Friday, 9 April 2021

रडतोंडीचा घाट, सप्तश्रृंगगड

रडतोंडीचा घाट, सप्तश्रृंगगड 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेला श्री सप्तश्रृंगगड अनादी काळापासून भक्तांना खुणावत आलेले आहे. मातेच्या दर्शनासाठी गडावर जाण्यासाठी शिवकाळापासून ते आतापर्यंत तेथे अनेक विकासकामे झाली आहेत. त्यांतीलच एक म्हणजे रडतोंडीचा घाट.  हा घाट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार विंचूरकर यांनी बांधला असे मानतात. 

आजही हा घाट ब-यापैकी शाबूत आहे. मात्र चढायला अवघड असल्याने भक्तगण मुख्यत्वे नवस फेडण्यासाठीच वापरतात. एक एक फुटांपेक्षा मोठ्या दगडात बांधण्यात आलेल्या पाय-या चढताना भल्याभल्यांच्या नाकी नऊ येतात. शेवटी शेवटी अंगावर येणा-या फुटभर उंचीच्या पाय-या सुदृढ माणसे सुद्धा रडकुंडीला येतात, म्हणून याचे नाव पडले रडतोंडीचा घाट. हा संपूर्ण घाट दुर्गप्रेमींनी अभ्यासावा असाच आहे. कारण या घाटाच्या सुरूवातीला एक, मध्यभागी एक व शेवटी गडावर एक असे तीन शिलालेख आढळून येतात व ते अद्यापही सुस्थितीत आहेत. दरीच्या टोकावर वळणे घेणारा हा घाट कसा बांधला असेल असा विचार मनात येतो  व आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेला व कौशल्याला नमन करावेसे वाटते. 

या घाटाने सप्तश्रृंगगडाची यात्रा करायची असल्यास नाशिकहून सप्तश्रृंगी गड बस पकडावी. वणी पार केल्यावर जेव्हां गड उजवीकडे असतो तेव्हा चंडिकापूर गाव लागते तिथे उतरावे. गावातून दोन किलोमीटर अंतरावर रडतोंडी घाटाचा पायथा लागतो.  मग घाटाने सप्तश्रृंगगडावर एक-दिड तासात पोहचता येते.

- amolbendkule

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....