कसारा घाटातील अहिल्याबाई होळकर विहीर उर्फ टोपाची विहीर
https://youtu.be/KrLWUk4-p5M
मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम दिसते. हे बांधकाम म्हणजे सुमारे तीस ते पस्तीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात.
जुन्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर असलेले बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले. सुमारे २५० वर्षे जुनी असलेली ही विहीर अद्यापही सुस्थितीत व वापरात आहे. इतक्या उंचावर असूनही कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला भरपूर पाणी असते हा एक चमत्कारच मानावा लागेल.
अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षात आसेतुहिमाचल असंख्य तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत.
अशा या प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, रणरागिणी, धर्मपरायण व तपस्विनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!!!
No comments:
Post a Comment