Saturday, 28 May 2022

सावरकर जन्म स्थान (सावरकर वाडा), भगूर

  


भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.  भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. 

सावरकर कुटुंबाच्या वडिलोपार्जित वाड्यात २८ मे १८८३ या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांच्या नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला दिले गेले.  

सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती. जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात विकून टाकला होता. लिलावात घेणार्‍याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले होते. केंद्र सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व खात्याकडे दिले.  २८ मे १९९८ रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तितके मुळ स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते.

बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो! 

वाड्यातील तळमजल्यावरील जन्मस्थानाचे जागेवर तशी एक पाटी व सावरकरांचा परिचित फोटो आहे. कंपाऊंडच्या भिंतीच्याआतील वाडा बर्‍यापैकी मोठा आहे. आत शिरल्यावर समोर अंगण आहे. उजव्याबाजूच्या कंपाऊंडलगत त्यांचा अर्धपुतळा आहे. समोरच्या पडवीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यांकडे जाता येते. आतील खोल्यांमध्ये सावरकर-कुटुंबियांचे आणि सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहेत. 

आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!

आतल्या खोलीला लागून लहानसे देवघर आहे. तेथे त्यांच्या घरी एकेकाळी असलेल्या अष्टभुजादेवीचा फोटो ठेवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली. 

देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.

सावरकरांनी चौदा/ पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्याची ते अखेरपर्यंत झटले. 

तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.

आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.

आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी. 

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  

https://youtu.be/-4bcYFUbbhY

https://youtu.be/-4bcYFUbbhY





















No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....