Monday, 17 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ४) लेणी क्रमांक ४ ते ९

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ४) 


लेणी क्रमांक  ४ ते ९

लेणे क्रमांक ४

लेणे क्रमांक ४ सद्यस्थितीत खूपच खराब अवस्थेत जीर्ण झालेले आहे. या लेण्याची शीर्षपट्टी भौमितिक नक्षीकामाने सजवलेली आहे व लाकूडकामाप्रमाणे 'डेंटील्स' ही कोरलेले आहेत. या लेणीसमूहातील सर्वच लेण्यांचे हे वैशिष्ट्य आहे. इथल्या सर्वच लेण्यांच्या कोरीवकामात हे सर्व बारकावे अतिशय नजाकतीने दाखवले आहेत. 

व्हरांड्यामध्ये दोन भित्तीस्तंभाच्यामध्ये दोन अष्टकोनी स्तंभ घंटाकार स्तंभशीर्षासहित कोरलेले आहेत. या स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत असून हत्तीवर राजपरिवार बसलेला दाखवला आहे. या लेण्याचा दरवाजा अतिशय साधा व अनलंकृत आहे. त्याच्या दोन्ही बाजुला जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. या लेण्याचा पृष्ठभाग हा बराच खोलगट केलेला आहे व त्यात पाणी साचलेले असते. कदाचित या लेण्यात पाणी झिरपत असल्यामुळे याचा निवासासाठी उपयोग बंद करुन ते पाण्याच्या टाक्यामध्ये रुपांतरीत केले असावे. या लेण्यामध्ये शिलालेख नाही.

बाहेरून दिसणारे लेणे क्रमांक ४


लेणे क्रमांक ४ चे स्तंभशीर्ष 


लेणे क्रमांक ४ चे स्तंभशीर्ष 


लेणे क्रमांक ४ मधून दिसणारे बाहेरचे दृष्य



लेणे क्रमांक ५

लेणे क्रमांक ५  हे एक अर्धवट खोदण्याचा प्रयत्न केलेले लेणे दिसते. एक चौकोनी कक्ष खोदण्याचा प्रयत्न इथे दिसतो. यात कोणतीही प्रतिमा किंवा शिलालेख नाहीत. भिंतीवर काही कोरण्याचा प्रयत्ने केलेला आहे, मात्र हे उत्कीरण अगदी अलिकडचे दिसते.

लेणे क्र.५

लेणे क्र.५ मधील कोरीवकामाचा प्रयत्न

लेण्या क्र .६-७-८ 

उजवीकडून डावीकडे लेणे क्रमांक ६,७,८,९ 



लेणे क्रमांक ६ या लेण्याची उंची इतर लेण्यांपेक्षा  बरीच उंच आहे. हे लेणे म्हणजे भिक्षूंसाठीच्या निवासासाठीचा कक्ष असावा. या लेण्यातील दोन अष्टकोणी स्तंभ पाहिल्यानंतर ग्रीको-रोमन वास्तुकलेतील इमारती आठवतात. येथील शिलालेखात हे लेणे एका व्यापा-याने खोदवून घेतले व ते संघाला अर्पण केल्याबाबत उल्लेख आहे. 

लेणे क्रमांक ७ म्हणजे एक छोटासा देवळीप्रमाणे चौकोनी कक्ष आहे. हा छोटासा कक्ष केवळ बसण्यासाठी उपयोगी असू शकतो.यातील शिलालेखानुसार ते तपसिनी नावाच्या महिला साध्वीने खोदवून घेऊन संघाला अर्पण केलेले आहे. 

लेणे क्रमांक ८ मध्ये दोन शिलालेख आहेत. त्यानुसार हे लेणे मुगुदासा नावाच्या कोळ्याने खोदवुन घेतले व संघाला भेट दिले आहे. 

बाहेरुन दिसणारे लेणे क्रमांक ६


बाहेरुन दिसणारे लेणे क्रमांक ६


लेणे क्रमांक ६ मधील शिलालेख


लेणे क्रमांक ७


लेणे क्रमांक ८

लेणे क्रमांक ९

हे लेणे निवासासाठी खोदलेले दिसते. याच्या आत विविध कक्ष खोदलेले आहेत. व्हरांड्यात दोन अष्टकोनी स्तंभ खोदले आहेत. स्तंभांच्यावर लेण्याच्या शीर्षपट्टीकेवर हत्ती, वृषभ इ. प्राणी विविध मुद्रांमध्ये कोरलेले आहेत. हत्तींवर माहूत आरुढ आहेत तर एका हत्तीने आपल्या सोंडेत एका मनुष्याला पकडलेले दिसत आहे. वृषभ ही क्रीडांमध्ये रत असलेले कोरले आहेत. या लेण्यात कोणताही शिलालेख नाही.

लेणी क्र.९  (बाजूला लेणे क्र.८ ही दिसत आहे)


लेणे क्रमांक ९


लेणे क्र.९ चा अंतर्भाग


लेणे क्र.९ चा व्हरांडा व स्तंभ


संकलन : अशोक दारके

(क्रमशः)



No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....