१४ जानेवारी १७६१ ! #पानिपत #मराठा_शौर्यदिन #राष्ट्रप्रथम #रणमार्तंड_मराठे...🚩🚩
१४ जानेवारी १७६१ हा दिवस कोणताही मराठी माणूस कदापि विसरणे शक्य नाही. भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल २५९ वर्षे पूर्ण झालीत. गोविंदाग्रजांनी या भीषण युद्धाचे पुढील शब्दात अगदी समर्पक वर्णन केलेय.
कौरव-पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती |
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती ||
तर या युद्धानंतरच्या एका पत्रात या युद्धातील संहाराचे वर्णन करताना म्हटलेय, "लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही"
अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मावळे प्राणपणाने लढले. स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले. सैन्याला रसद नाही, पोटाला पुरेसे अन्न नाही, जनावरांना दाणागोटा नाही, लढायला नीट शस्त्र नाही, तोफखान्याला दारूगोळा नाही, तरीही मराठे लढले प्राणपणे लढले तळहातावर शिर घेऊन लढले.
मराठ्यांची सेना झाडाची पानं आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोण्या ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचं कारण नाही.
ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला, त्या आमच्या महाशत्रूनंच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनंच लिहून ठेवलं आहे,
"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्फिंदार (आफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जून) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्यानं तोंडात बोटं घालून चावली असती ! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य."
पराकोटीच्या हालआपेष्टा सहन करत गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पानिपतच्या समरभुमीवर उतरलेल्या मराठा सैन्याच्या अजोड पराक्रमाला आणि देशभक्तीला आजही जगाच्या इतिहासात तोड नाही.
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.
तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा ! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. पुन्हा अल्लाह हु अकबर च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. आर्यावर्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही.
हेच तर साधायचे होते या युद्धातून !
मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही. पानिपतानंतर पंजाबात शिखांच्या उदयामुळे अफगानांची वाट रोखल्या गेली आणि हिंदुस्थानावर अफगानांचे राज्य करण्याचे स्वप्न भंगले.
पानिपतावर पराभव झाला असला तरी पुढची ४० वर्ष लाल किल्ला आणि दिल्लीवर मराठयांचा जरीपटका अभिमानाने फडकत होता हे निश्चित अभिमानाची गोष्ट आहे, दिल्ली च्या गादीवर कोण बसणार हे आपले सेनापती महादजी शिंदे ठरवत असत यातच मराठ्यांचे मोठे पण आले. इ.स. १८०३ मधे जवळ जवळ भारताचा निम्मा भाग मराठ्यांच्या अधिकाराखाली होता,यावरूनच मराठ्यांचे इतिहासातील महत्त्व सिद्ध होते.
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी नव्या जोमाने उभारलेले साम्राज्य आणि पुनः केलेला राज्यविस्तार ही दोन उदाहरणे मराठ्यांच्या शौर्याचे दाखलेच देतात. भलेही मराठे ही लढाई हरले,परंतू १८वे शतक हे मराठ्यांचेच होते यात काही शंकाच नाही.त्यावेळेसच्या जगातल्या एका महासत्तेविरुद्ध लढणारे मराठे हेसुद्धा तितकेच ताकदवान होते.
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात
पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्या लुटारुंशी लढले नाहीत. हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत, या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले.
शेवटी,राष्ट्रप्रथम याच भावनेतून शिवरायांनी स्वराज्य उभारले आणि त्याच भावनेतून मराठे पानिपतवर लढले.
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती. पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान ! सर्वोच्च कार्यक्षमता ! पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत !
त्या मर्द मराठ्यांच्या हौतात्म्यास मानाचा मुजरा.
No comments:
Post a Comment