गडचिरोलीची प्राजक्ता आदमनेची प्रेरणादायी यशोगाथा !!!
पुण्यातल्या बड्या कंपनीची नोकरी सोडून दुर्गम भागात सुरु केला व्यवसाय व कमावते दर महीन्याला साडेतीन ते चार लाख...
प्राजक्ताने वयाच्या अवघ्या तिशीत, गडचिरोलीतली एक यशस्वी उद्योजक अशी ओळख मिळवली आहे. बीफार्म आणि एमबीए(मार्केटिंग) शिक्षणानंतर पुणे शहराते एका बड्या कंपनीत चालू असलेली नोकरी सोडून प्राजक्ता अदमाने गडचिरोलीत परतली, ती काही निराळं करण्याच्या जिद्दीने. काहीतरी नवीन करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे तिने गडचिरोलीत मधोत्पादनाचा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं. त्यासाठी दिल्लीहून रितसर प्रशिक्षणही घेतलं. वनस्पतीशास्त्राची ओढ आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या युवक-युवतींसाठी काही काम उभं करण्याची इच्छा यातून निर्माण झाला, तिचा ‘कस्तुरी हनी’ प्रकल्प. लवकरच तिने‘कस्तुरी हनी’ हा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला.
आपला नक्षलग्रस्त जिल्हा वनस्पतीसमृद्ध आहे. पण इथल्या आदिवासी जनतेला मागदर्शन देणारं कुणी नाही, या विचारातून प्राजक्ताने आधी महिती गोळा करणं सुरू केलं. नोकरी सांभाळत तिने मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. या विषयाचा अधिक अभ्यास करून, प्रशिक्षण घेऊन नोकरी सोडली आणि व्यवसायाला वाहून घेतलं. वर्षभरापूर्वी तिने गडचिरोली तालुक्यात खुर्सा इथे सुरू केलेल्या व्यवसायाचं एक वेगळेपण आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राजक्ताने सुमारे अडीच लाख रुपये गुंतवले. आणि वर्षभरातच खर्च वजा जाता साडेतीन ते चार लाख रुपये कमावले. मधविक्रीबरोबरच मध बनवण्याच्या पेट्याही विकण्यासाठी ती बेरोजगार युवक-युवतींना प्रेरित करत असते, सल्ला देते, मदतही करते. तिने स्वतः सात तरूणांना काम दिलं आहे. त्यांना प्रत्येकी पाच हजार ते सात हजार मासिक वेतन ती देते.
प्राजक्ता सांगते, “मधाची मागणी वाढल्यावर वेगवेगळ्या फुलांचे मध त्या त्या फुलाचा सुवास मिसळून बनवणं सुरू केलं. मधुमेह आणि अन्य रोगांवर इलाज करण्यासाठी मधाचा उपयोग कसा करायचा, ही माहिती आयुर्वेदातून मिळवली. आणि त्या त्या प्रकारचे मध बनवायला सुरूवात केली. यासाठी, ज्या ठिकाणी फुलोरा असतो, त्या त्या ठिकाणी मधपेटया स्थलांतरित करत राहावं लागतं. सुर्यफूल, रेशम, जांभूळ, बोर अशा विविध झाडांच्या ठिकाणी मधमाशीच्या पेट्या लावतो. पेट्यांत जमा झालेल्या मधाला साफ करून बाटल्यांत भरतो. 100 ग्रामपासून 1 किलोपर्यंत वजनाच्या मधाच्या बाटल्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक किलो मघ 380 रु दराने विकतो.”
आता हाच व्यवसाय तिने उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातील झालावाड़ आणि उत्तर प्रदेशातदेखील सुरु केल्याने तिथल्या युवकांनाही रोजगाराची संधी देणं तिला शक्य झालं आहे. अनेक पारितोषकांनी सन्मानित झालेल्या प्राजक्ताचं काम खरोखर प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment