फक्त नागपंचमीच्याच दिवशी उघडणारे श्री भगवान नागचंद्रेश्वर मंदिर
आज सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा होत असताना आपण फक्त नागपंचमीच्याच दिवशी दर्शनासाठी खुले असणारे श्री भगवान नागचंद्रेश्वर मंदिर या अनोख्या मंदिराबद्दल जाणून घेऊयात.
या मंदिरातील मूर्ती हि एकमेवाद्वितीय अशी एकमात्र मूर्ती आहे. भगवान महादेव सर्वत्र शिवलिंगाच्या स्वरूपात पूजाला जात असला तरी या मंदिरात शिवशंकराची पार्वतीसहित
मानवी रूपातील मूर्तीचे पूजन केले जाते. या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवान शिवशंकर हे पार्वतीसहित नागशय्येवर आसनस्थ झालेले आहेत. पंचमुखी नागराज 'तक्षक' याच्या वेटोळ्यावर चतुर्भुज भगवान शिव सुखासनात बसलेले असून त्यांच्या डाव्या मांडीवर पार्वती विराजमान झालेली आहे. नागराजने आपला पंचमुखी फणा मस्तकी उभारला आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला गणेश व कार्तिकेय एका फणा उभारलेल्या नागाच्या वेटोळ्यावर बसलेले आहेत. खाली शिव-पार्वतीचे वाहन असलेले नंदी व सिंह बसलेले आहेत. म्हणजे संपूर्ण शिव परिवार नागछत्रामध्ये विराजमान झालेला आहे. शेषशय्येवर भगवान विष्णू विराजमान असतात हे आपणास विदित आहेच मात्र भगवान विष्णूंऐवजी भगवान शिव शेषशय्येवर आसनस्थ असलेली ही जगात एकमात्र मूर्ती असल्याचे मानले जाते.
नागराज तक्षक याने याठिकाणी असलेल्या महाकाल वनात भगवान शिव प्रसन्न व्हावे म्हणून घोर तपस्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर श्री शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्यास अमरत्वाचे वरदान दिले. त्यामुळे नागराज तक्षक नित्य शिवशंभुच्या सानिध्यात राहू लागले. मात्र या ठिकाणी निवास करत असताना त्यांच्या एकांतात विघ्न आणू नये अशा सूचना त्यांनी आपल्या इतर नाग सेवकांना दिल्या होत्या. त्यामुळे त्याच ठिकाणी महांकालेश्वर मन्दिरातच हे मंदिर निर्माण केले गेले व हे मंदिर दर्शनासाठी केवळ नाग पंचमीच्या दिवशी खुले केले जाते अशी या मंदिराबाबत आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. नागपंचमीच्या दिवशी रात्री १२ ते दुसऱ्या दिवशी रात्री १२ असे केवळ २४ तास हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. त्यानंतर वर्षभर हे मंदिर बंद ठेवतात.
हे मंदिर उज्जैन येथे येथील महांकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील उपमंदिरात स्थित आहे. त्यामुळे रूढार्थाने हे स्वतंत्र मंदिर नाही. हि मूर्ती ११व्या शतकातील असून नेपाळहून आणलेली आहे असे सांगितले जाते. हे प्राचीन मंदिर परमार राजा भोज याने इ.स. १०५० मध्ये निर्माण केले होते. त्यानंतर मराठा सरदार राणोजी शिंदे यांनी इ.स. १७३२ मध्ये या महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सर्व प्रकारच्या सर्पदोषांपासून मुक्ती मिळते अशी भक्तांची धारणा असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी इथे भाविकांची अलोट गर्दी असते.
No comments:
Post a Comment