Tuesday, 9 August 2022

एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत...

 एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत... 

https://tinyurl.com/2sek32va


मेन रोडवरील मनपाची ही वास्तू १९३७ साली बांधण्यात आली होती.  ही इमारत बांधण्याचे कंत्राट काकासाहेब वाघ यांनी घेतले होते. मात्र विविध कारणांमुळे सदर इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम  तत्कालीन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या दंडापोटी श्री काकासाहेब वाघ यांना भरावी लागली. या कंत्राटात त्यांना खूपच तोटा झाला. याकारणास्तव त्यांनी कंत्राटापोटी मिळालेल्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम जास्त होत असल्याने इमारतीच्या बांधकामाचा खर्च १ रुपया इतका नामफलकावर नमूद करावा अशी विनंती केली. ती विनंती मान्य करण्यात येऊन तास उल्लेख नामफलकावर करण्यात आला.  या इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. त्यामुळे हि इमारत दगडी इमारत म्हणूनही ओळखली जाते. 


या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन पाकिस्तानच्या दिवगंत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे आजोबा शाहनवाझ भुत्तो यांनी १७ ऑक्टोबर १९३४ रोजी केले होते. व त्याप्रसंगी तयार करण्यात आलेल्या संगमरवरी नामफलकावर नगरसेवक भुट्टो यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. १९७१ ला पाकिस्तान युद्धा दरम्यान नाशिक नगरपालिकेने महासभेत ठराव पास करून ते नाव काढण्यात आले. .दिंडोरी तालुक्यातील इंदोरीचे शाहनवाझ भुत्तो हे त्याकाळी नाशिकमधील नावाजलेलं प्रस्थ होते. 


कालांतराने कामकाज वाढल्यामुळे सदर इमारत अपुरी पडू लागली व मोठ्या इमारतीची गरज निर्माण झाली. शरणपूर भागात नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली. नाशिक महापालिकेचे मुख्यालय या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. या मनपा मुख्यालयाचे 'राजीव गांधी भवन' असे नामकरण करण्यात आले. मनपाच्या मूळ इमारतीत मनपाचे पूर्व विभागाचे कार्यालय कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र पुरेशा देखभालीअभावी जीर्ण झाल्यामुळे सदर कार्यालयही २०१९ मध्ये दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित  करण्यात आले. 





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....