वारसा जपणारा मालेगावचा बलदंड भुईकोट किल्ला
मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध गाव आहे. मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे. दाट लोकवस्तीच्या या ऐतिहासिक शहरात गिरणा आणि मोसम नद्यांच्या संगमावर इतिहासाचा वारसा जपणारा बलदंड असा किल्ला उभा आहे. हा किल्ला मालेगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यात आता शाळा भरते, त्यामुळे हा किल्ला आजही बर्यापैकी तग धरुन आहे.
इ. स. १७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांनी नमूद केले आहे. एका उल्लेखानुसार १८२० मध्ये मालेगावाचा किल्ला साठ वर्षापूर्वी बांधला असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार हा किल्ल १७६० मध्ये बांधला असावा, असे दिसते. नारोशंकर हे सरदार होते. ते बराच काळ उत्तर भारतात होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार म्हणून असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले. त्यांनी ओरछा जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी होता. आलमगीर गाझी शिकारीच्या मोहीमेवर असताना नारोशंकर ही सोबत होते. बादशहाने शिकारीच्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी हुकली. चवताळलेल्या सिंहाने बादशहावर झेप घेतली. नारोशंकर यांनी झेप घेणार्या सिंहाला तलवारीने मारले. त्यामुळे बादशहा बचावला. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना 'राव बहादूर' हा किताब देवून मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्याचा परिसर जहागीर म्हणून दिला. पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. पेशव्याबरोबर झालेला बेबनाव मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले. नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्याकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली होती. मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला.
छत्रपंती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता आली. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला . जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १० जुन १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सरदार नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले. नारोशंकर यांच्यावरही उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असावा असे मालेगावच्या किल्ल्याच्या बांधकामावरून दिसते. मूळ चौरस आकाराचा भक्कम किल्ला आहे. त्याच्या भोवती साधारण ४० ते ४५ फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. भुईकोट किल्ल्याला संरक्षणासाठी खंदकाची नितांत गरज असते. या तटबंदीच्या बाहेर चारही बाजुंनी रुंद आणि खोल असा खंदक खंदून त्यात मोसम नदीचे पाणी खेळवून किल्ला अभेद्य करण्यात आला होता. खंदकावर काढता घालता येण्यासारखा पुल होता. आज आपण किल्ल्यात प्रवेश करतो त्या बाजूचाच खंदक अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व बाजूंनी दाट वस्ती असल्याने त्या वस्तीने तो खंदक गिळंकृत केला आहे.
किल्ल्याला तिहेरी तटबंदी होती त्यातील बाहेरची तटबंदी वस्तीत लुप्त झाली आहे. त्यातील नदीच्या बाजूचा एकच बुरुज शाबूत आहे तो किल्ल्यावरुन दिसतो. सध्या किल्ल्यात कांकणी विद्यालय आहे. त्यांच्या सोईसाठी पश्चिमेची तटबंदी फ़ोडून दरवाजा बनवलेला आहे. या दरवाजातूनच आपला प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला विद्यालयाची नवीन बांधलेली इमारत आणि त्याच्या समोर ठेवलेल्या ३ तोफ़ा दिसतात. विद्यालयाच्या इमारतीकडे तोंड करुन उभे राहीले असता उजव्या बाजूला असलेल्या दोन तटाबंदीतील प्रशस्त जागेतून गडफ़ेरीला सुरुवात करावी. किल्ल्याची आतील तटबंदीत ९ बुरुज आहेत तटबंदीची उंची २० फ़ूट आहे. तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. बाहेरील म्हणजे दुसर्या तटबंदीत बुरुज नाहीत. या तटबंदीची उंची साधारणपणे १५ फ़ुट आहे. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. तटबंदीला फ़ांजी मात्र नाही आहे. तटबंदीच्या खालच्या भागात ३ फ़ूट उंच, २ फ़ुट रुंद आणि २ फ़ूट खोल अशा छोट्या चौकोनी खोल्या आहेत. त्यांचा उद्देश कळत नाही. दोन तटबंदींच्या मधून किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५ मिनिटे लागतात. या प्रदक्षिणेत आतील तटबंदीतील बुरुजांची भव्यता लक्षात येते. पुन्हा विद्यालयाच्या समोर आल्यावर विद्यालयाच्या इमारतीसाठी दोन बुरुजांमधील तटबंदी पाडलेली दिसते. यातील डाव्या बाजूचा बुरुज आणि विद्यालयाची इमारत यांच्या मधून जाणार्या वाटेने पुढे जावे. तेथे एक भव्य प्रवेशव्दार आपले स्वागत करते. प्रवेशव्दाराचा लाकडी दरवाजा अजून शाबूत आहे.
या ठिकाणी उतराभिमुख दुहेरी दरवाजा आहे. हा दरवाजा बाहेरुन बंद असल्याने आपण किल्ल्याच्या आतून दरवाजात प्रवेश केलेला असतो. दरवाजातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दारची भव्यता आपल्याला कळते. २० फ़ुटी उंच प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्या कमानीच्या बाजूला दगडात कोरलेली कमळे आहेत. प्रवेशव्दारावर आणि बुरुजांच्यावर वीटांनी केलेले १० फ़ुटी बांधकाम आहे. यात प्रवेशव्दारावर तीन आणि बाजूच्या बुरुजांवर प्रत्येकी ३ कमादार खिडक्या कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला दोन मजली दालन होते. त्यातील वरच्या मजल्यावर रंगमहाल होता. आता तळ मजल्यावर शाळेचा वर्ग भरतो आणि दोन मजल्यांनधील स्लॅब नष्ट झाल्याने रंगमहालात जाता येत नाही. पण रंगमहालाच्या भिंतीत कोरलेले कमानदार कोनाडे पाहायला मिळतात. आतील दरवाजाच्या काटकोनात बाहेरचा दरवाजा आहे. हा भव्य दरवाजा पूर्ण दगडी बांधणीचा असून त्याच्या बाजूच्या दोन्ही बुरुजांवर सुंदर मनोरे आहेत. दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी समोर भिंत बांधलेली आहे. या दरवाजाच्या काटकोनात एक छोटा दरवाजा होता, पण आता तो बुजवून त्याठिकाणी शाळेची मुतारी बांधलेली आहे. दरवाजाच्या वर जाण्यासाठी तटबंदीत जीना आहे. जीन्याने तटबंदीवर जाऊन फ़ांजीवरुन किल्ल्याच्या आतल्या तटबंदीवरुन फ़िरता येते. दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या आत आणि बाहेर लक्ष ठेवण्यासाठी खोल्या आणि झरोके बनवलेले आहेत. दरवाजाच्या बाजूच्या बुरुजांवर असलेले मनोरे सुंदर आहेत. ८ दगडी खांबांवर या मनोर्यांचे छत तोललेले आहे. घुमटाकार छत वीटांनी बनवलेले असून त्याच्या छतावर आतल्या बाजूने चुन्यात फ़ुल कोरलेले आहे. दोन खांबांच्या मध्ये दगडी कमानी असून कमानीवर दोन बाजूला कमळ कोरलेले आहेत. मनोर्याला वाळ्याचे पडदे लावण्यासाठी बसवलेल्या कड्या आजही तेथे आहेत. मनोरे पाहून पुढे गेल्यावर ध्वजस्तंभ असलेला भव्य बुरुज आहे. फ़ांजी वरुन फ़िरतांना एके ठिकाणी तटबंदीत उतरण्यासाठी जीना आहे. तो तटबंदीतच दुसर्या बाजूने बाहेर पडतो. फ़ांजीवरुन फ़िरुन परत प्रवेशव्दाराशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी अवघा अर्धा तास लागतो. मात्र खास वाट वाकडी करुन बघावा असा हा किल्ला आहे एवढे निश्चित.
(संदर्भ ः छायाचित्रे व मजकूर इंटरनेटवरुन घेतलेला आहे).
No comments:
Post a Comment