Monday, 26 April 2021

कोरोनाला हरवणा-या कुटुंबाची प्रेरणादायी गोष्ट

प्रेरणादायी : कोरोनाला हरवणाऱ्या कुटुंबाची गोष्ट...


४ वर्षांचा चिमुरडा ते ६२ वर्षांचे आजोबा, कुटुंबातील सर्व १८ जणांनी कोरोनावर अशी केली मात'

"एक एकजण आजारी पडू लागलं. कोण इथे खोकतंय कोण तिथे शिंकतंय असं सगळं वातावरण सुरू झालं. आणि मग भीती वाटू लागली."

नेहाली पवार कोरोना व्हायरसच्या संसर्गानं त्यांच्या घराची काय अवस्था झाली, याविषयी सांगतात. 18 जणांचं हे एकत्र कुटूंब मुंबईत वडाळ्याच्या एका वस्तीत राहतं. तिथं आसपास झोपडपट्टी आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्या, तरी त्यांचं स्वतंत्र नऊ खोल्यांचं घर आहे.

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जण दिवसभर घरी असल्यानं इतर सर्वांसारखाच हा परिवारही रोजचा दिवस साजरा करत होता. नवनव्या रेसिपीज, गेम्स, गाणी, पत्ते, पहाटेपर्यंत जागरणं असा माहौल होता. पण महिनाभरातच त्या आनंदाला कोव्हिड-१९चं गालबोट लागलं. तरीही त्या संकटावर पवार कुटुंबीयांनी यशस्वीरित्या मात केली.

'केवळ एका चुकीमुळे सर्वांना लागण'
नेहाली सांगतात की, घरात मजा सुरू असली, तरी सगळे जमेल तेवढी काळजी घेत होते. "डॉक्टर, WHO, सरकार जे जे नियम सांगत होतो, ते आम्ही सगळे पाळत होतो. हात स्वच्छ धुणं, बाहेरून आणलेल्या वस्तू आणि भाज्या धुवून स्वच्छ करून वापरणं, घरातली स्वच्छता, सॅनिटायझर, गाडी साफ करणं, बाहेर जाणाऱ्यांचे कपडे गरम पाण्यानं धुणं, लवंग-दालचिनिचा चहा, गरम पाणी पिणं, शक्य असेल ते आम्ही करत होतो."

स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रात असल्यानं नेहाली लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरूनच काम करत होत्या. पण आपल्या घरापर्यंत कोव्हिड येईल की काय याची चिंताही त्यांना वाटायची. कारण त्यांच्या घरातील काही व्यक्तींना कामासाठी बाहेर पडावं लागत होतं.

नेहाली यांचे पती अमित पवार एका खाजगी रुग्णालयात अत्यावश्यक सेवेत काम करतात. त्यामुळं ते कधी कधी सलग दोन-तीन दिवस ड्यूटीवर असायचे. त्यांचे एक दीरही सिक्युरीटीमध्ये काम करतात. ते दोघं रोज एकत्रच कामावर जायचे. नेहाली यांचे एक सासरे त्यांच्या परिसरात समाजकार्यात सक्रीय होते.

"आमचं चुकलं असेल तर एकच की जो बाहेर जाणारा व्यक्ती असतो, त्यालाही आपल्यापासून थोडं वेगळं ठेवावं लागतं. म्हणजे त्याला संसर्ग झाला तर पूर्ण परिवाराला होऊ नये. आम्ही ते केलं नाही. आपण भावनिक असतो, सगळे एकत्र जमून मजा करतायत, एकाला लांब ठेवणं पटत नाही. माझे पती दिवस-दिवस बाहेर जायचे, पण जेव्हा घरी यायचे तेव्हा आम्ही सगळे एकत्र मिसळून राहायचो."

कोव्हिड झाल्याचं कसं कळलं?
अमित पवार यांना २१ एप्रिल रोजी रात्रपाळीवरून परतल्यावर ताप आला आणि दोन तासांत तो उतरलाही. "आपली एक साधारण अशी समजूत असते की कोरोना झालेला माणूस असा खोकतो, शिंकतो. पण त्यांना असं काही अजिबात होत नव्हतं. त्यामुळं ताप आल्याचं फार मनावर घेतलं नाही. गार पाण्यानं आंघोळ केल्यानं ताप चढला असेल, कूलर लावल्यानं कफ झालं असेल अशा मनाच्या ढाली आपण पुढे करतो," असं नेहाली सांगतात.

अमित दिवसभर झोपून होते आणि काहीही खाल्लं तरी तोंडाला चव लागत नव्हती, ना कसला वास येत होता. "तेव्हा घाबरायला झालं, की हे काहीतरी वेगळं आहे. पण ही लक्षणं कोव्हिडची आहेत, हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं." असं नेहाली सांगतात.

२५ एप्रिलला एका कोव्हिड स्क्रीनिंग आणि टेस्ट कॅम्पचं आयोजन केलं होत. पवार कुटुंबीयांनी मग घरातल्या ज्या व्यक्ती बाहेर जातायत अशा पाच जणांची तपासणी करून घ्यायचं ठरवलं. अमित यांना ताप येऊन गेल्याचं कळल्यानं डॉक्टरांनी त्यांची स्वॉब टेस्ट केली.

चार दिवसांनी, २८ एप्रिलला अमित कामावरही गेले. इकडे काही कर्मचारी PPE किट घालून पवार कुटूंबाच्या घराबाहेर आले आणि अचानक फवारणी करू लागले. अमित विजय पवार पॉझिटिव्ह आहेत, तर घरातून बाहेर येऊ नका, पुढच्या प्रक्रियेसाटी BMC वाले कॉल करतील असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी अमित यांना वडाळ्यातल्या रुग्णालयात नेण्यासाठी अँब्युलन्स आली.

नेहाली सांगतात, "तो क्षण असा होता की रडावं की काय करावं? मी जणू कोसळून पडले होते. यानंतर मी माझ्या नवऱ्याला परत कधी बघणार आहे का किंवा माझ्या कुटूंबामध्ये किती लोकांना लागण झाली असेल. हे कुटूंब रात्री साडेतीन वाजता आपण पत्ते खेळत होतो, हा दिवस आपण परत बघणार आहोत का?"

टेस्ट करून घेण्यातल्या अडचणी
घरात स्वतंत्र टॉयलेट्स असल्यानं पवार कुटूंबाला घरातच क्वारंटाईन होण्याची परवानगी मिळाली. पण त्यांची टेस्ट कधी आणि कशी होणार किंवा कुणी आजारी पडलं तर काय करायचं याविषयी चित्र स्पष्ट नव्हतं. पुढच्या काही दिवसांत एकामागोमाग एक घरातली माणसं आजारी पडू लागली.

"आम्ही रोज BMC ला कॉल करायचो, पण किट्स उपलब्ध नाहीत असं उत्तर मिळालं. तशात तीन दिवस निघून गेले. खासगी टेस्टिंगचा पर्याय तेव्हा बंद होता. आमच्या हातावर क्वारंटाईन स्टँप असल्यानं आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. आणि कुणी घरी येऊन टेस्ट करायला तयार नव्हतं.."

नेहाली यांचे एक दीर शिरीष पवार कलाकार आहेत. त्यांनी शेवटी फेसबुक लाईव्हचा आधार घेतला. मग सोशल मिडिया आणि स्थानिक टीव्ही चॅनेलनं हा विषय उचलून धरला. अखेर दोन मे रोजी बीएमसीच्या पथकानं लक्षणं असलेल्या सात जणांची टेस्ट केली. सातहीजण पॉझिटिव्ह आले आणि कुटूंबाची ताटातूट झाली.

क्वारंटाईनमधला काळ
कुटुंबातील अठरा जणांपैकी आठजण आयसोलेशन वॉर्डमध्ये अॅडमिट होते. तर बाकी दहाजण विलगीकरणात होते. त्यांच्यात लहान मुलं होती. एक पंधरा वर्षांचा मुलगा, एक बारा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा. आई-वडिलांशिवाय राहाणाऱ्या पुतण्यासाठी तर हे दिवस भयंकर होते असं नेहाली सांगतात.

"चार वर्षांच्या मुलासाठी हा खूप मोठा धक्का होता इतका मोठा की मला माया करणारे, भरवणारे, मांडीवर घेणारे अचानक मला हातच लावत नाहीये कोणी. मला जवळ घेत नाहीयेत, माझं सामान वेगळं वेगळं ठेवतात. आजही तो मला विचारतो, छोटी मम्मा, मी तुझ्या जवळ येऊ ना? तुला मिठी मारू ना?"

घरातील वयोवृद्धांसाठीही हा कठीण काळ होता. "मोठ्या सासऱ्यांना सेव्हन हिल्सला अॅडमिट केलेलं, ते ६२ वर्षांचे आहेत आणि त्यांना ऑक्सिजनवर ठेवलं होतं. दुसऱ्या नंबरचे सासरे साठ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेजेस आहेत. त्यांना ICU वॉर्डमध्ये ठेवलं होतं. दोघांना डायबिटीसही आहे."

स्वतः नेहाली यांना कुठलीही लक्षणं दिसत नव्हती. त्यांना आधी दोन दिवस क्वारंटाईनमध्ये आणि मग आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. "क्वारंटाईन सेंटरला रात्री एकदाच डॉक्टर यायचे. दिवसभरात तुम्हाला काय काय झालं हे त्यांना सांगावं लागयचं. आयसोलेशन वॉर्डमध्ये चोवीस तास नर्सेस होत्या. आपण जरी बरे असलो, तरी जिथे आहोत, तिथे आपल्या आसपास लक्षणं असलेले रुग्ण आहेत, त्यांच्यात राहून माणूस कुठेतरी आतून घाबरून जातो." असं त्या सांगतात.

"कोव्हिडवर नेमकं कुठलं औषध नसल्यानं केवळ व्हिटॅमिन, अँटिबायोटिक अशी औषध दिली जायची. जेवणाच्या बाबतीत स्वच्छतेचा दर्जा उत्तम होता. पण चव.. अर्थातच आपल्या तोंडाचीही चव गेलेली असते, काय खातोय हे समजत नाही."

"सेव्हन हिल्समध्ये घरचं जेवण नेण्याची परवानगी होती. मग पनवेलला राहणाऱ्या आत्यानं सासऱ्यांना रोज डबा पुरवला. समोर राहणाऱ्या ताईंनी, दादरला राहणाऱ्या माझ्या आईनंही मदत केली. समाधान आहे की चांगली माणसं पावलोपावली मिळाली, सगळ्यांनी आधार दिला."

कोव्हिडनं शिकवलेला धडा
सात मे रोजी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच पहिली आनंदाची बातमी आली. अमित यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पाठोपाठ पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये एक एक जण घरी परतले.

नेहमीच्या दिलखुलासपणेच घरी परतणाऱ्यांचं टाळ्यांच्या गजरात, नाचत गात स्वागत झालं. पण आयुष्य आता पूर्वीसारखं नाही, याचीही जाणीव सगळ्यांना झाली. सोशल डिस्टंसिंगचे नियम आता घरातही पाळावे लागणार आहेत, असं नेहाली म्हणाल्या.

"जी व्यक्ती बाहेर जाते आहे, त्याच्यापासून थोडं अंतर ठेवूयात. घरातही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या वस्तू वेगळ्या ठेवणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं आपल्याला जेवढं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे."

(जान्हवी मुळे, BBC मराठी)

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....