Friday, 12 August 2022

असा झाला भारताच्या राष्ट्रध्वजाचा प्रवास


यावर्षी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' हे अभियान चालवले आहे व त्यास सर्व भारतीयांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे. अशा आपल्या तिरंगा ध्वजाच्या निर्मितीचा प्रवास कसा झाला ते पाहू. 


भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विविध गटाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारताचा राष्ट्रध्वज ठरविण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रध्वज तयार करण्याचे प्रयत्न पाच वेळेला झाले. 


पहिल्यांदा  ७ ऑगस्ट १९०६ रोजी नवा ध्वज हा निर्माण करून कलकत्ता येथे फडकवला गेला होता. हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन रंगाचे याच अनुक्रमाने तीन पट्टे, मध्यभागी 'वंदे मातरम्' हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर ८ कमळे असे या ध्वजाचे स्वरूप होते. 


भारताचा दुसरा ध्वज थेट जर्मनीतल्या बर्लिन येथे मादाम भिकाजी कामा यांनी १९०७ साली आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. या राष्ट्रध्वजातील वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा हिरवा होता. केशरी पट्टयावर ८ तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात होते तर हिरव्या पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तसेच या तिरंग्याच्या मधल्या पट्ट्यावर देवनागरी लिपीत ‘वंदे मातरम्’ लिहिले होते.


भारतातचा तिसरा ध्वज हा होमरुल चळवळी दरम्यान अँनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी १९१७ साली फडकवला होता. या राष्ट्रध्वजावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. तसेच त्यावर आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणे या झेंड्यावर सात तारे काढलेले होते. वरच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक व समोरच्या कोपऱ्यात चंद्र व सूर्य होते. 


त्यानंतर १९२१ मध्ये महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ते पिंगली वेंकय्या यांना नवीन ध्वज निर्माण करण्यास सांगितले. त्यानुसार पिंगली व्यंकय्या यांनी एक राष्ट्रध्वज तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला होता. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक म्हणून अनुक्रमे लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. त्यात लाला हंसराज यांनी त्यात एक सूत काढण्याचा चरखा आणि गांधीजी यांनी एक पांढरी पट्टी जोडण्यास सांगितली होती. अशाप्रकारे वर पांढरा, मध्ये हिरवा व खाली लाल रंगाचे पट्टे व त्यांवर तीन आऱ्यांचा चरखा असा ध्वज तयार करण्यात आला. भारताचा हा चौथा राष्ट्रध्वज १९२१ साली आंध्रप्रदेश येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मान्य झाला होता. या ध्वजाला स्वराज ध्वज, चरखा ध्वज किंवा गांधी ध्वज या नावानेही तेव्हा ओळखले जात होते. 


१९३१ मध्ये काँग्रेस पक्षाने ध्वज निर्मितीसाठी सात सदस्यीय समिती नेमली. या समितीने हा आधीच्या ध्वजात काही बदल करून नवीन ध्वज अस्तित्वात आणला. त्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे व मध्यभागी चरखा होता. या झेंड्याने रंगांचा धर्माशी असलेला अर्थ काढून टाकला होता. हाच ध्वज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेनेही स्वीकारला होता. 


१९४७ मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने लवकरच स्वातंत्र्य देणार असल्याचे जाहीर केले तेव्हा काँग्रेसने डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक तदर्थ ध्वज समिती नेमली.  या समितीने महात्मा गांधीजींच्या संमतीने अगोदरच्या राष्ट्रध्वजात एक बदल करून २२ जुलै १९४७ रोजी हा ध्वज स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून   स्वीकारला. त्यावर चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावरील धर्मचक्राला स्थान दिलं. अशाप्रकारे अखेर भारताला सर्वसमावेशक असा राष्ट्रध्वज मिळाला. 



No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....