Tuesday, 23 November 2021

नाशिकचा नवश्या गणपती

 आज अंगारकी चतुर्थी निमित्त नाशिक मधील नवश्या गणपतीचे दर्शन. 


नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशमूर्ती आहे. या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. 


सन १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. राघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली.


सन १९८८ मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. गोदातीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोध्दार करणे अपरिहार्य होते. सन १९९० च्या कालखंडात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात अतिशय गर्दी असते. नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.



नाशिकचा नवश्या गणपती 






Thursday, 18 November 2021

श्री कार्तिकस्वामी दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र योगावर कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. वर्षातील या एकाच दिवशी पर्वणी काळात स्त्रियांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते. श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक"ही मानले गेले आहे.  वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे “धनसंपत्तीकारक” ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. 

विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे. दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले “प्रज्ञाविवर्धनस्तोत्रा”चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करुन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. (विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खुप शुभ असते)

या शुभ पर्वणीनिमित्त आपणा सर्वांसाठी सादर  आहे पंचवटी, नाशिक येथील मंदिरातील श्री कार्तिकस्वामींचे दर्शन...













Wednesday, 17 November 2021

गोरक्षनाथ महाराजांचा प्रकटदिन

 आज 'कार्तिक शुक्ल त्रयोदशी' म्हणजे  शिवचैतन्य महायोगी गोरक्षनाथ महाराजांचा प्रकटदिन. 


महायोगी श्रीगोरक्षनाथ यांना बोली भाषेत  ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात. गोरक्षनाथांचा उल्लेख सर्व भारतभर आढळतो. यामध्ये अठरापगड जाती व पंथ त्यास मान्यता देतात हे विशेष होय. नाथ संप्रदायास वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे श्रेय गोरक्षनाथांकडे आहे. ‘गोरक्ष शतक’ या त्यांच्या ग्रंथामुळे नाथ पंथास चिरस्थायी पाया मिळाला. नाथतत्त्वाच्या ज्ञान व शैवभक्तीचा प्रचार त्यांनी काठमांडू ते कन्याकुमारी आणि काबूल ते कोलकाता असा समर्थपणे केला. भारतात भ्रमंती करून त्यांनी असंख्य लोकांना नाथ तत्त्वाचा उपदेश केला आणि अगणित शिष्य निर्माण केले. त्यांचे शिष्य अठरापगड जातीत व भारताच्या कानाकोपऱ्यांत पसरले. काही शिष्यांनी मठांची स्थापना करत जनसामान्यांपर्यंत नाथतत्त्व पोहोचेल अशी व्यवस्था केली. आद्य शंकराचार्यानंतर अद्वैत भूमिकेच्या पातळीवर जनजागरण करणारा एवढा मोठा पुरुष म्हणून ते ख्यात आहेत. 

पूर्वीच्या काळात त्र्यंबकेश्वरचा गोरक्षनाथ मठ म्हणजे नाथ संप्रदायाचे देशातील अतिशय महत्त्वपूर्ण केंद्र होते. दर्शनीसिद्ध नाथ तयार होईर्प्यत शिक्षण देण्याचे कार्य या ठिकाणी होत असे. एकदा शिक्षण पूर्ण झाले की, दर्शनी नाथ मठातून भ्रमंतीला बाहेर पडत. नाथ संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराची धुरा त्यांच्यावर होती. 

त्र्यंबकेश्वर येथे योगीराज गोरक्षनाथ यांनी पेटवलेली धुनी आजही प्रज्वलित आहे. पुराण कथेनुसार भगवान परशुरामास आपल्या हातून पाप झाल्याने त्यांना शांताता लाभत नव्हती. शांतता मिळविण्यासाठी ते त्र्यंबकेश्वर येथे आले. गुरू गोरक्षनाथानांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांनी हाती पात्र देवता घेऊन ते कर्नाटक मंगलोर येथे गेले होते. तेथे त्यांना पाहून समुद्रमागे सरकला व त्यांना शांतता लाभली. नाथपंथात आजही सिंहस्थात त्या प्रमाने पात्र देवतेची स्थापन करून राजाची निवड होते. पात्रदेवता घेऊन ठिकठिकाणी मुक्काम करीत मंगलोर कर्नाटक येथे कदली मठापर्यंत प्रवास होत असतो. येथे आजही मंजुनाथाचे मंदिर आहे व गोरक्षनाथांनी प्रज्वलित केलेली ज्योत आहे. 


ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वाराजवळ गुरु गोरक्षनाथ यांनी तपश्चर्या केलेली गुंफा आहे.  #ब्रह्मगिरी पर्वतावर कौलगिरी नामक भागात अनुपम शिळा आहे. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. या अनुपम शिळेला बोलीभाषेत #अनुपान शिळा असेही संबोधन आहे. 


गुरु गोरक्षनाथ प्रकटदिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.



गोरक्षनाथ गुंफा 

अनुपम शिळा

गोरक्षनाथ मठ  (नवनाथ मंदिर )


गोरक्षनाथ मठ 


गोरक्षनाथ मठ 



















 

Tuesday, 16 November 2021

तुळशी विवाह

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.  जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण अशी संत बहीणाबाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत.  तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्‍ये तुळशीला महत्त्व आहे. 

कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.

तुळशी विवाहाचा पूर्वापार चालत आलेला संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी व घरच्या घरी स्वतःच करण्यासाठी हे मोबाईल ॲप वापरा. त्याशिवाय इतरही  व्रतवैकल्ये, सणावारांच्या संपूर्ण पुजाविधी, विविध देवीदेवता व संतमहात्म्यांच्या आरत्या, गणपती अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली व स्तोत्रे अशी सविस्तर माहिती या मोबाईल ॲपमध्ये देण्यात आली आहे. 

प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये कायम स्वरूपी असायलाच हवे असे ॲप.

आजच हे ॲप खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.aarti


तुळशी विवाह पूजोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!












Friday, 12 November 2021

हे फार भन्नाट आहे...

👆हे फार भन्नाट आहे.... आधी व्हिडीओ बघा आणि मग वाचा.

पद्म पुरस्कार म्हटलं की तिथेच अर्ध्या गोष्टी संपतात... एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तीच्या नावाआधीच पद्म असणारा पुरस्काराचं प्रीफिक्स लागतं... इथे मुद्दा तो नाहीय... तर मुद्दा आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यांनी जे केलं त्याचा... आपण बदलतोय याचा... आपण त्यांना स्वीकारतोय याचा...

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती पाहून त्या सभागृहामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांपासून ते सभागृहातील इतर मान्यवरांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.

जोगाम्मा या तृतीयपंथी आहेत. आता तृतीयपंथी म्हटल्यावर ते आपल्याकडे जेवढ्या वाकड्या नजरेने पाहत नाही तेवढे पूर्वग्रह दुषीत ठेऊन त्यांच्याकडे पाहणाऱ्यांमध्ये आपण सर्वसामान्य आहोत. म्हणजे तुम्हीच नाही मी सुद्धा तुमच्यातलाच आहे त्यांच्याकडे ते आपल्यातले नाही या नजरेने पाहणारा. पण इथे जोगाम्मा यांनी तुमच्या माझ्यासारख्या थिल्लर लोकांची पर्वा न करता स्वतःचं आपलेपण या सर्वोच्च मंचावरही जपलं... त्या राष्ट्रतींसमोर पुरस्कार घ्यायला गेल्या. राष्ट्रपती पुरस्कार देणार इतक्यात त्यांनी साडीचा पदर एका हातात धरुन तो गोलगोल फिरवला नंतर राष्ट्रपतींपासून काही अंतरावरुन हात वर खाली फिरवून त्यांच्या पायाशी असणाऱ्या पायरीवर बोटं मोडून त्यांनी नजर काढली... 

आता हे नजर काढणं वगैरे इललॉजिकल वाटू शकतं पण तृतीयपंथी ज्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी केलं. याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता प्रेम या भावाने पहावं. देशातील सर्वात मोठ्या पदावर असणारी म्हणजे पंतप्रधानांच्याही वर असणारी व्यक्ती समोर असताना न घाबरता, संकोच मनात न ठेवता आपल्या आपल्या स्टाइलने आणि सगळ्यात युनिक पद्धतीने त्यांनी प्रेम व्यक्त केलं... हे रिपिट मोडवर पाहिलं ना यात फार फार सारे रिड बिटवीन द लाइन्स आहेत आणि तेच पाहताना आणि याचा आक्षय लक्षात घेतल्यास उगा डोळे पाणावल्यासारखे होतातय...

खरं तर आपण फार खुजे आहोत या जोगाम्मांसमोर... आपल्याला आपलं असणं स्वीकारता येत नाही तर एवढ्या मोठ्या स्टेजवर व्यक्तं होणं लांबचं राहिलं.... असं निस्वार्थी आणि भरभरून दिलेलं प्रेम पाहून राष्ट्रपतीही भावूक झाले असतील यात शंका नाही....

पद्म पुरस्कार सोहळ्यांच्या इतिसाहात कायम लक्षात राहिल असा हा क्षण वाटतोय मला तरी....

शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर...

तुम्ही कोणीही असला आणि तुमच्या क्षेत्रात आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वत:शी प्रमाणिक राहिलात तर हे असं स्वछंदी जगता येतं आणि त्या स्वच्छंदीपणाचा आनंद वाटता येतो... जसा या जोगाम्मा यांनी वाटलाय.

Tuesday, 2 November 2021

लक्ष्मीपूजन परंपरा

 लक्ष्मीपूजन 

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी,  दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात.शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. 

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा खजीनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरिति सह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिति यांची पूजा केली जात असावी. .कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचंही म्हटलं जातं. तिला ज्येष्ठा,षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही संबोधलं जात असे. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारलं असलं तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असं देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. 

हि अष्टलक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, सुखसमृद्धीसाठी लक्ष्मीपूजनाच्या महूर्तावर लक्ष्मी कुबेराचे  शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी स्वतःच कसे पुजन करावे याची सविस्तर माहिती देणारे 

मोबाईल ॲप. याशिवाय या ॲपमध्ये विविध देवीदेवता व संतमहात्म्यांच्या आरत्या, गणपती अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली, स्त्रोत्रे व विविध व्रतवैकल्यांच्या पुजाविधींची सविस्तर माहिती दिलेली आहे. असे हे अत्यंत उपयुक्त असे मोबाईल ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे.

आजच हे ॲप खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.aarti

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!






Monday, 1 November 2021

धनत्रयोदशी

🪔#धनत्रयोदशी🪔

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. 
(लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)..

शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं. या नवीन धान्याची शेतकरी पूजा करतात तो दिवस म्हणजे म्हणजे "#धनत्रयोदशी". धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. 

व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा #नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास #झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडूची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत #आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात.

#Diwali #HappyDiwali #Diwali2021 #marathi #Deepotsav #दीपोत्सव #HinduFestivals #दिपावली #संस्कृती #फटाके #शुभदीपावली

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...