Friday, 30 April 2021

दादासाहेब फाळके यांची १५१ वी जयंती

आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची १५१ वी जयंती आहे. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव ‘धुंडिराज गोविंद फाळके’ असे होते. त्याचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर येथे झाला. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच अत्यंत उत्तम लेखक व पटकथाकार देखील होते. आपल्या उण्यापु-या १९ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी ९५ हून अधिक चित्रपट निर्माण केले. दादासाहेब फाळके यांना कलाविषयात रस असल्यामुळे १८८५ मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तसेच त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून पुढचे शिक्षण देखील पूर्ण केले. १८९०मध्ये दादासाहेब वडोदरा येथे काही काळ छायाचित्रकार म्हणूनही काम केले. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी आपली प्रिंटींग प्रेस सुरू केली. भारतीय कलाकार राजा रवी वर्मा यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते प्रथमच भारताबाहेर जर्मनीला गेले असताना तिथे त्यांनी आपल्या जीवनातील पहिला चित्रपट ‘दि लाइफ ऑफ क्राइस्ट’ पाहिला आणि अशाच पद्धतीने भारतीय पुराणांवर आधारीत चित्रपट बनवण्याचे ठरवले. पहिला चित्रपट करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना सहा महिने लागले. अखेर इसवी सन १९१३ मध्ये दादासाहेबांनी सुमारे १५ हजार रुपये खर्चून पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. स्वत: दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्रमध्ये अभिनय केला होता. त्यांच्या पत्नीने पोशाख तयार केले तर मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली होती. कोणतीही महिला काम करण्यास तयार नसल्यामुळे दादासाहेबांच्या चित्रपटात स्त्री पात्राची भूमिकाही एका पुरुषाने साकारली होती. हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईतील कोरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे दादासाहेब फाळके यांनी भारतात चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर "मोहिनी भस्मासुर" हा दुसरा चित्रपट तयार केला व पुढे "सावित्री सत्यवान" हा तिसरा चित्रपट पुढे घेतला आणि चित्रपट निर्मिती मध्ये त्यांनी ऐतिहासिक पाऊल ठेवले. "श्रीकृष्ण - जन्म " हा चित्रपट काढताना त्यांनी आपली कन्या मंदाकिनी वय वर्ष ६ हिचेकडून या चित्रपटातील सृष्टीत कृष्णाचे पात्र साकारले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रसंगी आपल्या पॉलिसी विकून तसेच घरातील दागदागिने विकून दादासाहेब यांनी मराठी चित्रपट निर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले. अनेकदा परदेशात जाऊन तेथील नवनवीन तंत्रज्ञान काळजीपूर्वक आत्मसात केले, तेथील आवश्यक साहित्य खरेदी केले आणि आपली चित्रपट निर्मिती चालु ठेवली. मूकपटांच्या जमान्यात दादासाहेब फाळके हे बाह्य चित्रणावर भर देत देवळे आणि घाट या वास्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून घेतला. पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगी चित्रपट निर्मितीच्या वेळेस अनंत अडचणी त्याठिकाणी येत होत्या. चित्रपट चालवतानाही खूप अडचणी यायच्या परंतु दादासाहेब फाळके यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती, क्लुप्त्या वापरून बरेच शो हाउसफुल केले. दादासाहेब फाळके यांनी खूप काबाडकष्ट करत चित्रपट निर्मिती सुरु ठेवली. मात्र त्यांना आयुष्यभर उपेक्षा आणि हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या नावाने दादासाहेब फाळके पारितोषिक सुरू करण्यात आले. भारत सरकार तर्फे दरवर्षी भारतीय सिनेमांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञानाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा आहे आणि हा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिला जातो. त्यांच्या पवित्र स्मृतींना १५१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#DadaSahebPhalke

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....