जरा जिवंतिका" पूजन...
जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी.
अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता !!!
जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ll
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते ll
अर्थ- हे वृद्ध, बालयुक्त , आनंददायिनी , बालकांचे रक्षण करणारी , महाशक्तिरूपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या आहेत अशा जीवन्तिका देवी तुला नमस्कार असो.
आज श्रावण महिना सुरु झाला. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजनानंतर श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते.
सध्याच्या काळात अनेक घरात जिवती पूजा होत असली तरी बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते. अनेकांना आजकाल जिवती किंवा जिवंतिका
पूजनाचा अर्थ कळत नाही अथवा या व्रताबद्दल काहीही माहिती नसते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात काय आहे हे हा "जिवतीची पूजा" व्रत. कोण ही जिवती?हिच्या पूजनाचा हेतू काय?
जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन घरातल्या महिलांकडून केले जाते व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची कामना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?
जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते. जाणून घेऊया त्याची कारण मिमांसा :
प्रथम भगवान नरसिंहचं का?
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह,आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक व बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण :
यातील नाग व गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावण महिन्यात पुजले जाणारे आराध्य दैवत आहेत. असे आहे तर मग नाग प्रतिमा व कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्यास फर्मावले.
जरा जिवंतिका :
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात राहत असे. मगध नरेश बृहद्रथ राजाच्या दोन राण्यांना शरीराचे दोन वेगवेगळे अर्धे भाग असलेली मुले झाली. ते दोन्ही भाग जन्मताच त्यांना नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. जरा राक्षसीने सांधले म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. राजाने जरा राक्षसीला मगधाच्या इष्टदेवतेचा सन्मान देऊ केला. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले.
अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती :
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात; तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती,अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती,हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.
बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळाले.
प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन