Monday, 23 November 2020

अभिमानास्पद व प्रेरणादायी ! पती शहिद झाल्यानंतर वीरपत्नीही खडतर प्रशिक्षणानंतर लष्करात अधिकारी

 ९ महिने खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी झाल्या लेफ्टनंट..

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांची खडतर प्रशिक्षणानंतर लष्करात लेफ्टनंट पदी निवड झाली, आता कणिका राणे या लष्करात अधिकारी झाल्या आहेत. त्यांना दोन स्टार्स सुद्धा बहाल करण्यात आले आहे. कनिका यांना एक मुलगाही आहे.

दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे या आता 'लेफ्टनंट' झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओटीए)मध्ये त्यांनी 9 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले असून त्यांना लेफ्टनंट पदांचे दोन 'स्टार्स' देण्यात आले आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या मेजर राणे यांना वीरमरण आलं होतं. ते मीरा रोड इथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. ७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिलं. कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका मुंबईत एका ठिकाणी खासगी नोकरी करत होत्या. पतीच्या निधनानंतर कनिका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार, कनिका राणे यांनी परीक्षा तसंच मुलाखत दिली होती. कनिका यांनी अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले. त्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानंतर नऊ महिने त्यांनी चैन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओटीए)मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.

आता कणिका या लष्करात अधिकारी झाल्या आहेत. त्यांना दोन स्टार्स सुद्धा बहाल करण्यात आले आहे. कनिका यांना एक मुलगाही आहे. मुलाला घरी ठेवून त्यांनी नऊ महिने हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे, मूळचे सिंधुदुर्ग येथील राहणारे मेजर कौस्तुभ राणे यांना ७  ऑगस्ट २०१८  रोजी वीरमरण आल्यानंतर राज्य सरकारने देऊ केलेली सरकारी नोकरी वीरपत्नी कनिका यांनी नाकारली होती. कनिका यांनीही सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.  पती देशासाठी शहीद झाल्यानंतर लष्करात जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण झाला, त्यांचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

वीरपत्नी कनिका राणे यांना कडक सॅल्युट...







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....