Wednesday, 11 November 2020

वसुबारस

#वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
काही ठिकाणी या दिवशी  कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.

यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा होय.

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया॥
परमपुज्य जी वंद्य या भारताला।
*नमस्कार त्या दिव्य गो देवतेला॥*

गायीचे मानवी जीवनातले स्थान अनन्यसाधारण आहे . अनादिकालापासून मनुष्यप्राणी शेती करून जगतो आहे . जगात जिथे जिथे म्हणून सुसंस्कृत लोकांनी वस्ती केली तिथे तिथे त्यांनी शिकारीवर गुजराण करणे बंद करुन शेतीवर पोट भरावयास सुरुवात केली . बाल्यावस्थेपासून मानवास गोमाताच दूध देई व शेतीची सर्व अवजड कामे करणाऱ्या बलवान बैलांची जननी देखील गोमाताच !अशा रितीने सर्व जगाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पोसणारी गोमाता जी भारतीयांना परम वंदनीय आहे तिला पुजण्याचा आज दिवस !वसुबारस

🌟शुभ दीपावली..🌟


No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....