Tuesday, 16 August 2022

पिनकोडची 'पन्नाशी'

 पिनकोडची 'पन्नाशी' 



राज्यातील एखाद्या खेडेगावात असलेल्या आपल्या जिवलगापर्यंत पत्र पोहोचवायची गरज ते आज अवघे जग इंटरनेटच्या वेगावर धावत असताना ऑनलाइन खरेदीपासून घरोघरी खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन वितरण व्यवस्थेपर्यंत सगळीकडे महत्त्वाची ठरणारी गोष्ट ‘पिन कोड’. काळ भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या वरकरणी सोप्या वाटणाऱ्या मात्र अत्यंत जटिल समस्या सोडवणाऱ्या 'पिनकोड' या योजनेने सुवर्णमहोत्सव म्हणजेच 'पन्नाशी' गाठली. भारतासारखा खंडप्राय देश अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांत विभागला आहे. इथे विविध भाषा बोलल्या आणि लिहिल्या जातात. त्याशिवाय एकाच नावाची अनेक गावे एकाच राज्यात किंवा वेगवेगळ्या राज्यांत आहेत. उदाहरणार्थ, रामपूर, रामनगर व राजापूर या नावाची गावे अनेक राज्यांत आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांत पत्रांचे वाटप कार्यक्षम रीत्या कसे करावे हा मोठा प्रश्न डाक विभागाला सतावत होता. ‘पिनकोड’चा शोध लागण्यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पत्र पाठवले, तर ते पोचण्यास दिवस-महिने लागत. त्याचे महत्त्वाचे कारण स्थानिक भाषेत नाव व पत्ता प्रामुख्याने लिहिलेला असे आणि अक्षर दिव्य असायचे. त्यामुळे पोस्टमनला ते चटकन कळत नसे.


भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९७२ रोजी पत्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून ‘पिन कोड’ (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही पद्धत अंमलात आणली. ही अतिशय महत्वाची पद्धत शोधून काढली ती संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्तर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी.  ते टपाल खात्यात कार्यरत असताना १९७२ मध्ये या पद्धतीचा प्रत्यक्ष सेवेत वापर करण्यात आला होता. पिन कोड पद्धतीमुळे टपाल खात्याची पत्रनिवड प्रक्रिया अधिक वेगाने आणि सोपी झाली.


वेलणकर यांनी पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबरची (पीआयएन) देशाच्या नऊ भागांत विभागणी केली. त्यामध्ये लष्करी सेवेसाठी वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे. पिनकोड हा सहा अंकी असतो. त्या अंकातील सुरुवातीपासूनचा तिसरा अंक जिल्ह्यासाठी असतो, तर शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिससाठी असतात. पहिले दोन अंक हे भारतातील दोन विविध राज्यांसाठी देण्यात आले आहेत. 


राज्यांचे एकत्रित असे आठ स्वतंत्र विभाग (झोन) करण्यात आले. प्रत्येक विभागाला एक आकडी क्रमांक देण्यात आला. नववा विभाग हा सैन्यदलाच्या टपाल सेवेसाठी राखीव करण्यात आला. 


पिन कोडच्या सहा आकडय़ांमध्ये पहिला आकडा हा संबंधित राज्य दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा कोणत्या विभागात मोडते हे दर्शवतो. दुसरा अंक त्या विभागातील उपविभाग स्पष्ट करतो. तिसऱ्या अंकातून जिल्हा कोणता हे लक्षात येते. शेवटच्या तीन आकडय़ांतून जिल्ह्यातील शहर, संबंधित परिसर आणि तेथील जवळचे टपाल खाते हा तपशील स्पष्ट होतो.


उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी 40 ते 44 पर्यंत आकडे देण्यात आले आहेत. 422030 म्हणजे नाशिक शहरातील विशिष्ट भाग. त्या संख्येपैकी पहिला चार हा आकडा महाराष्ट्रासाठी, त्यानंतरचा एक हा आकडा सब रिजन, तिसरा एक हा आकडा जिल्ह्यासाठी म्हणजे येथे 422 हा नाशिक जिल्हा होतो व शेवटचे तीन आकडे स्थानिक पोस्ट ऑफिससाठी देण्यात आले आहेत. राज्यानुसार देण्यात आलेले पिनकोडचे पहिले दोन अंक याप्रमाणे - दिल्ली 11, हरियाणा 12-13, पंजाब 14 ते 16, हिमाचल प्रदेश 17, जम्मू-काश्मीर 18-19, उत्तर प्रदेश व उत्तराखंड 20 ते 28, राजस्थान 30 ते 34, गुजरात 36 ते 39,  महाराष्ट्र 40 ते 44, मध्यप्रदेश व छत्तीसगड 45 ते 49, आंध्र प्रदेश व तेलंगणा 50 ते 53, कर्नाटक 56 ते 59, तामिळनाडू 60 ते 64, केरळ 67 ते 69, पश्चिम बंगाल 70 ते 74, ओडिशा 75 ते 77, आसाम 78, पूर्वोत्तर 79, बिहार व झारखंड 80 ते 85. भारतीय डाक सेवेसाठी (एपीएम) 90 ते 99 पर्यंत कोड नंबर वापरले जातात.


टपाल सेवेचे काम जलदगतीने होण्यासाठी अवलंबण्यात आलेली ‘पिन कोड’ पद्धत ऑनलाइन खरेदीपासून ई-मेलपर्यंत सगळीकडेच बहुपयोगी ठरल्याने अजरामर झाली आहे.






No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....