भारतातली पहिली महिला वकील “कॉर्नेलिया सोराबजी”
देशाच्या एकूणच जडणघडणीत महिलांचे योगदान आता कोणीच नाकारू शकत नाही. कायदे क्षेत्रातही अनेक महिला वकील आज मानाने व तडफेने काम करताना दिसतात. मात्र, भारतातील पहिल्या महिला वकील म्हणून नाव मिळविलेल्या कार्नेलिया सोराबजी या नाशिकच्या कन्येच्या योगदानाची वा कायदा क्षेत्रातील लढ्याची कोठेच स्मृती जागवली जाताना दिसत नाही. आज ६ जुलैला त्यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा व संघर्षाचा हा जागर
देशात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, सर्व क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी विविध कायदे होतांना दिसतात. महिलांना समान संधी आता मिळूही लागल्या आहेत. मात्र, १८ व्या शतकातील उत्तरार्धात भारतातील एका महिलेने कायदा क्षेत्रात महिलांना वकिली करण्याची संधी मिळावी, यासाठी मोठा संघर्ष केला होता. ही महिला होती कॉर्नेलिया सोराबजी. कॉर्नेलिया सोराबजी ( १८६६ ते १९५४) म्हणजे भारतातली पहिली महिला वकील. त्यांनी या पदापर्यंत येण्यासाठी केलेला संघर्ष कष्टप्रद होता. यात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
कॉर्नेलियाचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये नाशिकजवळील देवळालीतील पारशी कुटुंबात झाला. कॉर्नेलियाचे बालपण नाशिक, पुणे आणि बेळगावात गेले. त्यांच्या कुटुंबाने १८४१ सालीच ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. कॉर्नेलिया हे पाचवे अपत्य. कॉर्नेलियाची आई फासिना यांनी पारशी मुलांसाठी गुजराथी माध्यमाची शाळा, हिंदू मुलांसाठी मराठी तर मुस्लिम मुलांसाठी उर्दू शाळा सुरू केल्या होत्या.
कॉर्नेलियाने पदवीसाठी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या पश्चिम भारतातील पहिल्या महिला पदवीधर ठरल्या. त्या बी. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्या वर्षी महाविद्यालयातून पहिला वर्ग मिळवणा-या त्या एकमेव विद्यार्थी होत्या. त्यांना इंग्लंडमधील एका विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. पण महाविद्यालयाने प्रवेश देण्यास नकार दिला. त्या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रशासनाने जे उद्गार काढले ते त्या काळाची मानसिकता दाखवतात. It was nonsense for a woman to even think of it... अशा शब्दात कॉर्नेलियाच्या अर्जाची वासलात लावण्यात आली तरी कॉर्नेलियासारखी माणसे डगमगत नाहीत. तिने अनेक प्रयत्न केले आणि ऑक्टोबर १८८९ मध्ये ती ऑक्सफर्डला दाखल झाली. पण महिला आहे या एकमेव कारणावरून तिला प्रवेश नाकारण्यात आला.
अखेर कॉर्नेलियाच्या मित्राने याबाबत तेथील न्यायालयात महिलांना कायद्याचे शिक्षण घेता यावे, यासाठी १८९२ मध्ये याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल कॉर्नेलियाच्या बाजूने लागला अन् तिला विशेष परवानगी देण्यात आली. यामुळे तिला ऑक्सफर्ड सोमरविले कॉलेजमध्ये कायदा शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला. इंग्लंडमध्ये व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर पदवी प्राप्त करून भारतात परतल्यानानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही. तेव्हा महिलांना वकिली करण्याची परवानगी नव्हती. कायद्यात सुधारणा होऊन वकिली करण्याची परवानगी थेट १९२४ ला मिळाली. व त्यांनी कलकत्ता येथे वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली.
१९२९ मध्ये वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या. निवृत्तीच्या काळात त्यांनी महिलांविषयक समाजसुधारणेच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली लव अॅण्ड लाइफ बियाँड द पर्दा’ (१९०१), सन-बेबीज : स्टडीज इन द चाइल्ड-लाइफ ऑफ इंडिया (१९०४), बिटवीन द ट्विलाइट्स: बीइंग स्टडीज ऑफ इंडिया वूमन बाय वन देमसेल्व्ह्स (१९०८), इंडियन टेल्स ऑफ द ग्रेट वन्स अमंग मेन, वूमन अँड बर्ड पीपल (१९१६), सोराबजींनी इंडिया कॉलिंग : द मेमरीज ऑफ कॉर्नेलिया सोराबजी (१९३४), इंडिया रिकॉल (१९३६), क्वीन मेरीज बुक फॉर इंडिया (१९४३) हि पुस्तके जगभर गाजली. सामाजिक सुधारणा कायदेविषयक कामाव्यतिरिक्त त्यांनी अनेक पुस्तके, लघुकथा आणि लेखही लिहिले. ६ जुलै १९५४ ला वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी नाशिकसह राज्याचे नाव इतिहासात कोरले आहे.
No comments:
Post a Comment