कोटमगावची त्रिगुणात्मक स्वरूपातील जगदंबा
येवल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोटमगाव असून, मुख्य रस्त्यापासून जवळच उजव्या बाजूला नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत नारंदी नदी काठावर जगदंबामातेचे मंदिर वसलेले आहे. आई जगदंबेचे हे स्थान स्वयंभू आणि जागृत आहे. जगदंबा नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती या तीन देवींचे एकरूप येथे एकवटले आहे.
कोटमगावच्या देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, अतिशय प्रशस्त आहे. मंदिराला आतून पूर्णपणे टाइल्स बसविलेल्या आहेत. समोर तीन मोठे दरवाजे असून, देवीचा गाभारादेखील टाइल्सने आतून-बाहेरून सुशोभित करण्यात आलेला आहे. कोटमगावच्या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे देवीचा गाभारा उंचावर नसून जमिनीवर खोलगट जागेवर आहे.
ही त्रिगुणात्मक स्वरूपातील जगदंबा येथे कशी अवतीर्ण झाली याबाबत एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी :
महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालिंधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. त्याला अपयश माहीत नव्हते. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूंचा धावा केला.
श्री विष्णूंनी जालिंधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले व सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालिंधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शील हरण झाल्याबरोबर दैत्यराज जालिंधर पराभूत झाला व त्याचा मृत्यू झाला. जालिंधराचा मृत्यू झाल्याबरोबर सतीने श्री विष्णूंना ओळखले व तुम्ही शालिग्राम होऊन पडाल, असा शाप दिला. शापाने श्री विष्णू शालिग्राम होऊन कोटमगावी पडले.
श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या. तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत श्री महाकालीकडे गेल्या, तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता-शोधता तिघींना श्री विष्णू कोटमगावी शालिग्राम रूपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शापमुक्त केले आणि तिघी या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज, तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रूपात वास करू लागल्या व मग या त्रिगुणात्मक गुप्तरूपात एका नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.
कोटमगावच्या देवीची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. देवीचे तीन मुखवटे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे आहेत. पूर्वीची मूर्ती वालुकामय होती. त्यावर शेंदराचा लेप लावत असत. त्यातूनच आताच्या मूर्तीचा आकार निर्माण झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर देवीची मूर्ती पूर्णपणे शेंदाराचीच आहे. पूर्वी देवीला कोणताही आकार नव्हता. त्याला आकार देण्यासाठी कै. बनाजी पुतळे यांनी देवीला चांदीचे डोळे बसवून हल्लीचा आकार दिला. आठ पिढ्यांपासून पुतळे कुटुंबियांना देवीच्या पूजेचा मान आहे.
या देवीचे विशेष म्हणजे तिला सोन्या-चांदीच्या अलंकारांऐवजी फुलांच्या अलंकारांनी सजविण्याची प्रथा आहे. देवीच्या अलंकारांमध्ये चांदीचा मुकुट प्रमुख असून, तो नवरात्रातील सातव्या माळेला देवीला चढवितात. इतर दिवशी फूलमाळांची आरास करतात. कोटमगावच्या देवीच्या मंदिराजवळून पूर्वी नारंदी नावाची नदी वाहत होती. मंदिर टेकडीवर होते. आजही आसपासच्या इतर घरांच्या व वस्तीच्या तुलनेत कोटमगावच्या देवीचे मंदिर उंचावर आहे. त्यामानाने देवीचा गाभारा मात्र खोलगट भागात आहे. पूर्वी तर हा गाभारा अधिकच खोल होता.
सन १९५८ मध्ये कोटमगावच्या देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यापूर्वी याच जागेवर लाकडी बांधणीचे मंदिर होते. हल्ली बांधण्यात आलेले मंदिर सिमेंट काँक्रीटचे आहे. मंदिराच्या आसपास बारा धर्मशाळा आहेत. ज्या भाविकांच्या मनोकामना देवीमुळे पूर्ण झाल्या अशा देवीभक्तांनी या खोल्या कृतज्ञभावाने बांधून दिल्या आहेत. नवसपूर्ती करताना भाविक देवीला चांदीचे हात, पाय, तसेच येवल्याची सुप्रसिद्ध पैठणीदेखील वाहतात.
https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_21.html
No comments:
Post a Comment