आज रक्षाबंधन.
भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचा सन्मान करण्याचा दिवस. बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण ओळखतात. त्या प्रेमाला अतुट बंधनात राखीच्या रूपाने बांधण्याचा हा दिवस. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. राखीचा हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात ते रक्षाबंधन विधी करतात. श्रावणीपूर्णिमेला अपरान्हकाळी रक्षाबंधन विधी करावयाचा असतो. अक्षता, मोहरीचे दाणे, निरिनराळ्या रंगाचे मणी सोन्याच्या तारेत ओवून एक रक्षा ( राखी) अथवा कंकण तयार करून ती हातात बांधावयाची असते.
रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव म्हणजे राखी पौर्णिमा. ‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून राखी हे त्या शब्दाचेच मराठी रुपांतर होय. अलिकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ही राखी अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करतात. हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरतात. हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे हा रक्षाबंधन मागील प्रमुख हेतू आहे असे दिसते. पूर्वी उत्तर भारतापुरती मर्यादित असलेली ही प्रथा आता भारतभर रूढ झाली आहे. हेमाद्रीने चतुर्वर्गचिंतामणीमध्ये भविष्य पुराणातील इंद्र आणि इंद्राणी संदर्भात कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली रक्षाबंधन संबंधित कथा दिली आहे. या कथेनुसार इंद्राणीने इंद्राच्या उजव्या हातात राखी बांधली आणि त्यामुळे तो असुरांचा पराभव करण्यास समर्थ झाला. निर्णयसिंधू या ग्रंथात देखील रक्षाबंधन संदर्भात नोंद दिलेली आहे.
पूर्वीच्या काळी मंत्री राजाला राखी बांधत असे, राखी बांधताना मंत्री रक्षाबन्धनमंत्र म्हणत,
ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥
(ज्या राखीने दानवांचा महापराक्रमी राजा बली याला बद्ध केले, आपलेसे केले, ती राखी मी तुला बांधीत आहे. माझे रक्षण कर. यात अंतर देऊ नकोस).
राखी पौर्णिमेलाच पोवती पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पवित्रारोपण म्हणजेच देवतांना पोवती अर्पण करून नंतर ती स्त्री-पुरुष यांच्या हातावर बांधण्याचा विधी असतो. पोवते म्हणजे देवतेला वाहण्याचा पवित्र दोरा होय. रक्षाबंधन हे या विधीचेच रूपांतर असण्याची शक्यता आहे. पूर्वी याच दिवशी केल्या जाणाऱ्या सर्पबलीचे पुढे नागपंचमीत रूपांतर झाले, असे दिसते. सर्पापासून वा सर्पासारख्या अनिष्ट शक्तीपासून रक्षण करण्याच्या हेतूने रक्षाबंधनाचा विधी सुरू झाला असण्याची शक्यता आहे. याच दिवशी श्रावणी वा उपाकर्म विधीही केला जातो.
श्रावण महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावरील कोकण, मलबार इ. प्रदेशांतील लोक जलाची अधिष्ठात्री देवता असलेल्या वरुणाला उद्देशून समुद्रात नारळ अर्पण करतात. खवळलेला समुद्र सामान्यतः या दिवसापासून शांत होऊ लागतो. जैन लोक राखी पौर्णिमा रक्षापर्व म्हणून साजरी करतात तसेच मुसलमान व पारशी लोकांतही नारळ अर्पण करण्याची ही प्रथा आहे.
सर्वांना रक्षाबंधन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्याच बहीण भावांमधील आपुलकी, स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा ही रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सदिच्छा.
#राखीपौर्णिमा #rakshabandhan2022 #RakshaBandan
No comments:
Post a Comment