Sunday, 26 September 2021

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मुळ मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा

आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष....

पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.

तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. 

छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

संदर्भ : 
करवीर रियासत, पान २६४
सेनापती घोरपडे घराण्याची कैफियत.

छायाचित्र - करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे शंभर वर्षांपूर्वी टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र...

Saturday, 25 September 2021

कसारा घाटाचे जुने छायाचित्र

तत्कालीन (GIP Railway Company) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीतर्फे या मार्गावर रेल्वे चालवण्यात येत होती. व मुंबई-भुसावळ या रेल्वेमार्गावरील थळ घाटात सदर बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते व १ जानेवारी १८६५ ला या रेल्वेमार्गाचे उदघाटन करण्यात आले.


मुंबई ते नाशिक दरम्यान असलेला थळ घाट उर्फ कसारा घाटातील रेल्वेमार्गावरील बोगद्याचे काम चालू असताना १८५५ ते १८६२ दरम्यान घेतलेले छायाचित्र 



कसारा घाटातील बोगद्याचे सध्याचे छायाचित्र 

Monday, 20 September 2021

अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प

अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प

हे शिल्प नाशिक येथील काळाराम मंदिराचे आहे. उत्तर, दक्षिण, व पश्चिम अश्या तीन बाजूस असे हत्तीचे द्वंद्व असलेले शिल्प आहे. फक्त पश्चिम बाजूचे शिल्पातील एका हत्तीवर माणूस पालथा पडलेला दिसत आहे. 

असे का ?          
पूर्वी उंच बांधकामास क्रेन वा त्या सारखे अन्य यांत्रिक उपकरणे उपलब्ध नव्हती.        टप्प्या टप्प्याने मातीचा उतार करून शिल्प व अवजड वस्तू वर सरकवत. 

अशात काम करणारा एक कारागीर वरून खाली पडला तो नेमका या हत्तीवर व तेथेच गतप्राण झाला. त्याची स्मृती म्हणून नंतर एक दगडी पुतळा बनवून तो त्या हत्तीवर ठेवण्यात आला आहे. 

मंदिरातील अन्य हत्तीवर असा पुतळा नाही. ती फक्त त्या अज्ञात कारागीराची स्मृतिशिला आहे. 
या मंदिरात ज्या ओव-या आहेत त्याची संख्या ८४ आहे. ८४ लक्ष योनीतून जीवास फिरावे लागते याचे ते प्रतीक आहे. 

या मंदिराच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्य असे की, पूर्व दरवाजात उभे राहून सुद्धा  गाभाऱ्यातील मुर्तीचे दर्शन घेता येते. दरवर्षी रामनवमीस सुर्यकिरण रामाचे मुर्तीवर प्रकाशित होतात.

राम मंदिरा समोर मारूती मंदिर आहे. त्या सभामंडपास ४० खांब आहेत. ते हनुमान चालीसाचे प्रतीक म्हणून बाधले गेले आहेत.(१० खांबांची १ ओळ अश्या ४ ओळी). मारुतीच्या मूर्तीची नजर श्रीरामप्रभूंच्या चरणावर आहे.
         
मंदिराचे प्रांगणातून मुख्य मंदिरात जाण्या साठी १४ पायर्‍या चढून जावे लागते. रामाच्या १४ वर्षे वनवासाचे ते प्रतीक आहे.

असे हे वैशिष्ट्यपूर्ण नाशिकचे काळाराम मंदिर.

Friday, 3 September 2021

एका क्लिकवर पुजाविधी व आरतीसंग्रह.

गणपती प्राणप्रतिष्ठा पुजाविधी, गौरी (महालक्ष्मी) पुजाविधी, हरितालिका पुजा, मंगळागौर व्रत पुजा, विविध देवीदेवता व संतमहात्म्यांच्या आरत्या, गणपती अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली व विविध व्रतवैकल्यांची सविस्तर माहिती देणारे मोबाईल ॲप.

आजच हे ॲप खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.aarti



Saturday, 7 August 2021

दीप अमावस्या

आज दीप अमावास्या. गटारी अमावस्या  नावाने कुप्रसिद्ध केलेला आजचा दिवस प्रत्यक्षात दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या (अवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दीपपूजन केले जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते, दिवा लावला जातो आणि दान धर्म केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. 

वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जाते. मात्र, आषाढ अमावास्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिले जाते. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित केला जातो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मांसाहार टाळला जातो.

दीपपूजनाची आख्यायिका पुराणात सांगितली आहे. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला. उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की, रोज दिवे घासावेत, तेलवात करावी आणि स्वतः प्रज्वलित करावे. खडीसाखरेने त्यांच्या ज्योति साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडीत झाला.

एक चमत्कार घडला. पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाट-माट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.

इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की, असे होण्याचे कारण काय? मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सूनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेणा पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. तिला दिवा पावला. 

इतका सुरेख मतितार्थ असलेला हा दिवस आपण उगाचच बदनाम केला आहे.

Tuesday, 27 July 2021

नाशिकमधील गणेशाची प्राचीन स्थाने

 नाशिकमधील गणेशाची प्राचीन स्थाने

धार्मिक पातळीवर नाशिक क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. तेथे असलेल्या मोदकेश्वर, महोत्कट गणपती, तिळा गणपती, लोथेचा गणेश, नवश्या गणेश अशा विविध गणेशस्थानांमुळे या माहात्म्यात भरच पडली आहे.

पुराणांनी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानलेली नाशिक नगरी ही सदैव भाविकांच्या श्रद्धेने ओथंबलेली असते. स्थान माहात्म्यात सर्वच देवतांचे वास्तव्य येथे असल्याचे सांगितले जाते. स्मार्तधर्मात अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणेशाची अनेक स्थाने येथे आहेत. कलियुगातील स्वैराचार पाहून धर्माच्या रक्षणासाठी पार्वतीने नाशिकक्षेत्री गणेशाला पाठवले असे पुराणात सांगितले आहे. नाशिकच्या गणेशाशी असणारा ऐतिहासिक संदर्भ महानुभाव संप्रदायाच्या स्थानपोथीत आढळतो. चक्रधरस्वामी इसवी सन १२७८ दरम्यान तीर्थयात्रेच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकमध्ये आले होते. त्यावेळी नाशिकमधील पंचवटी, रामनाथ, आदित्य, महालक्ष्मी, गणेश, सोमनाथ, विनायक, कापालेश्वर, वारुणा-संगम, जळसेनाचा घाट, सुंदराचे देऊळ, पंचायतन, काळीकेचे देऊळ, साळातीर्थ येथे आल्याचा उल्लेख आहे. गणेश उपासनेचे महत्त्व पेशवेकाळात वाढीस लागले असे मानले जात असले तरी नाशिकमध्ये तेराव्या शतकापासून निश्चित गणेशाची स्थाने आहेत. नाशिकमधील मोदकेश्वर, महोत्कट गणेश, तिळा गणपती, लोथेंचा गणेश आणि नवशा इ. गणपती प्राचीन मानले जातात.

मोदकेश्वर नाशिक-



नाशिकच्या ग्रामदैवताचा मान मोदकेश्वरास दिला जातो. गणेशकोश, पंचवटी-यात्रा दर्शन, गोदावरी माहात्म्य यात मोदकेश्वराचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती क्षेत्रांत मोदकेश्वराची गणना होते. गोदावरीच्या पश्चिम तीरावर, नाव दरवाजाजवळ हे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. मोदकेश्वर या नावामागे रोचक आख्यायिका सांगितली जाते. गणेश आकाशमार्गाने भ्रमण करत असताना त्याच्या हातातील एक मोदक खाली पडला त्यापासून गणेशरूप साकार झाले, त्याचा दृष्टांत येथील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झाला. त्यानुसार त्यांनी या मंदिराची उभारणी केली. चार खांब असलेल्या गाभाऱ्यात शेंदूर विलेपित मोदकेश्वर विराजमान आहे. मागील बाजूस रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मोदकेश्वराच्या शेजारीच विश्व्ोश्वर महादेव आहे. पिता-पुत्रांचे इतके निकट सान्निध्य असणे हे या मंदिराचे वैशिष्टय़, याबरोबरच कोनाडय़ात विष्णू, गजलक्ष्मी, हनुमानासह राम-लक्ष्मण-सीता, विठोबा यांच्या छोटय़ा छोटय़ा मूर्ती आहेत. प्रात:काळी सूर्यकिरण मोदकेश्वरावर येतात त्यावेळची शोभा अवर्णनीय असते. दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, भाद्रपद आणि माघातील उत्सवाच्या वेळी विविध अलंकारांनी मोदकेश्वराचे रूप सजवले जाते. मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. त्या काळात विशेष महापूजेचे आयोजन केले जाते. गोदेच्या स्नानाने शरीरशुद्धी होते तर मोदकेश्वराच्या दर्शनाने चित्तशुद्धी होते अशी गणेशभक्तांची धारणा आहे.

महोत्कट गणपती -



मोदकेश्वराच्या मागील गल्लीतच महोत्कट गणेशाचे स्थान आहे. शंकराच्या शापामुळे उद्विग्न झालेल्या मदनाने उ:शापासाठी गणेशाची कठोर उपासना सुरू केली तेव्हा रतीने जिथे मोदकांची बठक करून त्यावर गणेशाची स्थापना केली, तो महोत्कट गणेश, असे वर्णन गणेशपुराणातील उपासना खंडात आले आहे. तसा महोत्कट गणेश नाशिकमध्ये िहगणेंच्या वाडय़ात आहे. पेशव्यांचे उपाध्याय असणाऱ्या िहगणे घराण्याचे हे खासगी देवस्थान. िहगणेंच्या वाडय़ात असणारे सध्याचे देवस्थान पूर्वी वाडय़ाच्या बाहेर होते. तेथील शिलालेख आजही आहे. सोळाव्या शतकात होणाऱ्या परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी िहगणेंच्या पूर्वजांनी गणपतीची मूर्ती पाठीवर उचलून आत्ताच्या ठिकाणी स्थापन केली. म्हणून पाठीवरून खाली ठेवल्यावर जसे आसन असते तशाच स्थितीत ही गणेशमूर्ती आहे, असे सांगतात. अनेक वर्षांपासून या मूर्तीस शेंदूर विलेपन होत असल्याने गणेशाचे रूप पालटले होते. अलीकडेच हा शेंदुराचा लेप अचानक निघाल्याने गणपतीचे मूळ स्वरूप समोर आले आहे. साडेचार फूट उंचीच्या दोन खांबी मंडपात अत्यंत सुबक चेहऱ्याची महोत्कट गणेशमूर्ती विराजमान आहे. दहा हातांत विविध आयुधे घेऊन तेजस्वी बालकाप्रमाणे हा आसनस्थ आहे. गणेशाचे मुकुट, माळा, साखळ्या, दुर्वाचा हार हे अलंकारही पेशवाईला साजेसे असे आहेत. उत्सवाच्या वेळी मूर्तीस सर्व दागिने चढवतात त्यावेळचा त्याचा थाट पाहण्यासारखा असतो.

तिळा गणपती -

पंचवटी परिसराशेजारी असणाऱ्या गणेशवाडीत एका टेकडीवर तिळा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरामुळेच इथल्या भागाला गणेशवाडी हे नाव मिळाले. कै. दामोदर दगडूशेठ सोनार (भडके) यांना घराचा पाया खोदताना डाव्या सोंडेची गणेश मूर्ती मिळाली तेव्हा त्यांनी जवळच मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. इसवी सन १७६७ साली मंदिरासाठी पाच हजार रुपये इतका खर्च झाला असे सांगतात. उत्तर पेशवाई काळातील स्थापत्य शैलीत प्रस्तुत मंदिराची रचना आहे. उंच टेकडीवर दगडी पाया आणि वर विटांचे बांधकाम केले आहे. सभामंडप त्यापुढे गर्भगृह असून दोन्ही वरील छत घुमटाकार आहे. गर्भगृहाला समोरासमोर दोन खिडक्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या दाराची उंची अतिशय कमी असल्यामुळे खाली वाकूनच आत प्रवेश करावा लागतो. गर्भगृहातील तीन कोनाडय़ांपकी मधल्या मुख्य कोनाडय़ात गणपती आहे, त्याच्या उजवीकडच्या लहान कोनाडय़ात मारुतीची छोटी मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती मिळाली तेव्हा ती अतिशय लहान होती, शेंदूर विलेपनामुळे आता तिचा आकार जरा वाढला आहे. हे आकार वाढण्याचे प्रमाण तिळाइतके आहे म्हणून याला तिळा गणपती असे म्हणतात. पौषातील तीळकुंद चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. तेव्हा सर्व नाशिककर येथे येऊन तीळगुळाचा नवेद्य दाखवतात आणि इच्छापूर्ती, सुखप्राप्तीची कामना करतात. भडके कुटुंबियांची बारावी पिढी या मंदिराची व्यवस्था पाहत आहे. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या मूळ रूपाला बाधा येऊ न देता जीर्णोद्धार केला.


लोथेंचा गणेश –

रविवार कारंजावर गायधनी गल्लीच्या सुरुवातीला लोथेंच्या वाडय़ात उजव्या सोंडेचा गणेश रिद्धिसिद्धीसहित विराजमान आहे. इसवी सन १९८८ मध्ये महापालिकेने केलेल्या रस्ता रुंदीकरणात मंदिराचा काही भाग गेला. ३००-४०० वर्षांपूर्वी लोथेंच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टान्तानुसार त्यांनी सदर जागी उत्खनन केले तेव्हा या मूर्ती मिळाल्याचे सांगतात. पांढऱ्या संगमरवरी अखंड पाषाणात अत्यंत रेखीव गणेश मूर्ती घडवलेली आहे. कमळात पद्मासन घालून चतुर्भुज, शूर्पकर्ण गणपती बसला आहे. वरील हातात परशु आणि फुलं तर खालच्या डाव्या हातात अक्षमाला आणि उजवा हात वरद मुद्रेत आहे. उजवीकडील दात अर्धा असून डाव्या दाताकडून सोंड उजवीकडे वळली आहे. गळ्यात जानवे, माळा आहेत. कमळाजवळ गणपतीकडे पहाणारा उंदीर असून गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी आहेत. मंदिरापुढे पेशवेकालीन हंडय़ा आणि िभतीवर मोठमोठे आरसे लावले आहेत. लोकांना फारसा परिचित नसलेला हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने जास्त सिद्ध मानला जातो.


नवश्या गणपती –


नवसाला पावणारा तो नवश्या गणपती. गंगापूररोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे हे मंदिर आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाईंना नाशिकजवळील चावंडस गावी ठेवण्यात आले. इसवी सन १७६४ साली आनंदीबाईंना पुत्रप्राप्ती झाली तेव्हा आनंदीबाईंच्या नावावरून सदर गावाचे नामकरण आनंदवली असे केले गेले. त्याच दरम्यान येथे गणपती मंदिर बांधले. तेच हे नवश्या गणपतीचे मंदिर. सदर क्षेत्र आता नाशिक महानगराच्या हद्दीत आहे. पंधरा-वीसपूर्वी मंदिराजवळ आनंदीबाईंच्या गढीचेही अवशेष होते आता केवळ मंदिर आहे आणि बाकी परिसर इमारतींनी भरला आहे. तरीही इथली प्रसन्न शांतता आणि पावित्र्य टिकून आहे. मुख्य रस्त्यापासून जरा खाली खोल नदी पात्राकडे पायऱ्या उतरत गेल्यावर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप, सभामंडपात दोन्ही बाजूला अष्टविनायक, त्यापुढे छोटे गर्भगृह, गर्भगृहाला घुमटाकार शिखर अशी मंदिराची रचना आहे. डोक्यावर मुकुट असलेली गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून त्यापकी वरील दोन हातात पाश आणि फुले आहेत, तर खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत असून, मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. नवसपूर्तीचा भाग म्हणून येथे छोटय़ा-छोटय़ा घंटा लावल्या जातात, त्यामुळे सभामंडपाचे खांब अनेक घंटांनी भरून गेले आहेत. सभोवताली गर्द झाडी, लागूनच नदीपात्र आणि नीरव शांतता यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षति करते. नदीपात्रात बोटिंगचीही सुविधा उपलब्ध आहे.

(लोकसत्ता)

Friday, 16 July 2021

नाशिकच्या गोदाकाठावरील मंदिरांचीजुनी पेंटींग्ज

 Marianne North या ब्रिटिश चित्रकर्तीने सन १८८० मध्ये काढलेले Holy Tanks, Nassick हे गोदाकाठावरील मंदिरांचे तैलरंगातील चित्र. 


दुस-या चित्रातही नारोशंकर मंदिर व आजुबाजूचा परिसर चित्रित केलेला दिसून येत आहे.


Image credit : The Board of trustees of The Royal Botanic Gardens, Kew





सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...