीक दंतकथांमध्ये आढळतात. याचाच अर्थ त्याकाळी पाश्चात्यांबरोबर व्यापारासोबतच संस्कृतीचेही आदानप्रदान होत होते हे या बाबींवरुन सिद्ध होते. 

व्हरांड्याच्या दोन्ही बाजूस दोन छोट्या खोल्या खोद्लेल्या आहेत. अशाप्रकारच्या खोल्या ध्यानकक्ष म्हणून वापरात येत असत असे जाणकारांचे म्हणणे आहे. या खोल्या दखमित्रा (दक्षमित्रा) या नहपान या क्षहरात क्षत्रपाची कन्या व दिनिकाचा पुत्र उशवदता याची पत्नी हिने खोदवून घेऊन नंतर धम्मसंघास दान केल्याचा उल्लेख बाजूच्या शिलालेखात मिळतो. 

नहपान विहाराचा अंतर्भाग :

विहारातील सभागृह ४३ फूट रुंद व ४५ फूट लांब असे प्रशस्त आहे. याला तीन दरवाजे आहेत. आत तीन बाजूंना एकूण अठरा कक्ष खोदलेले आहेत व समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व आजुबाजूला दोन स्त्री साधकांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या स्तुपाच्या जागी भैरवसदृश्य मुर्ती नंतरच्या काळात कोरलेली आहे. मात्र मुळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. 

नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णी यांचे समकालीन होता. त्यामुळे या लेण्याची निर्मिती लेणे क्र.३ च्या पुर्वीच्या काळात झाली आहे हे नक्की. व्हरांड्यातील दर्शनी भिंतीवर शिलालेख कोरलेले आहेत. या लेण्यात एकूण ६ शिलालेख कोरलेले आहेत. यापैकी ३ शिलालेख हे क्षत्रप नहपान राजाचा जावई व दिनिकाचा पुत्र उषवदत (ऋषभदत्त) याने धम्मसंघाला दिलेल्या दानाबाबत आहेत. यात उषवदत्त (ऋषभदत्त) याने कोणकोणत्या धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या आणि कोणती धार्मिक कृत्ये पार पाडली याचे विस्तृत विवरण दिलेले आहे. एका शिलालेखात क्षत्रपांच्या सातवाहनावरील विजयाप्रित्यर्थ उषवदत (ऋषभदत्त) याने भिक्कुंच्या अन्नवस्त्रांकरीता तसेच लेणे खोदण्यासाठी ३००० सुवर्णनाणी दान दिल्याचा उल्लेख आढळतो. इतर दोन छोट्या शिलालेखात ऋषभदत्त याची पत्नी दक्षमित्रा हिने संघाला दान म्हणून खोदलेल्या खोल्यांचा उल्लेख केलेला आहे. 

 या लेण्याच्या बाहेरच्या बाजूला आतील भैरवसदृष्य एक मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याच्या शिरामागे पाच फण्यांचा नाग असून तोंडातून बाहेर सुळे आलेले आहेत. उजवा हात कमरेवर ठेवलेला असून डाव्या हातात सोटा किंवा गदासदृष्य हत्यार घेतलेले आहे. ही रक्षकदेवता कदाचित हिंदू अथवा जैनधर्मियांनी नंतरच्या काळात कोरलेली असावी असा अंदाज आहे.

नहपान विहाराचे बाह्यदर्शन 


नहपान विहाराचा व्हरांडा 


विहाराचा अंतर्भाग


स्तूपाच्या जागी कोरलेली भैरवाकृती


चैत्य आणि छत्री


स्तंभ


शिलालेख

शिलालेख

शिलालेख


लेण्याच्या बाहेर कोरलेली रक्षक आकृती

विहाराचा आराखडा


लेणे क्रमांक .११, "जैन लेणी"


लेणे क्रमांक ११  हे  लेणे क्रमांक १० च्या जवळच परंतु थोड्याश्या उंचावर आहे. पाय-या चढून या लेण्या प्रवेश करता येतो. प्रवेशद्वाराजवळ असलेली अर्धवट व्हरांड्यतील दगडी बैठक भंगलेली आहे. या लेण्यातील भिंतींवर जैन धर्मीयांनी जैन तीर्थंकर  ऋषभदेव, वाघावर आरुढ असलेली यक्षी अंबिका व ऐरावतावर आसनस्थ इंद्र यांची शिल्पे कोरली. या लेणीसमूहात हे एकमेव जैन लेणे आहे. साधारणपणे इ. स. ११ व्या शतकात हे मुळचा बौद्ध विहार असलेले लेणे जैन लेण्यात रुपांतर केलेले दिसते. 

या लेण्यात एक शिलालेख आढळातो. या शिलालेखात लेखक शिवामित्र याचा पुत्र रामनक याने हे लेणे दान केल्याचा उल्लेख आहे. 

लेणे ११ (पाय-यांसह) ते १४


लेणे क्र.११ चे प्रवेशद्वार


जैन तीर्थंकर  ऋषभदेव


जैन तीर्थंकर  ऋषभदेव, यक्षी अंबिका व ऐरावतावर आसनस्थ इंद्र यांची शिल्पे 

लेणी क्र .१२-१३-१४

या लेणी म्हणजे भिक्कुंच्या निवासासाठी अथवा साधनेसाठी खोदलेले कक्ष आहेत. यात एक, दोन किंवा तीन कक्ष आहेत. १२व्या क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखावरुन रामनक या वेलीदत्ताच्या मुलाने भिक्कुसंघाला वस्त्र पुरविण्यासाठी १०० काशार्पण एवढ्या नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे. 

लेणे क्रमांक १३ मध्ये फक्त कक्ष आहेत. त्यात कोणताही शिलालेख नाही.

लेणे क्रमांक १४ मध्ये भगवान बुद्ध व बोधिसत्वांची शिल्पे आहेत. 


लेणी क्र. १२, १३, व १४(अत्यंत डावीकडे)


लेणी क्र. १२, १३ बाह्यभाग


लेणी क्र. १२, १३ बाह्यभाग

लेणे क्र.१४, बाहेरून होणारे दर्शन  


लेणे क्र.१४, प्रलंबपादासनात आसनस्थ बुद्ध  (धम्मचक्रप्रवर्तन मुद्रा)


लेणे क्र. १४, बोधिसत्व


लेणे क्र. १४, बोधिसत्व

लेणे क्रमांक १५ :

हे लेणे पूर्वी दोन मजली असावे. सध्याचा अस्तित्वात असलेला भाग म्हणजे पूर्वीच्या लेण्याचे गर्भगृह असावे असा अंदाज आहे. या लेण्याचा पुढचा भाग कोसळून नष्ट झाला आहे. या लेण्यातील शिल्पकलेवर महायान पंथियांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या लेण्यात असलेल्या बुद्धाच्या प्रतिमा सिंहासनावर प्रलंबपादासनात व कमलपुष्पावर पद्मासनात धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बसलेल्या आहेत. शेजारी पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्व तसेच इतर सेवक ही दिसतात. हे शिल्पकाम साधारणपणे इ.स् ५व्या शतकात केलेले असावे. 

लेणे क्र.१५ चे समोरून होणारे दर्शन 


प्रलंबपादासनात बसलेल्या बुद्धाचे भग्न शिल्प 


प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेले बुद्ध व बाजूस बोधिसत्व 


कमलासनावर पद्मासनात आसनस्थ बुद्ध व कमळाच्या देठाला आधार देणारे गंधर्व 


लेण्याचा अंतर्भाग व आतून दिसणारे बाहेरचे दृष्य


पुढील लेखांकात आपण उर्वरीत लेणी पाहूयात.

(क्रमशः)
संकलन : अशोक दारके

Sunday, 23 May 2021

गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर

गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर गावातून वाहती असताना २२ जानेवारी १९५० ला The Illustrated Weekly of India या इंग्रजी साप्ताहिकात्त प्रकाशित झालेले छायाचित्र

Godavari river flowing from within Trimbakeshwar village clicked during the 1950s and published in the english magazine 'The Illustrated Weekly of India'.





Thursday, 20 May 2021

गोदाकाठ, पंचवटी नाशिकचे जुने छायाचित्र

नाशिक पंचवटीतील विविध कुंडांमध्ये स्नान करणारे यात्रेकरु व गोदाकाठावरील मंदिरे  दर्शविणारे १८व्या शतकातले जुने छायाचित्र

Vintage photograph of pilgrims and various temples on the banks of Godavari river at Panchavati, Nashik


 

अंकाई-टंकाई

#अंकाई-#टंकाई 

#Samuel_John_Neele  या ब्रिटिश अधिका-याने इसवी सन १८१७-१८१९ दरम्यान अंकाई-टंकाई किल्ल्याचे काढलेले रेखाचित्र.

#nashik #art #fort

Wednesday, 19 May 2021

आपले नाशिक : संक्षिप्त ओळख


आपले नाशिक : संक्षिप्त ओळख

https://www.youtube.com/watch?v=gx8BCsuR-sk

सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या वनवास काळात राम, लक्ष्मण व सीता यांचे नाशिक जवळील पंचवटीमध्ये वास्तव्य होते. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले. या शहराला “नाशिक” हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’ मधून वाहते . शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो.त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले.  “नऊ शिखरांचे शहर” म्हणून “नवशिख” आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी निगडीत आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) लक्ष्मणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे. 


पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अशी अनेक  नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. प्राचीन व ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. 

भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.

नाशिक जिल्हा 18.33 आणि 20.53 डिग्री उत्तर अक्षांश आणि 73.16 डिग्री आणि 75.16 डिग्री पूर्व रेषेच्या दरम्यान समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये स्थित आहे. जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते. अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले. गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक येथे स्थित आहे, ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते. पवित्र गोदावरी नदीचे उगम त्रिंबकेश्वर येथे आहे.

नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत. 

लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिस-या क्रमांकाचा जिल्हा आहे. येथे लोकसंख्या 61,09,522 लोक आणि 15,582 चौ.कि.मी. क्षेत्रफळ आहे. उत्तरेला धुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, दक्षिणपूर्व ओरंगाबाद जिल्हा, दक्षिणेकडील अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेला गुजरातचे वलसाड व नवसारी जिल्हे, आणि उत्तर पश्चिमेला डांग जिल्हा आहे. नाशिक किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही प्रसिद्ध अशी प्राचीन बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात मुख्यत्वे द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध  आहे. त्यामुळे भारताची नापा व्हॅली म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे.

नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या उत्तरभागी १९.३३ आणि २०.५३ या उत्तर अक्षांश व ७३.१६ आणि ७५.१६ या पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयात वसलेला आहे. जिल्हयातील सर्व नद्या सहयाद्रीपर्वतात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळतात उर्वरित जिल्हयाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्हयाचे दोन भाग होतात.या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांद्वारे सरते शेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीचे खो-यात वसलेला आहे. जिल्हयातील नद्यांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जिल्हयातील सर्व नद्या जिल्हयातच उगम पावतात. एकही जल प्रवाह जिल्हा बाहेरून नाशिक जिल्हयात येत नाही. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील जलप्रवाहाव्यतीरीक्त इतर सर्व जलप्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. जिल्हयाच्या पश्चिम सिमेवर सहयाद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्हयात अनेक डोंगर आहेत. जिल्हयातील बहुतेक सर्व डोंगर पश्चिमेकडील सहयाद्री पर्वताचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.

महाराष्ट्रतील सर्व विविधता नाशिक जिल्हयात दिसून येतात. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरूप आहेत.या तालुक्यातील वनात उत्कृष्ट प्रतिचा साग व इतर वनउपज मोठया प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात मोठया प्रमाणात आदीवासी राहतात. जिल्हयाच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रसारखी भाजीपाला, फळे आणि मोठया प्रमाणात उस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीता खालील क्षेत्र मुबलक असल्यामुळे दुधाकरीता आवश्यक असलेल्या हिरव्या चा-याची पिके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्हयात उत्पादन होणारा भाजीपाला मोठया प्रमाणात मुंबईला पुरविला जातो म्हणून नाशिक जिल्हयास मुंबईची परसबाग व गवळीवाडा असेही म्हणतात. पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिक जिल्हयाचे झपाटयाने औद्योगिकरण होत आहे. जिल्हयाच्या पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडा प्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन सुध्दा होते.

नाशिक प्रदेशाच्या अस्तित्वाचा उल्लेख पुरातन काळातील पाषाण युगापर्यंत जातो. तसेच पौराणिक उल्लेखानुसार थेट रामायण काळाशी संबंध येतो. प्रभु रामचंद्रांचे मुख्यत्वे वनवासातील बारा वर्षांचे पुनित वास्तव्य नाशिक परिसरात गोदावरीच्या काठी पंचवटीत होते. जिल्हयाचे मुख्यालय असलेले नाशिक शहर हे प्राचिन काळापासून तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. जिल्हयातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आणि सप्तशृंगीगड ही तर भाविकांची श्रध्दा स्थाने आहे.

सध्याचा नाशिक जिल्हयाचा बहुतांश भाग इ.स.१३१३ ते १३४७ या काळात देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली व त्यानंतर १४९० पर्यंत बहामणी राज्याचा एक भाग होता. इ.स. १४९० ते १६३६ या काळात तो अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट झाला होता. छत्रपती श्री.शिवाजी महाराजांनी मुस्लिम सत्तेच्या जोखाडातुन हा भाग मुक्त केला पेशवाईच्या अस्ता नंतर इ.स.१८१८ पासून हा सर्व भूभाग ब्रिटिशांचे अधिपत्याखाली गेला. मध्य युगात प्रशासकीय दृष्टया नाशिक जिल्हयाचा काही भाग अहमदनगर व काही भाग खांदेश जिल्यात होता. १८६९ मध्ये नाशिक हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. तेव्हा पासून १३ तालुके असलेल्या या जिल्ह्यात दि. २६.६.९९ पासून देवळा व त्र्यंबक या नविन तालुक्यांची निर्मिती होऊन एकुण १५ तालुके अस्तित्वात आले आहेत.

पौराणिक व ऐतिहासिक सांस्कृतिक पंपरेची संपन्नता लाभलेला नाशिक जिल्हा आता औद्योगिक क्षेत्रातही विकासाकडे वाटचाल करीत आहे. नाशिक जिल्हा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांकरिता प्रसिध आहे. नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर १२ ज्योतिलिगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आहे. नाशिक पासून ७२ कि.मी. अंतरावर वणीजवळ सप्तशृंगी देवीचे प्राचीन मंदीर असून तेथे दरवर्षी संपूर्ण देशातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने भेट देत असतात. जिल्हा परिषदे तर्फे नांदूरी येथे नवरात्र उत्सवाचे दरम्यान वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक येथे पंचवटी हे पवित्र धार्मिक स्थान असून जवळच भक्तीधाम व नाशिक रोड येथे मुक्तीधाम ही अत्याधुनिक साधनांनी तयार कलेली मंदीरे आहेत. नाशिक येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ पर्वणी काळात कुंभमेळा भरतो त्या करिता भारतातून लाखोंच्या संख्येने भाविक लोक नाशिकला येतात.

नाशिक जिल्हयाला तशी प्रारंभीपासूनच धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रभु रामचंद्राच्या पदपर्शाने पावित झालेला, पवित्र गोदावरीचे उगमस्थान असलेला, संप्तशृंगीगड, त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक स्थळांनी प्रसिध्द असलेला आणि कुंभमेळयामुळे जगात ओळख असलेल्या नाशिक जिल्हयाला ऐतिहासिक, धार्मिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. धार्मिक स्थळांमुळे प्रसिधद असलेल्या या जिल्हयाने औद्योगिकीकरणातही गरुडभरारी घेवून मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिक जिल्हयात १५ तालुके असून त्यातील ८ आदिवासी तालुके आहेत. अन्य तालुक्यातही आदिवासी समाजाची संख्या ब-यापैकी आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये डोंगर आणि दर्यां चाच मोठा भाग असल्याने या तालुक्यात अद्यापही दळणवळण यंत्रणा सर्वदूर पोहचलेली नाही. मालेगाव हा तालुका मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्याचा काही भाग हे कमी पावसाचे तर त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण जास्त पर्जन्याचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात २२ धरणे असून नाशिक तालुक्यातील गंगापूर हे मातीचे धरण म्हणून प्रसिध्द आहे.

नाशिक जिल्हयास समृद्ध असा सांस्कृतिक चेहराही लाभला आहे. प्रत्येक तालुक्याला वेगळी अशी सांस्कृतिक ओळख आहे. आदिवासी समाजाचे कोकणी नृत्य, लोकगीत, डोंग-यादेव उत्सव प्रसिध्द आहेत. विविध गावातील, समाजातील उत्सव, यात्रा, सण-समारंभ भिन्न असल्याने प्रत्येकाला एक वेगळा सांस्कृतिक व सामाजिक चेहरा प्राप्त झाला आहे. आदिवासी समाजाचा पेहरावदेखील त्यांच्या परंपरागत रुढी व्यवस्थेचे ओळखपण सांगणारा आहे.

जिल्हयातील प्रमुख व्यवसाय शेती असून द्राक्ष, कांदा, डाळिब व उसाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्हयात वायनरी उद्योगही मोठया प्रमाणात वाढला असून नाशिकला आता वाईन कॅपिटल ही नवीन ओळख मिळाली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील कांदयाची बाजारपेठ तर आशिया खंडात प्रसिध्द आहे. जिल्हयात पाच सहकारी साखर कारखाने तर दोन खाजगी साखर कारखाने आहेत. त्याचबरोबर भारत प्रतिभूती मुद्रणालय (इंडिया सिक्युरिटी प्रेस), करन्सी नोट प्रेस, ओझरे येथील विमान निर्मिती कारखान, एकलहरे येथील औष्णिक विज निर्मिती केंद्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामुळेही नाशिक जिल्हयाला विशेष महत्व आहे.





Monday, 17 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ४) लेणी क्रमांक ४ ते ९

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ४) 


लेणी क्रमांक  ४ ते ९

लेणे क्रमांक ४

लेणे क्रमांक ४ सद्यस्थितीत खूपच खराब अवस्थेत जीर्ण झालेले आहे. या लेण्याची शीर्षपट्टी भौमितिक नक्षीकामाने सजवलेली आहे व लाकूडकामाप्रमाणे 'डेंटील्स' ही कोरलेले आहेत. या लेणीसमूहातील सर्वच लेण्यांचे हे वैशिष्ट्य आहे. इथल्या सर्वच लेण्यांच्या कोरीवकामात हे सर्व बारकावे अतिशय नजाकतीने दाखवले आहेत. 

व्हरांड्यामध्ये दोन भित्तीस्तंभाच्यामध्ये दोन अष्टकोनी स्तंभ घंटाकार स्तंभशीर्षासहित कोरलेले आहेत. या स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत असून हत्तीवर राजपरिवार बसलेला दाखवला आहे. या लेण्याचा दरवाजा अतिशय साधा व अनलंकृत आहे. त्याच्या दोन्ही बाजुला जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. या लेण्याचा पृष्ठभाग हा बराच खोलगट केलेला आहे व त्यात पाणी साचलेले असते. कदाचित या लेण्यात पाणी झिरपत असल्यामुळे याचा निवासासाठी उपयोग बंद करुन ते पाण्याच्या टाक्यामध्ये रुपांतरीत केले असावे. या लेण्यामध्ये शिलालेख नाही.

बाहेरून दिसणारे लेणे क्रमांक ४


लेणे क्रमांक ४ चे स्तंभशीर्ष 


लेणे क्रमांक ४ चे स्तंभशीर्ष 


लेणे क्रमांक ४ मधून दिसणारे बाहेरचे दृष्य



लेणे क्रमांक ५

लेणे क्रमांक ५  हे एक अर्धवट खोदण्याचा प्रयत्न केलेले लेणे दिसते. एक चौकोनी कक्ष खोदण्याचा प्रयत्न इथे दिसतो. यात कोणतीही प्रतिमा किंवा शिलालेख नाहीत. भिंतीवर काही कोरण्याचा प्रयत्ने केलेला आहे, मात्र हे उत्कीरण अगदी अलिकडचे दिसते.

लेणे क्र.५

लेणे क्र.५ मधील कोरीवकामाचा प्रयत्न

लेण्या क्र .६-७-८ 

उजवीकडून डावीकडे लेणे क्रमांक ६,७,८,९ 



लेणे क्रमांक ६ या लेण्याची उंची इतर लेण्यांपेक्षा  बरीच उंच आहे. हे लेणे म्हणजे भिक्षूंसाठीच्या निवासासाठीचा कक्ष असावा. या लेण्यातील दोन अष्टकोणी स्तंभ पाहिल्यानंतर ग्रीको-रोमन वास्तुकलेतील इमारती आठवतात. येथील शिलालेखात हे लेणे एका व्यापा-याने खोदवून घेतले व ते संघाला अर्पण केल्याबाबत उल्लेख आहे. 

लेणे क्रमांक ७ म्हणजे एक छोटासा देवळीप्रमाणे चौकोनी कक्ष आहे. हा छोटासा कक्ष केवळ बसण्यासाठी उपयोगी असू शकतो.यातील शिलालेखानुसार ते तपसिनी नावाच्या महिला साध्वीने खोदवून घेऊन संघाला अर्पण केलेले आहे. 

लेणे क्रमांक ८ मध्ये दोन शिलालेख आहेत. त्यानुसार हे लेणे मुगुदासा नावाच्या कोळ्याने खोदवुन घेतले व संघाला भेट दिले आहे. 

बाहेरुन दिसणारे लेणे क्रमांक ६


बाहेरुन दिसणारे लेणे क्रमांक ६


लेणे क्रमांक ६ मधील शिलालेख


लेणे क्रमांक ७


लेणे क्रमांक ८

लेणे क्रमांक ९

हे लेणे निवासासाठी खोदलेले दिसते. याच्या आत विविध कक्ष खोदलेले आहेत. व्हरांड्यात दोन अष्टकोनी स्तंभ खोदले आहेत. स्तंभांच्यावर लेण्याच्या शीर्षपट्टीकेवर हत्ती, वृषभ इ. प्राणी विविध मुद्रांमध्ये कोरलेले आहेत. हत्तींवर माहूत आरुढ आहेत तर एका हत्तीने आपल्या सोंडेत एका मनुष्याला पकडलेले दिसत आहे. वृषभ ही क्रीडांमध्ये रत असलेले कोरले आहेत. या लेण्यात कोणताही शिलालेख नाही.

लेणी क्र.९  (बाजूला लेणे क्र.८ ही दिसत आहे)


लेणे क्रमांक ९


लेणे क्र.९ चा अंतर्भाग


लेणे क्र.९ चा व्हरांडा व स्तंभ


संकलन : अशोक दारके

(क्रमशः)



वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....