Saturday, 3 September 2022

ज्येष्ठा गौरीचे प्राचीनत्व






https://tinyurl.com/yckzf377


भारतीय मन हे उत्सवप्रिय आहे; अनेक सांस्कृतिक सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. गणेश चतुर्थी हा याच परंपरेतील सगळय़ात मोठा सण. घरोघरी गणेशाचे आगमन मोठय़ा थाटात केले जाते. गणपती हे या सणाचे आराध्य दैवत असले तरी या काळात गणेशाच्या मागून लगेच येणाऱ्या गौरींचे महत्त्व कमी नाही. त्याही त्याच थाटात गणेशाच्या शेजारी विराजमान होतात व आपले अस्तित्व गणेशाच्या बरोबरीने व्यक्त करतात.


भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या गौरींचे व्रत हे ज्येष्ठा गौरी या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशाचे व गौरींचे हे एकत्र आगमन निश्चितच त्यांच्यातील ऋणानुबंध दर्शवते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात बहुतांश सगळय़ाच भागांत गौरी-गणपतींचे आगमन होते. गणेशासोबत येणाऱ्या या गौरी कधी गणेशाची पत्नी म्हणून तर कधी भगिनी, मुख्य म्हणजे माता म्हणून वावरताना दिसतात. कधी त्या लक्ष्मी रूपात तर कधी पार्वती स्वरूपात असतात. म्हणूनच या गौरी नक्की कोण याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.


मूलत: त्या आदिशक्तीच्या प्रतिरूपात असल्याने पार्वती व लक्ष्मी ही भिन्न नामाभिधाने असली तरी त्यांचा मूळ शक्तीस्रोत एकच आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणूनच त्यांचे उत्पत्ती मूळ तसेच काळानुरूप त्यांच्या रूपात झालेला बदल व विकास हा तितकाच रोचक व गूढरम्य ठरतो.

गौर: म्हणजे सर्वोत्तम असे तेज, तपोबलाच्या तेजाने युक्त आहे ती म्हणजे गौरी. वैशाख वणवा सरला की निसर्गात बदलाचे वारे वाहू लागतात, तप्त धरणीवर पर्जन्य तुषारांचे असंख्य मोती नवचैतन्य निर्माण करतात. सृष्टी जणू सासरच्या तप्त झळा सोसून माहेरी आलेल्या विवाहितेप्रमाणे पुन्हा एकदा बहरू लागते. सृष्टीचे नवतेजाने बहरास येणे हे गावोगावीच्या माता-भगिनी ज्येष्ठागौरी या व्रताच्या माध्यमातून साजरे करतात. म्हणूनच कोकणासारख्या ठिकाणी पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक असलेल्या तेरडय़ाच्या रोपांचे गौरी म्हणून पूजन करण्यात येते. येथे साक्षात भू-मातेला गौरींच्या रूपात घरी आणून पोटच्या लेकीप्रमाणे यथामती, यथाशक्ती तिचे कोडकौतुक केले जाते. जगत् जननीच्या मातृत्वाचा सामान्य मातेकडून होणारा हा सन्मान अद्भुतच म्हणावा लागेल. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर या ज्येष्ठा गौरींचे आगमन होते व त्यानंतर सलग तीन दिवस चालणाऱ्या या सोहळय़ात दोन दिवस आगमन व पूजा होत असून तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. तीन दिवसांचा हा उपासना विधींचा क्रम सर्वमान्य असला तरी पूजनाच्या पद्धती व परंपरा या महाराष्ट्राअंतर्गतही निरनिराळय़ा आहेत. कोकणात एक तर देशावर दोन गौरींची म्हणजेच दोन भगिनींची आरास असा प्रघात आहे तर काही ठिकाणी गौरींसोबत त्यांच्या सखी तर इतर काही ठिकाणी त्यांची मुलं यांची आरास करून पूजा केली जाते. ज्येष्ठा गौरींचे हे व्रत आज महाराष्ट्रात जरी प्रचलित असले तरी उर्वरित भारतात कमीअधिक फरकाने ज्येष्ठा गौरींची उपासना केली जाते. प्रांतापरत्वे या उपासना विधींमध्ये भिन्नत्व आढळत असले तरी त्यांचा गाभा मात्र एकच आहे.

ज्येष्ठा गौरींचे मूळ नक्की कोणते याचा शोध घेतल्यास त्यांचा सर्वप्रथम स्पष्ट संदर्भ आपल्याला पुराणात ज्येष्ठा लक्ष्मी व कनिष्ठा लक्ष्मी असा सापडतो. या आधी नमूद केल्याप्रमाणे देशावर ज्येष्ठा गौरींची आरास दोन बहिणींच्या रूपात केली जाते. याच दोघी पौराणिक ग्रंथात मोठी ‘ज्येष्ठा’, तर धाकटी ‘कनिष्ठा’ म्हणून उपस्थित असल्याचे लक्षात येते. त्यांचा येणारा हा उल्लेख खूप नंतरच्या काळातला म्हणजे मध्ययुगीन असला तरी त्यांच्या गुण-कर्मानुसार त्यांचा प्राचीनम् उल्लेख हा वैदिक वाङ्मयात ‘पापी लक्ष्मी’ व ‘पुण्या लक्ष्मी’ असा आलेला आहे. या विशेषणांवरूनच दोघींच्या तामसिक व सात्त्विक प्रवृत्तीची अनुभूती होते. गौरी-गणपतीच्या काळात जरी दोघींची एकत्र पूजा होत असली तरी त्या परस्परविरुद्ध स्वभावाच्या आहेत, हे येथे वेगळे सांगायला नको.

पौराणिक कथेनुसार एक ‘अलक्ष्मी’ (ज्येष्ठा लक्ष्मी) तर दुसरी ‘लक्ष्मी’ आहे. अलक्ष्मीचा उल्लेख ‘ज्येष्ठा’ असा येत असला तरी सुलक्षणी लक्ष्मीचा ‘कनिष्ठा’ असा उल्लेख धार्मिक वाङ्मयांनी टाळलेला आहे. अलक्ष्मीचे ‘ज्येष्ठा’ हे विशेषण तिच्या विघ्नरूपतेतून व त्यामुळे प्राप्त झालेल्या आद्य पूजेच्या मानातून लाभलेले आहे. महाभारत, पद्मपुराण आदी ग्रंथ लक्ष्मी व अलक्ष्मी यांच्या जन्मामागे समुद्रमंथनाची कथा देतात. समुद्रदेवतेच्या या कन्यांपैकी लक्ष्मीच्या जन्माशी अमृताचे तर अलक्ष्मीच्या जन्माशी हलाहलाचे साहचर्य पुराणकथांनी कल्पिले आहे. हाच संदर्भ देऊन महाभारत लक्ष्मीला देवांची तर अलक्ष्मीला असुरांची असे नमूद करते. म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी व कचऱ्याच्या स्वरूपात अलक्ष्मीची पूजा करून नंतर लक्ष्मीला,अशुभ लक्ष्मी घरातून जाऊन शुभ लक्ष्मी घरात नांदो, अशी प्रार्थना केली जाते. पौराणिक संदर्भानुसार अलक्ष्मीचा वावर हा अनिष्ट, अशुभ ठिकाणी असतो, तर याउलट लक्ष्मी ही शुभ ठिकाणी विराजमान होते. मूलत: इष्ट व अनिष्ट ही एकाच लक्ष्मीची द्वंद्वात्मक रूपे आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठेला दाखविण्यात येणारा मांसाहारी नैवेद्य हा निषिद्ध नाही.

येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे शक्तीचा उगम हा स्पंदनाच्या रूपात असतो. उत्पत्ती- स्थिती- लय हा शक्तीचा गुणधर्म आहे. ती सृष्टीतील सर्व सजीव-निर्जीव गोष्टींच्या रूपांतून प्रकट होते. तिला सकारात्मक तसेच नकारात्मक यापैकी कोणत्याही गोष्टींचा निषेध नाही. ती एकाच वेळी सुर-असुर यांच्यामधून प्रकट होणारी आहे. म्हणूनच वैदिकांप्रमाणे तिचे तांत्रिकही पूजक आहेत व याच कारणास्तव अनेक ठिकाणी प्राचीन-धार्मिक वाङ्मयात अलक्ष्मीचे तसेच तिच्याशी साधम्र्य असणाऱ्या विघ्न मातृदेवतांची स्तुती करून आवाहन केल्याचे लक्षात येते. तर श्री सूक्तात अलक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासाठी लक्ष्मीलाच केलेली प्रार्थनाही आढळते. देवीच्या रूपातील हाच फरक दर्शविण्यासाठी पुराणकथाकारांनी विष्णूला लक्ष्मीचा स्वामी केले तर अलक्ष्मीला भर्तार परित्यक्ता म्हणून वर्णिले आहे.


म्हणूनच महाराष्ट्रात काही ठिकाणी ज्येष्ठा गौरींच्या उपासना विधींमध्ये विधवा भोजनाचा विधी केला जातो. किंबहुना अलक्ष्मीच्या पतीने तिचा त्याग केल्यामुळे लक्ष्मी-विष्णूच्या कृपेमुळे तिला पिंपळाच्या झाडाखाली स्थान मिळाले व तिची पूजा करणाऱ्या गृहस्थांच्या घरात लक्ष्मी निवास करेल असा वरही मिळाला असा उल्लेख सापडतो. असे असले तरी मार्कण्डेय पुराणात अलक्ष्मीच्या पतीचे नाव मृत्यू/ काल असे दिलेले आहे. तसेच निर्ऋ ती ही अलक्ष्मीची सवत असून तिच्या चौदा पुत्रांपैकी दु:सह नावाचा पुत्र हा गजरूप आहे. काल किंवा मृत्यू हा कलिवल्लभ, कालवल्लभ अशा विविध नावांनी प्राचीन ग्रंथांमध्ये उपस्थित राहातो. तर त्याच्या भार्या या गटात निर्ऋती, ज्येष्ठा लक्ष्मी यांचा समावेश होतो. वास्तविक प्राचीन वाङ्मयात अनेक ठिकाणी ज्येष्ठा लक्ष्मीचा उल्लेख निर्ऋती अलक्ष्मी असा करण्यात आलेला असून येथे निर्ऋती व ज्येष्ठा लक्ष्मी या भिन्न नसून एकच असल्याचे लक्षात येते. ग्रंथकारांनुसार निर्ऋती ही मृत्यूची, नाशाची व दु:खाची देवता असून ती नैर्ऋत्य दिशेची अधिष्ठात्री आहे. असे असले तरी ते एक लक्ष्मीचेच रूप असल्याने प्राचीन ग्रंथांमध्ये निर्ऋतीचा उल्लेख भू-माता असाही येतो. एकूणच एकाच वेळी ज्येष्ठा अलक्ष्मीचे मृत्यूशी व सर्जनाशी असलेले नाते येथे प्रकर्षांने जाणवते. किंबहुना मध्ययुगीन शाक्त संप्रदायाच्या प्रभावाखाली तत्कालीन मंदिर तसेच लेणी शिल्पांमध्ये निर्ऋती अलक्ष्मी आपल्या मनुष्य तर कधी मनुष्य प्रेत या वाहनांसोबत विशेष स्थान दाखवते. या सर्व संदर्भात निर्ऋती अलक्ष्मीचा गजमुखी पुत्र दु:सह याची उपस्थिती विशेष उल्लेखनीय आहे. म्हणूनच अर्वाचीन गौरी परंपरांमध्ये गजमुखी गणेशाचे व ज्येष्ठेचे माता पुत्राचे नाते काही भागात अबाधित आहे.


असाच ज्येष्ठेचे व गणेशाचे नाते सांगणारा आद्य संदर्भ बौधायन गृह्यसूत्रात येतो. बौधायन गृह्यसूत्रातील ज्येष्ठा कल्पात ज्येष्ठा अलक्ष्मी उपासनेचा विधी सांगितला आहे. अगदी इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ज्येष्ठा गौरी व विनायकरूपी गजाननाचे दृढ नाते होते, हे बौधायन गृह्यसूत्रातील पाठोपाठ येणाऱ्या ज्येष्ठा व विनायक कल्पावरून लक्षात येते. ज्येष्ठाकल्पानुसार ज्येष्ठा म्हणजेच अलक्ष्मी ही रूपाने लंबोदरा, हस्तिमुखा आणि विघ्नपार्षदा आहे. तिच्या रथाला सिंह जोडलेले असून रथामागून वाघ चालत येतात. सिंह व वाघ ही प्रतीके तिचे नाते महादेवीशी सांगणारे आहे असे काही अभ्यासक मानतात. म्हणूनच काही ठिकाणी विशेषत: महाराष्ट्र, बंगाल तसेच दक्षिणेकडे ज्येष्ठा गौरींचा संबंध पार्वतीशी जोडला जातो. तसेच बौधायन गृह्यसूत्रातील विनायक कल्पात विनायकांचा उल्लेख हस्तिमुखी व विघ्नपार्षद असा येतो. मानवगृह्य सूत्रातील विनायक समूह बौधायन गृह्यसूत्रातील विनायकांशी साम्य साधतो. किंबहुना हे विनायक ज्येष्ठा अलक्ष्मीप्रमाणे विघ्नकर्ते असल्याने त्यांच्या शांतीसाठी धार्मिक ग्रंथांमध्ये विविध विधी सापडतात. याशिवाय येथे नमूद करावयाची विशेष बाब म्हणजे गणपती ‘ज्येष्ठराज’ या नावांनीदेखील प्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे तर महागणपती सहस्र नामावलीदेखील गणेशाचे ज्येष्ठराज असे नाव नमूद करते. मूलत: आपल्या आजच्या गणपतीचे रूप हे ब्रह्मणस्पती तसेच यक्षरूपी विनायकांच्या साहचर्यातून आकारास आलेले आहे हे सर्वश्रुत व सर्वमान्य आहे. किंबहुना ब्रह्मणस्पती सूक्तात ब्रह्मणस्पतीचे एक नाव हे ज्येष्ठराज आहे. ज्येष्ठा व ज्येष्ठराज यांच्या गुणकर्मात जसे साम्य जाणवते तसे ते बाह्यरूपातही आहे. किंबहुना हे साम्य विनायक व त्याची शक्ती ‘योगिनी वैनायकी’ यांच्यात जसे आहे तसेच ज्येष्ठा व ज्येष्ठराजात आहे. म्हणूनच आजच्या ज्येष्ठेला ज्या भागात गणेशाची पत्नी म्हणून पूजले जाते त्यात काहीही चुकीचे ठरत नाही. याउलट गणेशाचा ‘विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता’ हा प्रवास लक्ष्मीच्या ‘पापी ते पुण्या’, ‘ज्येष्ठा ते कनिष्ठा’ या प्रवासाशी विशेष साधम्र्य व संलग्नता साधतो हे लक्षात येते. आजच्या युगात ज्येष्ठा गौरींची स्थापना, आरास, पूजन हे अनेक मार्गानी केले जाते. गौरींना आज जे रूप प्राप्त झाले आहे त्यासाठी त्यांना अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले आहे. ज्येष्ठा गौरींचे मूर्तिविज्ञान हे कालानुरूप बदलत असले तरी त्यांच्या प्रकट रूपातून त्या नेहमीच आपल्या मूळ तत्त्वाची जाणीव करून देतात. केवळ ज्येष्ठाच नाही तर प्रत्येक देवतेचे तत्त्व हे त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रकट होते. भारतीय मातृदेवता या वारूळ, पाण्याचा वाहणारा प्रवाह, तांदळा, कोंब आलेले धान्य, मातीचे मडके, ज्योत, योनीरूप, मानवीरूप अशा विविध रूपांत प्रकट होतात. भारतीय संस्कृतीत सर्जनाला विशेष महत्त्व असल्याने सृष्टीत नव्याने आकारास येणाऱ्या प्रत्येक तत्त्वाच्या मुळाशी आदिमायेचा वास असतो अशी धारणा आहे व हीच धारणा ज्येष्ठा गौरींच्या मूर्तिविज्ञानाच्या मुळाशी कार्यरत असल्याचे लक्षात येते. आधुनिक महाराष्ट्रात गौरी बसवायच्या पद्धती व कुळाचार हे भिन्न भिन्न आहेत.

काही घरांत गौरींचे मुखवटे स्टॅण्डच्या सहाय्याने साडीचोळी नेसवून पुजले जातात, तर काही जण लक्ष्मीची धातूची किंवा मातीची मूर्ती किंवा कागदावरील प्रतिमा गौरी म्हणून पूजतात. कोकण किनारपट्टीवर नदीकाठचे किंवा नैसर्गिक जलस्रोताजवळील पाच, सात, अकरा या विषम संख्येने कुमारिकांकरवी लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. तर कोकणातच काही ठिकाणी सुहासिनींकडून तेरडय़ाची रोपे मुळासकट आणून इतर पत्रींसोबत गौरी म्हणून पूजा केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात ही अशाच स्वरूपाच्या नैसर्गिक वनस्पतीच्या साहाय्याने तयार केलेल्या लक्ष्मी पुजल्या जातात, तर काही ठिकाणी पाच छोटी मडकी घेऊन त्यांची उतरंड रचली जाते व त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा स्थापन केला जातो. काही घरांत धान्याच्या राशींना मुखवटा व साडीचोळी नेसून गौरी म्हणून पुजले जाते. गौरींचे या विविध निसर्गरूपांमधील पूजन हे त्यांचे भू-देवीच्या रूपाचे संकेत देणारे आहेत. पौराणिक तथा प्रतिमाविज्ञानविषयक ग्रंथांमध्ये ज्येष्ठा ही द्विभुजा, काळी, लंबोष्ठा, तुंगनासिका, लोंबणाऱ्या स्तनांची, निळे व तांबडे वस्त्र परिधान करणारी, हातात निळे कमळ धारण करणारी व खरारूढ, हातात आयुध म्हणून केरसुणी धारण करणारी आहे. तिच्या मूर्तीच्या उजवीकडे वृषमुखी पुरुष व डावीकडे स्त्रीमूर्ती असते. अशा स्वरूपाच्या मूर्ती दक्षिणेत मोठय़ा प्रमाणात आढळतात. इतकेच नव्हे तर तमिळ साहित्यात ज्येष्ठेसाठी मुगडी, तोवै, कळडी, मूदेवी, काकध्वजा, खरारूढा, एकवेणी, दृष्ट स्त्री या आशयाचे नाम उल्लेख सापडतात. उपलब्ध पुराव्यांवरून दक्षिण भारतात इसवीसनाच्या आठव्या शतकात ज्येष्ठा गौरींची उपासना करणारा मोठा वर्ग अस्तित्वात होता. कालांतराने तिची उपासना विस्मरणात गेली हे विशेष. असे असले तरी आजही तमिळनाडूमध्ये ज्येष्ठेची मध्ययुगीन शिल्पे सापडतात. या शिल्पांवरील वृषमुखी पुरुष व डावीकडील स्त्री ही ज्येष्ठेची अपत्य मानली जातात. तर आधी नमूद केल्याप्रमाणे आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरींसोबत तिच्या मुलांची आरास करून पूजा केली जाते. हे उदाहरण महाराष्ट्र व तमिळ प्रांताचा सांस्कृतिक अनुबंध दर्शविणारे आहे. केवळ भारतातच नव्हे तर आग्नेय आशियातही हाच निसर्गबदलाचा सोहळा मातृशक्तीच्या उपासनेतून साजरा केला जातो हे इथे विशेष नमूद करण्यासारखे आहे!


डॉ. शमिका सरवणकर (लोकसत्ता)

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....