Friday, 30 April 2021
दादासाहेब फाळके यांची १५१ वी जयंती
आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची १५१ वी जयंती आहे.
भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव ‘धुंडिराज गोविंद फाळके’ असे होते. त्याचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर येथे झाला. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच अत्यंत उत्तम लेखक व पटकथाकार देखील होते. आपल्या उण्यापु-या १९ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी ९५ हून अधिक चित्रपट निर्माण केले.
दादासाहेब फाळके यांना कलाविषयात रस असल्यामुळे १८८५ मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तसेच त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून पुढचे शिक्षण देखील पूर्ण केले. १८९०मध्ये दादासाहेब वडोदरा येथे काही काळ छायाचित्रकार म्हणूनही काम केले.
त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी आपली प्रिंटींग प्रेस सुरू केली. भारतीय कलाकार राजा रवी वर्मा यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते प्रथमच भारताबाहेर जर्मनीला गेले असताना तिथे त्यांनी आपल्या जीवनातील पहिला चित्रपट ‘दि लाइफ ऑफ क्राइस्ट’ पाहिला आणि अशाच पद्धतीने भारतीय पुराणांवर आधारीत चित्रपट बनवण्याचे ठरवले. पहिला चित्रपट करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.
अखेर इसवी सन १९१३ मध्ये दादासाहेबांनी सुमारे १५ हजार रुपये खर्चून पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. स्वत: दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्रमध्ये अभिनय केला होता. त्यांच्या पत्नीने पोशाख तयार केले तर मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली होती. कोणतीही महिला काम करण्यास तयार नसल्यामुळे दादासाहेबांच्या चित्रपटात स्त्री पात्राची भूमिकाही एका पुरुषाने साकारली होती. हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईतील कोरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे दादासाहेब फाळके यांनी भारतात चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली.
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर "मोहिनी भस्मासुर" हा दुसरा चित्रपट तयार केला व पुढे "सावित्री सत्यवान" हा तिसरा चित्रपट पुढे घेतला आणि चित्रपट निर्मिती मध्ये त्यांनी ऐतिहासिक पाऊल ठेवले. "श्रीकृष्ण - जन्म " हा चित्रपट काढताना त्यांनी आपली कन्या मंदाकिनी वय वर्ष ६ हिचेकडून या चित्रपटातील सृष्टीत कृष्णाचे पात्र साकारले
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रसंगी आपल्या पॉलिसी विकून तसेच घरातील दागदागिने विकून दादासाहेब यांनी मराठी चित्रपट निर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले. अनेकदा परदेशात जाऊन तेथील नवनवीन तंत्रज्ञान काळजीपूर्वक आत्मसात केले, तेथील आवश्यक साहित्य खरेदी केले आणि आपली चित्रपट निर्मिती चालु ठेवली. मूकपटांच्या जमान्यात दादासाहेब फाळके हे बाह्य चित्रणावर भर देत देवळे आणि घाट या वास्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून घेतला. पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगी चित्रपट निर्मितीच्या वेळेस अनंत अडचणी त्याठिकाणी येत होत्या. चित्रपट चालवतानाही खूप अडचणी यायच्या परंतु दादासाहेब फाळके यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती, क्लुप्त्या वापरून बरेच शो हाउसफुल केले. दादासाहेब फाळके यांनी खूप काबाडकष्ट करत चित्रपट निर्मिती सुरु ठेवली. मात्र त्यांना आयुष्यभर उपेक्षा आणि हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या.
त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या नावाने दादासाहेब फाळके पारितोषिक सुरू करण्यात आले. भारत सरकार तर्फे दरवर्षी भारतीय सिनेमांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञानाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा आहे आणि हा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिला जातो.
त्यांच्या पवित्र स्मृतींना १५१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#DadaSahebPhalke
Thursday, 29 April 2021
राजा रविवर्मा जयंती
आपल्या घराघरात पुजल्या जाणा-या देवीदेवतांची व थोर व्यक्तिमत्वाची चित्रे अजरामर करणा-या राजा रवी वर्मा यांची आज १६९वी जयंती. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tuesday, 27 April 2021
Maha Info mobile app
आता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असलेले बेड्स, ॲाक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, हेल्पलाईन व संबंधित माहिती एका क्लिक वर... खाली दिलेल्या ॲपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद 🙏🏻
हे ॲप नाशिक येथील आदित्य दारके या १४ वर्षाच्या न्यु इरा या शाळेतील इयत्ता ८वी तील विद्यार्थ्याने विकसित केले आहे.
या उपयुक्त अशा ॲपची माहिती व खाली दिलेली लिंक कृपया इतर गृपवर शेअर करा.
#MahaCovid #Nashik #Pune #Nagpur #Thane #Ahmednagar #Aurangabad #NaviMumbai #Panvel
https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.mahainfo
हनुमान जयंती
मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।
आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मतिथी होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. नाशिकच्या जवळ असलेल्या अंजनेरी पर्वतावर अंजनीमातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते.
आजच्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अंजनेरी पर्वतावरील हनुमान जन्म क्षेत्राचे दर्शन घेऊयात व अखिल मानवजातीवर आलेले कोरोना विषाणूचे संकट निवारण व्हावे म्हणून महारूद्र हनुमानाची मनोभावे प्रार्थना करुया...
संकट कटै मिटै सब पीरा|
जो सुमिरै हनुमत बलबीरा||
#हनुमान_जयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा
#हनुमानजयंती #hanuman #hanumanjayanti #HanumanJayanti2021
Monday, 26 April 2021
कोरोनाला हरवणा-या कुटुंबाची प्रेरणादायी गोष्ट
प्रेरणादायी : कोरोनाला हरवणाऱ्या कुटुंबाची गोष्ट...
४ वर्षांचा चिमुरडा ते ६२ वर्षांचे आजोबा, कुटुंबातील सर्व १८ जणांनी कोरोनावर अशी केली मात'
"एक एकजण आजारी पडू लागलं. कोण इथे खोकतंय कोण तिथे शिंकतंय असं सगळं वातावरण सुरू झालं. आणि मग भीती वाटू लागली."
नेहाली पवार कोरोना व्हायरसच्या संसर्गानं त्यांच्या घराची काय अवस्था झाली, याविषयी सांगतात. 18 जणांचं हे एकत्र कुटूंब मुंबईत वडाळ्याच्या एका वस्तीत राहतं. तिथं आसपास झोपडपट्टी आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्या, तरी त्यांचं स्वतंत्र नऊ खोल्यांचं घर आहे.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जण दिवसभर घरी असल्यानं इतर सर्वांसारखाच हा परिवारही रोजचा दिवस साजरा करत होता. नवनव्या रेसिपीज, गेम्स, गाणी, पत्ते, पहाटेपर्यंत जागरणं असा माहौल होता. पण महिनाभरातच त्या आनंदाला कोव्हिड-१९चं गालबोट लागलं. तरीही त्या संकटावर पवार कुटुंबीयांनी यशस्वीरित्या मात केली.
'केवळ एका चुकीमुळे सर्वांना लागण'
नेहाली सांगतात की, घरात मजा सुरू असली, तरी सगळे जमेल तेवढी काळजी घेत होते. "डॉक्टर, WHO, सरकार जे जे नियम सांगत होतो, ते आम्ही सगळे पाळत होतो. हात स्वच्छ धुणं, बाहेरून आणलेल्या वस्तू आणि भाज्या धुवून स्वच्छ करून वापरणं, घरातली स्वच्छता, सॅनिटायझर, गाडी साफ करणं, बाहेर जाणाऱ्यांचे कपडे गरम पाण्यानं धुणं, लवंग-दालचिनिचा चहा, गरम पाणी पिणं, शक्य असेल ते आम्ही करत होतो."
स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रात असल्यानं नेहाली लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरूनच काम करत होत्या. पण आपल्या घरापर्यंत कोव्हिड येईल की काय याची चिंताही त्यांना वाटायची. कारण त्यांच्या घरातील काही व्यक्तींना कामासाठी बाहेर पडावं लागत होतं.
नेहाली यांचे पती अमित पवार एका खाजगी रुग्णालयात अत्यावश्यक सेवेत काम करतात. त्यामुळं ते कधी कधी सलग दोन-तीन दिवस ड्यूटीवर असायचे. त्यांचे एक दीरही सिक्युरीटीमध्ये काम करतात. ते दोघं रोज एकत्रच कामावर जायचे. नेहाली यांचे एक सासरे त्यांच्या परिसरात समाजकार्यात सक्रीय होते.
"आमचं चुकलं असेल तर एकच की जो बाहेर जाणारा व्यक्ती असतो, त्यालाही आपल्यापासून थोडं वेगळं ठेवावं लागतं. म्हणजे त्याला संसर्ग झाला तर पूर्ण परिवाराला होऊ नये. आम्ही ते केलं नाही. आपण भावनिक असतो, सगळे एकत्र जमून मजा करतायत, एकाला लांब ठेवणं पटत नाही. माझे पती दिवस-दिवस बाहेर जायचे, पण जेव्हा घरी यायचे तेव्हा आम्ही सगळे एकत्र मिसळून राहायचो."
कोव्हिड झाल्याचं कसं कळलं?
अमित पवार यांना २१ एप्रिल रोजी रात्रपाळीवरून परतल्यावर ताप आला आणि दोन तासांत तो उतरलाही. "आपली एक साधारण अशी समजूत असते की कोरोना झालेला माणूस असा खोकतो, शिंकतो. पण त्यांना असं काही अजिबात होत नव्हतं. त्यामुळं ताप आल्याचं फार मनावर घेतलं नाही. गार पाण्यानं आंघोळ केल्यानं ताप चढला असेल, कूलर लावल्यानं कफ झालं असेल अशा मनाच्या ढाली आपण पुढे करतो," असं नेहाली सांगतात.
अमित दिवसभर झोपून होते आणि काहीही खाल्लं तरी तोंडाला चव लागत नव्हती, ना कसला वास येत होता. "तेव्हा घाबरायला झालं, की हे काहीतरी वेगळं आहे. पण ही लक्षणं कोव्हिडची आहेत, हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं." असं नेहाली सांगतात.
२५ एप्रिलला एका कोव्हिड स्क्रीनिंग आणि टेस्ट कॅम्पचं आयोजन केलं होत. पवार कुटुंबीयांनी मग घरातल्या ज्या व्यक्ती बाहेर जातायत अशा पाच जणांची तपासणी करून घ्यायचं ठरवलं. अमित यांना ताप येऊन गेल्याचं कळल्यानं डॉक्टरांनी त्यांची स्वॉब टेस्ट केली.
चार दिवसांनी, २८ एप्रिलला अमित कामावरही गेले. इकडे काही कर्मचारी PPE किट घालून पवार कुटूंबाच्या घराबाहेर आले आणि अचानक फवारणी करू लागले. अमित विजय पवार पॉझिटिव्ह आहेत, तर घरातून बाहेर येऊ नका, पुढच्या प्रक्रियेसाटी BMC वाले कॉल करतील असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी अमित यांना वडाळ्यातल्या रुग्णालयात नेण्यासाठी अँब्युलन्स आली.
नेहाली सांगतात, "तो क्षण असा होता की रडावं की काय करावं? मी जणू कोसळून पडले होते. यानंतर मी माझ्या नवऱ्याला परत कधी बघणार आहे का किंवा माझ्या कुटूंबामध्ये किती लोकांना लागण झाली असेल. हे कुटूंब रात्री साडेतीन वाजता आपण पत्ते खेळत होतो, हा दिवस आपण परत बघणार आहोत का?"
टेस्ट करून घेण्यातल्या अडचणी
घरात स्वतंत्र टॉयलेट्स असल्यानं पवार कुटूंबाला घरातच क्वारंटाईन होण्याची परवानगी मिळाली. पण त्यांची टेस्ट कधी आणि कशी होणार किंवा कुणी आजारी पडलं तर काय करायचं याविषयी चित्र स्पष्ट नव्हतं. पुढच्या काही दिवसांत एकामागोमाग एक घरातली माणसं आजारी पडू लागली.
"आम्ही रोज BMC ला कॉल करायचो, पण किट्स उपलब्ध नाहीत असं उत्तर मिळालं. तशात तीन दिवस निघून गेले. खासगी टेस्टिंगचा पर्याय तेव्हा बंद होता. आमच्या हातावर क्वारंटाईन स्टँप असल्यानं आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. आणि कुणी घरी येऊन टेस्ट करायला तयार नव्हतं.."
नेहाली यांचे एक दीर शिरीष पवार कलाकार आहेत. त्यांनी शेवटी फेसबुक लाईव्हचा आधार घेतला. मग सोशल मिडिया आणि स्थानिक टीव्ही चॅनेलनं हा विषय उचलून धरला. अखेर दोन मे रोजी बीएमसीच्या पथकानं लक्षणं असलेल्या सात जणांची टेस्ट केली. सातहीजण पॉझिटिव्ह आले आणि कुटूंबाची ताटातूट झाली.
क्वारंटाईनमधला काळ
कुटुंबातील अठरा जणांपैकी आठजण आयसोलेशन वॉर्डमध्ये अॅडमिट होते. तर बाकी दहाजण विलगीकरणात होते. त्यांच्यात लहान मुलं होती. एक पंधरा वर्षांचा मुलगा, एक बारा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा. आई-वडिलांशिवाय राहाणाऱ्या पुतण्यासाठी तर हे दिवस भयंकर होते असं नेहाली सांगतात.
"चार वर्षांच्या मुलासाठी हा खूप मोठा धक्का होता इतका मोठा की मला माया करणारे, भरवणारे, मांडीवर घेणारे अचानक मला हातच लावत नाहीये कोणी. मला जवळ घेत नाहीयेत, माझं सामान वेगळं वेगळं ठेवतात. आजही तो मला विचारतो, छोटी मम्मा, मी तुझ्या जवळ येऊ ना? तुला मिठी मारू ना?"
घरातील वयोवृद्धांसाठीही हा कठीण काळ होता. "मोठ्या सासऱ्यांना सेव्हन हिल्सला अॅडमिट केलेलं, ते ६२ वर्षांचे आहेत आणि त्यांना ऑक्सिजनवर ठेवलं होतं. दुसऱ्या नंबरचे सासरे साठ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेजेस आहेत. त्यांना ICU वॉर्डमध्ये ठेवलं होतं. दोघांना डायबिटीसही आहे."
स्वतः नेहाली यांना कुठलीही लक्षणं दिसत नव्हती. त्यांना आधी दोन दिवस क्वारंटाईनमध्ये आणि मग आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. "क्वारंटाईन सेंटरला रात्री एकदाच डॉक्टर यायचे. दिवसभरात तुम्हाला काय काय झालं हे त्यांना सांगावं लागयचं. आयसोलेशन वॉर्डमध्ये चोवीस तास नर्सेस होत्या. आपण जरी बरे असलो, तरी जिथे आहोत, तिथे आपल्या आसपास लक्षणं असलेले रुग्ण आहेत, त्यांच्यात राहून माणूस कुठेतरी आतून घाबरून जातो." असं त्या सांगतात.
"कोव्हिडवर नेमकं कुठलं औषध नसल्यानं केवळ व्हिटॅमिन, अँटिबायोटिक अशी औषध दिली जायची. जेवणाच्या बाबतीत स्वच्छतेचा दर्जा उत्तम होता. पण चव.. अर्थातच आपल्या तोंडाचीही चव गेलेली असते, काय खातोय हे समजत नाही."
"सेव्हन हिल्समध्ये घरचं जेवण नेण्याची परवानगी होती. मग पनवेलला राहणाऱ्या आत्यानं सासऱ्यांना रोज डबा पुरवला. समोर राहणाऱ्या ताईंनी, दादरला राहणाऱ्या माझ्या आईनंही मदत केली. समाधान आहे की चांगली माणसं पावलोपावली मिळाली, सगळ्यांनी आधार दिला."
कोव्हिडनं शिकवलेला धडा
सात मे रोजी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच पहिली आनंदाची बातमी आली. अमित यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पाठोपाठ पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये एक एक जण घरी परतले.
नेहमीच्या दिलखुलासपणेच घरी परतणाऱ्यांचं टाळ्यांच्या गजरात, नाचत गात स्वागत झालं. पण आयुष्य आता पूर्वीसारखं नाही, याचीही जाणीव सगळ्यांना झाली. सोशल डिस्टंसिंगचे नियम आता घरातही पाळावे लागणार आहेत, असं नेहाली म्हणाल्या.
"जी व्यक्ती बाहेर जाते आहे, त्याच्यापासून थोडं अंतर ठेवूयात. घरातही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या वस्तू वेगळ्या ठेवणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं आपल्याला जेवढं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे."
(जान्हवी मुळे, BBC मराठी)
Sunday, 25 April 2021
कोरोना गाईड
सध्या कोरोनाची लक्षणे दिसून त्याकडे दुर्लक्ष करताच कोरोना विषाणू फुफ्फुसांवर आक्रमण करताना दिसून आला आहे. फुफ्फुसांच्या सर्व भागांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी आणि फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी पोटावर झोपा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
या शिवाय कोरोनाच्या संसर्गात आणखी काय खबरदारी घ्यावी, याबाबतची माहिती सोबतच्या गाईडमध्ये दिली आहे.
मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो
इंडोनेशिया च्या जवळ असलेल्या समुद्रात स्थानिक मच्छीमार मासे पकडायला गेले होते, नेहमी प्रमाणे माश्याचे जाळे टाकायला जात असताना, त्यांना आज एक वेगळा अनुभव येणार होता.
त्यांचा नावेशेजारी एका देवमाश्याचे पिल्लू सारखे येत होते, देवमाशाच्या शिकारीवर जगभरात बंदी आहे. त्यामुळे सुरवातीला त्यांनी त्या पिल्लाकडे दुर्लक्ष केले, तरीही ते पिल्लू पुन्हा पुन्हा त्यांच्या बोटी जवळच येत होते.
शेवटी त्यांनी बोट थांबवली, तसे त्यांच्या लक्षात आले की या देवमाश्याच्या बाळाला आपली मदत हवी आहे,आणि त्यासाठीच तर ते बोटी जवळ येत आहे. झाले असे होते की, या माशाच्या पूर्ण शरीरावर एक भला मोठ्ठा दोरखंड गुंडाळला गेला होता,ज्यामुळे तो मासा त्याचे पंख हलवू शकत नव्हता, आणि त्याला खोल समुद्रात तळाशी जाता येत नव्हते.
शेवटी त्याने मनुष्याला मदतीची विनंती कशी केली, आणि त्यानंतर त्याने आपली शेपटी हलवून सगळ्यांना कसे thanks सुद्धा केले ते नक्की पहाच...
शेवटी मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो!
Saturday, 24 April 2021
Friday, 23 April 2021
खाजगी हॉस्पिटल्सची यादी
नाशिक मधील कार्यरत असलेली खाजगी हॉस्पिटल्सची यादी. कदाचित कुणा गरजू रुग्णाला उपयोगी पडू शकेल. कृपया सर्वत्र शेअर करा.
Thursday, 22 April 2021
डॉ. रखमाबाई राऊत
#अस्मिता
डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५५ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... 'नो मिन्स नो' हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.
भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर
ज्या काळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ.... त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई... डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत... भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख... भारतातली पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदीबाई जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही... भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं.
'मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही'
रखमाबाईची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी... अठराव्या शतकात मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं धाडस या रखमेनं दाखवलं... रखमाबाईची ही गोष्ट सुरू होते मुंबईत... रखमाबाईंच्या आईचं १४ व्या वर्षी लग्न झालं, १५ व्या वर्षी मूल झालं आणि १७ व्या वर्षी त्या विधवा झाल्या... अवघ्या चार वर्षांत आईची झालेली पानगळ रखमाला माहीत होती... तीच कदाचित बालविवाहाविरोधातल्या असंतोषाची ठिणगी होती... तरीही ११ व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न १९ वर्षांच्या भिकाजी दादाजी यांच्याशी लावून देण्यात आलं. त्यानंतर रखमाच्या आईनं दुसरं लग्न केलं. रखमाचे सावत्र वडील डॉक्टर सखाराम अर्जुन हे सुदैवानं मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते... लग्न झाल्यावरही रखमा माहेरीच राहात होती... आणि शिकतही होती. रखमाचा नवरा अतिशय वाईट प्रवृत्तीचा आणि बाहेरख्याली होता... म्हणूनच त्याच्याबरोबर राहायचं नाही, असा निर्णय रखमानं घेतला.
भारतातला पहिला घटस्फोटाचा खटला
रखमा आपल्याबरोबर राहात नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. १८८४ साली भारतातल्या पहिल्या घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला... मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही, हे रखमेनं कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला दोन पर्याय दिले... 'एक तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला जा... नाही तर कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुरुंगात जा...' त्यावेळी, या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन, असं रखमाबाईंनी कोर्टाला ठणकावलं.
रखमाचा अभूतपूर्व युक्तीवाद
'नो मिन्स नो' हा अलीकडच्या पिंक सिनेमातला अमिताभचा गाजलेला डायलॉग रखमेनं अठराव्या शतकातच वापरला होता. त्या काळी हा खटला प्रचंड गाजला. तत्कालीन ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली होती. 'लग्न म्हणजे काय, हे कळण्याचंही माझं वय नाही, त्या वयात माझ्यावर हे लग्न लादलं गेलं, त्यामुळे माझ्यावर या लग्नाची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही' हा तिचा युक्तीवाद त्याकाळी अभूतपूर्व ठरला.
विचारवंतांची मिळाली साथ
तत्कालीन समाजाला सणसणीत चपराख देणारा हा युक्तीवाद होता. बॉम्बे हायकोर्टात सर्वाधिक गाजलेल्या खटल्यांमध्ये या युक्तीवादाचा समावेश होतो. या खटल्यात रखमेला साथ देण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. बेहरामजी मलबारी, रमाबाई रानडेंनी पुढे येऊन रुकमाबाई संरक्षण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून रखमाबाईंचा खटला जगापुढे आणण्यात आला आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यावेळी पंडिता रमाबाई लिहितात... 'मुलींसाठी शिक्षण आणि त्यांचं सबलीकरण सरकारनं सुरू केलंय, पण जेव्हा एखादी महिला गुलामी करणं नाकारते, त्यावेळी मात्र सरकार तिचं खच्चीकरण करतं... आणि कायदाही त्या महिलेचे पाय खेचण्याचंच काम करतो'
'लग्न लादलं जातंय'
हा खटला सुरू असताना २६ जून १८८५ ला रखमाबाईंनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला एक पत्रंही लिहिलं, त्यात त्या म्हणतात... 'बालविवाहाच्या या अनिष्ट प्रथेनं माझ्या आयुष्यातला आनंदच हिरावून घेतलाय. मला बरंच शिकायचंय, आयुष्यात बरंच काही करायचंय, पण हे लग्न त्या सगळ्याच्या आड येतंय. माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हे लग्न लादलं जातंय'
घटस्फोटाचा इतिहास
चार वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला... या लग्नातून रखमेला मुक्त करण्यासाठी दादाजीनं पैसे घेतले.... आणि रखमा या लग्नातून मोकळी झाली. तिथेही इतिहास घडला... आताच्या काळातही नवऱ्याकडून बायकोला पोटगी मिळते. पण भारतातल्या पहिल्या घटस्फोटाच्या खटल्यात रखमेनं तिच्या नवऱ्याला पैसे दिले आणि सेटलमेंट केली. त्यावेळी रखमेला अनेक समाजसुधारकांनी खटल्यासाठीचे पैसे देण्याची तयारी दाखवली, पण रखमेनं ती नाकारली... ब्रिटीशांचं राज्य असलेल्या भारतातला हा खटला अनेकार्थानं ऐतिहासिक ठरला... लग्नावेळी मुलीचं वय, सहमती आणि तिची निवड याबद्दल यानिमित्तानं पहिल्यांदाच बोललं गेलं.
फिनिक्स भरारी
या लग्नातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रखमेनं त्यानंतर फिनिक्स भरारी घेतली. रखमेनं आधी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि १८८९ साली London School of Medicine for Women मध्ये तिनं प्रवेश घेतला. १८९४ साली डॉक्टर होऊन ती भारतात परतली. सूरतमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून तिनं भूमिका बजावली. तिनं परत लग्न केलं नाही आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत सामाजिक कार्यात ती सक्रिय राहिली. ९१ व्या वर्षी डॉ. रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.
प्रेरणादायी प्रवास
डॉ. रखमाबाई राऊतांचा हा प्रवास, हा लढा अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरला... रखमाबाईच्या न्यायालयीन लढ्यामुळे १८९१ सालचा Age of Consent Act प्रत्यक्षात आला. रखमाबाईंकडून प्रेरणा घेऊन त्या काळात अनेक महिलांनी डॉक्टरकीची आणि सामाजिक कार्याची वाट धरली... अठराव्या शतकात जी अशक्य कोटीतली गोष्ट होती, ती रखमेनं करुन दाखवली... तिचा तो उठाव, ते बंड आणि तो आत्मविश्वास यामुळेच भविष्यातलं चित्र बदललं.
Tuesday, 20 April 2021
अहिल्याराम
अहिल्येचा राम म्हटलं की आपल्याला दगडी शिळेतून अहिल्येचा उद्धार करणारे प्रभु राम आठवतात. पण या व्यतिरिक्त आणखी एक अहिल्या होऊन गेली जिचे नाव प्रभु रामाबरोबर जोडले गेले आहे, ती अहिल्या म्हणजे पुण्यश्लोक साध्वी अहिल्याबाई होळकर. आणि जिथे अहिल्याबाईंचे नाव रामाबरोबर जोडले गेले ते स्थळ आहे नाशिक.
आज रामनवमीनिमित्त आपण अशाच एका फारश्या ज्ञात नसलेल्या राम मंदिराची माहिती जाणून घेऊयात.
अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात अनेक मंदिरे उभारली, नद्यांवर घाट बांधले. नाशिकमध्ये पण त्यांनी बरीच कामे केली. त्यातील एक आहे अहिल्याराम मंदिर.१७८६ साली ह्या मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले. हे मंदिर एका वाड्यात असल्याने त्याचा कळस बाहेरुन दिसत नाही.
सध्या लॉकडाऊन असल्याने मंदिर आपल्याला बंदच आहे. रामकुंडाजवळ असलेले हे मंदिर जरा उंचावर आहे. पंधरा वीस दगडी पाय-या चढुन गेल्यावर दिसतो सुंदर लाकडी दरवाजा. जणू अगदी नुकताच पॉलिश केलेला. आत गेल्यावर समोरच दिसते श्रीरामाची संगमरवरी सुंदर, गोजिरवाणी मुर्ती. चेह-यावर मोहक हास्य.
हा आहे धनुर्धारी राम. इतर मंदिरात आपण पहातो की रामाच्या खांद्यावर धनुष्य असते.पण या मुर्तीत एक वेगळेपण आहे. श्रीरामाचे दोन्ही हात सरळ खाली आहेत. एका हातात धनुष्य आहे तर दुस-या हातात बाण आहे. राम,लक्ष्मण, सितेच्या या मुर्ती एका सुबक,नक्षीदार शिसवी देव्हाऱ्यात स्थित आहेत. काही वर्षांपूर्वी काळाराम मंदिरात चांदीचे मखर,देव्हारा करण्याचे ठरवले. त्यावेळी तेथील ट्रस्टींनी येथे आवर्जून भेट दिली.चांदीचे मखर, देव्हारा बनवताना त्यांनी अहिल्याराम मंदिरातील डिझाइन डोळ्यासमोर ठेवले होते.
श्रीरामाच्या पायाजवळ खाली एका छोट्या कोनाड्यात अहिल्याबाई होळकरांची एक सुरेख मुर्ती आहे, तर समोर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे.
मंदिर थोडे उंचीवर असल्याने रस्त्यावरील रहदारीचा आवाज जाणवतही नाही. आत गेल्यावरच एक प्रकारची शितलता जाणवते. मंदिर दगडी बांधणीचे आहे. पुढच्या सभामंडपात असलेले लाकडी खांब, ओव-या, पडवीत झुलत असलेला झोपाळा, बाजुला असलेल्या खिडकीतून दिसणारा पंचवटीचा परीसर... वातावरणात एक प्रकारचे पावित्र्य भरलेले जाणवते.
मंदिराची मालकी क्षेमकल्याणी कुटुंबाकडे आहे. त्यांनी मंदिराची देखभाल, व्यवस्था अगदीच अप्रतिम ठेवली आहे.आज रामनवमी. श्रीरामाचा जन्मोत्सव थाटात साजरा होईल. पण आपल्याला तो अनुभवता येणार नाही.
पण घरातच थांबुन हे संकट दुर करण्यासाठी रामालाच विनवु या.कारण तोच तर या. संकटातुन आपल्याला बाहेर काढणारा आहे.
।।आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।।
।।लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम्।।
अर्थात..
सर्व आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम.. त्याला मी पुनः पुनः नमस्कार करतो.
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻
(कॉपी पेस्ट)
Subscribe to:
Posts (Atom)
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...
-
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) 'भद्रं करोति इति भद्रकाली | ' भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी ...
-
आज #गोदावरी #जन्मोत्सव... गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. #भगवान ...