Tuesday, 30 March 2021

तुकाराम बीज

तुकाराम बीज

आज ३० मार्च, तिथी फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज आहे. या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड संतकवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. 

तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. संत तुकाराम एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले.

भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता.


संत तुकारामांची अभंग

चित्ता मिळे त्याचा संग रूचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||

ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी ||२||

हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये ||३||

तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४||

तुकाराम महाराज सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते.त्यामुळं ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत.प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे.ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं,त्याचीच संगत आपल्याला आवडते,आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसाचीच संगत करावी.जो स्वत:च्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो,आपलं मन अस्वस्थ करून टाकतो,त्याला दूर ठेवणं हेच चांगलं आहे.परंपरा अशीच चालत आली आहे.ज्याची संगत भलती-सलती असेल,त्याच्या सहवासाचा त्याग करावा,हीच खरी नीती होय.मग अशी व्यक्ती पिता असो,पुत्र असो,बंधू असो,की आणखी कोणी असो.ज्याचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही,त्याचा सहवास करू नये.आपण सत्य वचनाचं,नातिकतेचं,माणूसकीचं पालन करावं,त्यापेक्षा वेगळं वागू नये.याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल,त्यांच्यापासून दूर रहावं.

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ।।१।।

मानदंभासाठी छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ।।२।।

तुका म्हणें हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें


काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ।।१।।

उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ।।धृ।।

घेसी बुंथी पाणवथां । उगा च हालविसी माथा ।।२।।

लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें मोकळी ।।३।।

हालवित बैस माळा । विषयजप वेळोवेळां ।।४।।

तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ।।५।।


चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ।।१।।

तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ।।धृ।।

रिद्धिसिद्धि कांही दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ।।२।।

तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें

                        

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना कोटी कोटी प्रणाम.



डॅा.भाऊ बोत्रेची गोष्ट

 डॅा.भाऊ बोत्रेची गोष्ट





काल परवाची गोष्ट. शिपाई तास संपता संपता वर्गात आला. म्हणाला, ' सर त्या मुलाला पाय-या चढता येत नाही. तरी त्याला पहिल्या तासाला वर्गात बसायचं आहे. तुम्हीच त्याला समजावून सांगा. ' मी त्याला भेटलो. तो म्हणाला, ' मला पहिल्या तासाला बसायचं आहे .'

' अरे पण तुला दुस-या मजल्यावर यायला वेळ लागेल. तुला त्यासाठी लवकर यावे लागेल. ' मी
' सर , मी घरातून तासभर लवकर निघेल. तासाला वेळेवर येईन .' तो
मी त्याच्या जिद्दीला सलाम केला. मला आमच्या सैय्यद प्रिप्रीच्या शाळेतील संतोष आठवला. तो न चुकता शाळेत यायचा. त्यासाठी एका लाकडाच्या फळीला त्याने चाकं बसवून त्याची गाडी केलेली होती. एका हाताने तो ती पुढे ढकलत होता. ऊन ,वारा, पाऊस, गारा त्याच्या शाळेत खंड पडत नसे. पाय पोलिओने गेलेल्या संतोषने मनात घर केले होते. पुढे नाशिकमधील समाजसेवेच्या वेडाने झपाटलेल्या रमेश जाधव यांनी गणेश उत्सवाच्या काळात दानपेटी ठेऊन दान जमा केले. त्यातून संतोषसाठी सायकल घेतली. संतोष तीनचाकी सायकलवर शाळेत येऊ लागला. संतोष फार गोड मुलगा होता.

मी पुणे विद्यापीठात होस्टेलला राहत होतो. संशोधन चालू होते. तिथे भाऊ बोत्रे नावाचा मित्र भेटला. भाऊकडे तीनचाकी सायकल होती आणि स्कुटरही. गणेशोत्सवात त्याच्या स्कुटरवर त्याने मला पुण्यातले गणपती दाखवले. त्याला पुण्याचे गल्लीबोळ माहित होते.

भाऊची गोष्ट मजेशीर होती. मित्र त्याला पाठकुळीवर बसवून शाळेत घेऊन जात. भाऊला शाळा आवडायची. घरात बसून तो अभ्यासही करायचा. घरच्या मंडळींनी मोठा झाल्यावर त्याने दिव्यांगासारखा एखादा टेलीफोन बुथ चालवावा एवढीच अपेक्षा होती .घडले ते उलटे. तो एस.एस.सी. झाला. चांगले गुण मिळाले. असा मुलगा कला, वाणिज्य शाखेत शाखेत शिकेल अशी आपली सामान्य अपेक्षा. तो वाडीया काॅलेजला गेला. म्हणाला, ' मला विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. ' प्राध्यापकांनी त्याला समजावले. विज्ञान शाखेत प्रयोगशाळेत उभे राहून प्रात्यक्षिके करावी लागतात. ते तुला जमणार नाही , वगैरे .' भाऊ म्हणाला, ' सर , मी स्टुलवर बसून प्रात्यक्षिके करीन.' प्राध्यापकांचा नाईलाज झाला. भाऊ काॅलेजमध्ये नियमित येत होता. अभ्यास करीत होता. तो बारावीची परीक्षा पास झाला. असा मुलगा बी. एस्सी झाला नसता तर नवल. भाऊ बोत्रे बी.एस्सी झाला आणि एम.एस्सीच्या तयारीला लागला. त्याला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. वडील रिक्षा चालवायचे. कसे जमणार ? पुण्यात काही माणसं शिक्षणासाठी मदत करीत असतात, हे भाऊला माहीत होते. त्याचे हात आता पाय झाले होते. भाऊ हाताचा वापर करुन चालत असे. एकदा एका कार्यालयात गेल्यावर जनावर आले असल्यासारखं आधिका-याला जानवलं. आधिका-याची घाबरगुंडी उडाली होती. रस्त्याने हाताने चालताना त्याला जनावराची भिती असते. कुत्रे त्याच्यावर हल्ला करण्याची भिती असते. भाऊ संबधित दानशूराकडे गेल्यावर ते म्हणाले, ' किती मदत हवी ? ' भाऊने त्यांच्या टेबलवर विद्यापीठाचे प्रवेशाचे चलन ठेवले. त्यावरची रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर भरण्याची विनंती केली. भाऊचा एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिकला प्रवेश झाला. आता भाऊला शिष्यवृत्ती मिळू लागली. धिद्यापीठाचे वसतिगृह मिळाले. भाऊची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल झाली. भाऊ कपडे धुणं , इस्त्री करणे आणि विभागात जाऊन लेक्चर, प्रॅक्टीकल करू लागला. दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीपणे पूर्ण केला.

भाऊ बोत्रेची गोष्ट इथेच संपत नाही. आता भाऊला Ph.D. करायचे वेध लागले. त्याने त्यासाठी मार्गदर्शकाची निवड केली. संशोधनाच्या वाटा धुंडाळल्या. भाऊ दिवसभर प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिके करुन पाहू लागला. विज्ञानात प्रयोगाला , त्यातून येणा-या निष्कर्षाला महत्व असते. त्यासाठी तो तज्ञांना भेटू लागला. एकदा त्याच्या प्रयोगशाळेत रघुनाथ माशेलकर येऊन काम पाहून गेले होते. एखादा पदार्थ किती जुना आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, या विषयावर भाऊचे काम चालू होते. संशोधकाला संशोधन चालू असताना आपले शोधनिबंध सादर व प्रकाशित करावे लागतात. भाऊने असाच एक शोध निबंध अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाला पाठवला आणि चमत्कार झाला. बोस्टन विद्यापीठाने तो स्वीकारला आणि सादर करण्यासाठी थेट बोस्टनला बोलावले. परदेश प्रवासाची तयारी सुरू झाली. भाऊने पासपोर्ट काढला. व्हिसा मिळवला. त्यासाठी नो एजंट. भाऊ प्रत्येक ठिकाणी स्वतः गेला. अगदी विमान प्रवासाची तिकीटे स्वतः काढली. मार्गदर्शक म्हणाल्या, ' चाललाच आहेस तर तुझ्या विषयाच्या अनुषंगाने काही नवीन स्वरूपाचे संशोधन चालू आहे का ? याचा शोध घे . ' सगळी नाटकं करता येतात पण पैश्याचे? भाऊ बोत्रे तीन दिवस तिथे राहणार होता. त्यासाठी त्याला ट्रॅव्हल ग्रॅंट मिळाली होती. भाऊने घरी त्याच्या परदेश प्रवासाची आजिबात कल्पना दिली नव्हती. दिली असती तर ह्या लंगड्या पांगळयाची काळजी वाटून आई वडीलांनी खोडा घातला असता ना ! भाऊने कुलगुरू नरेंद्र जाधवांना भेटायचा प्रयत्न केला. पण कुलगुरू मिटींगमध्ये असल्याने त्याच्या चार चकरा फुकट गेल्या. टेक ऑफचा दिवस जवळ आला. आवरा आवर सुरू झाली. मी भाऊला नाशिकला बोलावले. शुभेच्छांचा घरगुती समारंभ होता. पत्रकार विश्वास देवकर आले. " हातावर चालणारा भाऊ निघाला बोस्टनला " , अशी मुखपृष्ठ कथा सकाळ पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आणि भाऊला काॅल, मेल सुरू झाले. अमेरिकेतली मराठी माणसं म्हणाली, ' हाॅटेलात राहू नको . इथली हाॅटेल तुला परवडणार नाही. आमच्याकडे रहायला ये.' कुलगुरू नरेंद्र जाधवांनी डाॅ विद्यासागर यांचेवर त्याला काय हवे ते पहायची जबाबदारी सोपविली. कुलगुरू ऑफीसातून भाऊचा शोध सुरू झाला. आईवडिलांना पेपरमधून पोराची किर्ती ऐकायला मिळाली. बाबा कल्याणी यांनी भाऊच्या हातात खर्चासाठी पैसे दिले. भाऊला विमानतळावर पोहचवायला काही नातेवाईक हजर होते. मी टेक ऑफच्या दिवशी विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी गेलो होतो.

भाऊची गोष्ट इथे अधिक मजेदार वळण घेते. भाऊ बोस्टन विद्यापीठात संशोधन मांडतो पण अमेरिकेतल्या विविध विद्यापीठात जातो . संशोधकांना भेटतो. यासाठी अमेरिकतली मराठी माणसं त्याच्या पाठीशी उभी रहातात. तीन दिवसासाठी गेलेला भाऊ एकवीस दिवस अमेरिकेत फिरतो आणि भारतात परततो. असा माणूस Ph. D पदवी मिळवतो हे आता फार नवलाचे राहत नाही.

शिक्षण कधी थांबते का ? थांबला तो संपला . भाऊला एकदा पुणे विद्यापिठाने संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी जपानला पाठवले होते. त्याच दरम्यान त्याची दिल्लीत आय आय टी साठी मुलाखत होती. मुलाखतीची तयारी चालू होती. तरी भाऊ जपानच्या टीम मध्ये दाखल झाला. तिथून मुंबई गाठली. दिल्लीचे तिकीट काढलेले होते. तसाच दिल्लीत पोहचला. फ्रेश होऊन मुलाखतीसाठी हजर झाला. तज्ञांना जेंव्हा भाऊची पुणे जपान मुंबई दिल्ली प्रवासाची हकीगत कळली तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते भाऊला म्हणाले, ' बोल कधीपासून नोकरीत रुजू होतो. हे घे तुझे नियुक्ती आणि निवडीचे पत्र. ' भाऊ म्हणाला, ' मला वेळ द्या. घरी जातो. आईवडिलांना भेटतो. चार दिवस आराम करतो आणि नोकरीला सुरुवात करतो .'

हाताचा वापर पाय म्हणून करणारा डाॅ भाऊ बोत्रे आज राजस्थानच्या बीट्स पिलानी मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहे. त्याला तेथून भारतभर फिरावे लागते. जगभरच्या संशोधनावर लक्ष ठेवावे लागते आणि दिव्यांगासाठी काहीबाही करावे लागते. म्हणून भाऊची ही कथा सफळ संपूर्ण नाही. तो आणखी काही करण्याची तयारी करतो आहे. त्याचा संसारही फुलला आहे. त्यावरची कळी खुलू लागली आहे आणि भाऊ प्रयोगशाळेत व्यस्त आहे.
डाॅ. शंकर बो-हाडे
९२२६५७३७९१
shankarborhade@gmail.com



Thursday, 25 March 2021

स्वातंत्र्याचे महत्त्व

स्वातंत्र्य म्हणजे काय?

कर्नाटकातील कोंबरु अभयारण्यातल्या रेस्टहाऊसमध्ये घडलेली गेल्या आठवड्यातील घटना आहे. 

एक बिबट्या शिकारीसाठी एका कुत्र्याचा पाठलाग करत होता. आपला जीव वाचवण्यासाठी तो कुत्रा या रेस्टहाऊसच्या टॉयलेटला असलेल्या एका खिडकीतून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला व त्याच्या मागोमाग बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्‍यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिंमत झाली नाही.

पण यानंतर जे घडले, ते अद्भूत होते. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्यावर हल्ला केला नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले भक्ष्य बनवु शकला असता. पण तो बिबट्या त्या टॉयलेटमध्ये एका कोप-यात शांत बसला होता. ते दोन्ही प्राणी एकाच खोलीत तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.
           
वनविभागाने गुंगीच्या शॉटगनने बिबट्याला जेरबंद केला. आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही?
        
तर वन्यजीवअभ्यासकांनी असं उत्तर दिलं की वन्यजीव आपल्या स्वातंत्र्याविषयी अत्यंत संवेदनशील असतात. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची जाणीव होताच ते अत्यंत खोल दुःखात जाऊ शकतात, ते इतकं की त्यांची भूकही ते विसरू शकतात. तिथे पोट भागवण्याची नैसर्गिक प्रेरणा मावळू लागते, इतकं मोठं पारतंत्र्याच दुःख आहे.

Monday, 22 March 2021

श्री त्र्यंबकेश्वर प्राचीन सुवर्ण मुकूट

 श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग पंचमुखी सुवर्ण मुखवटा व प्राचीन रत्नजडीत सुवर्ण मुकूट. या सुवर्ण मुकूटामध्येच प्रसिद्ध 'नस्सक' (nassak diamond) हिरा जमवलेला होता असे मानले जाते.





जागतिक जल दिन


 जागतिक जल दिन

आज ‘जागतिक जल दिन' (World Water Day) आहे . पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कृती यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.
पाण्याच्या अनिर्बंध वापराबाबत जनजागृती व्हावी, समाजात पाणी या मर्यादित संसाधनाच्या व्यापकतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी, पाणीबचतीचे महत्व आणि उपाय सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावेत या उद्देशाने दि. २२ मार्च रोजी जगभरात १९९३ पासून जलदिन साजरा करण्यात येत आहे. जल दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाकडून दरवर्षी एक केंद्रविषय (theme)निश्चित करण्यात येतो. २०२१ या वर्षीच्या जलदिनाचा केंद्रविषय 'पाण्याचे मोल' (Valuing Water) असा आहे. पाण्याची किंमत मोजून पाणी वापरणे हाच आपला अधिकार नाही, तर आपण पाण्याचे मोल आणि महत्व जाणून घ्यावे, निसर्गाने भरभरून मोफत दिलेली ही अनमोल संपदा आपण जपून वापरावी व यावर आपल्याप्रमाणेच इतरांचा देखील समसमान हक्क आहे, त्यांच्या हक्कांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, हा संदेश यातून आपण सर्वांनी घ्यायला हवा.
असं म्हटलं जातं की पुढील महायुद्ध हे कदाचित पाण्यासाठी होईल! आजही कित्येक ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी लोकांना मिळत नाही. कितीतरी महिला आजही पाण्यासाठी ५-६ किलोमीटर पायपीट करतात. अशा परिस्थितीत अतिशय साध्या साध्या गोष्टी अवलंबून आपण पाण्याची बचत नक्की करू शकतो. वाहने धुताना व स्वच्छतेची इतर कामे करताना आपण पाण्याच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या अवतीभवती पाण्याची गळती किंवा चोरी होत असल्यास त्यावर त्वरित कार्यवाही कशी होईल याकडे आपले लक्ष असायला हवे.
केंद्र सरकारमार्फत पाणी बचतीचे नवनवीन तंत्रज्ञान, त्याचे फायदे, उपकरणांची कार्यक्षमता, त्यांच्या मर्यादा, अयोग्य उपकरणांची विल्हेवाट, मलनिःसारण योजना यासंबंधीत माहिती देशभर प्रसारित केली जाते. आपण प्रत्येकानेही पाण्याचे महत्व जाणून पाणी बचतीसाठी आपापला वाटा उचलायला हवा.

Sunday, 21 March 2021

जागतिक कविता दिवस : हाल सातवाहनाची 'गाथा सप्तशती'

 आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस !


सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

जगातील काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्यासाठी, काव्याचे वाचन, लेखन व प्रकाशनासाठी २१ मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो. 

जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस. २१ मार्च हा दिवस युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे जगभर काव्य दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस. १९९९ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. 

कविता सुचते कशी हा बहुतेकांना पडणारा प्रश्न. सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे ह्यांनी कविता स्फुरते कशी हेही कवितेतूनच मांडले आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. त्या आपल्या कवितेत त्या म्हणतात -

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी

नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी

त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी


आज जागतिक काव्य दिनानिमित्ताने महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ जो ‘गाथा सत्तसई’ म्हणजेच ‘गाथा सप्तशती’ याचे स्मरण करुयात व या अभिजात काव्यसंग्रहाबद्दल जाणून घेऊयात.

‘गाथा सप्तशती’ म्हणजेच ‘गाथा सत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ!

माहाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल (इ. स. पहिले वा दुसरे शतक) याने केलेले एक संकलन. गाथा सप्तशती  हे याचे संस्कृत रूप. गाहा कोस  हे त्याचे मूळ नाव. हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा १७वा राजा होता[१]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. 

राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्लेख गाहा सत्तसईमध्ये त्याने केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर  ह्या थोर जर्मन पंडिताने इ. स. १८८१ मध्ये करून दिली. त्यानेच ह्या गाहा सत्तसईची पहिली संपादित प्रत तयार केली. अनेक विद्वानांच्या मते गाहा सत्तसई  हा प्रथम गाथा कोश असावा आणि पुढे नवव्या शतकापर्यंत त्या कोशामध्ये भर पडत जाऊन सध्या अस्तित्वात असणारा गाहा सत्तसई हा ग्रंथ तयार झाला असावा.


‘गाणे’ ह्या अर्थी असणाऱ्या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील आर्या ह्या वृत्तासारखेच आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला गाथा सप्तशती  हे नाव देण्यात आले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्तशती  म्हणजे  सातशे  श्लोक. म्हणून ह्याला सप्तशती  असेही  म्हणतात.

तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेता येतो. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, तिचा उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता या गोष्टी त्या काव्यग्रंथामधून सिद्ध होतात. 

‘गाथासप्तशती’चे स्वरूपही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘हाल सातवाहन’ या राजाने त्याच्या राज्यातील कवींना आवाहन करून त्यांच्याकडून काव्य मागवून ते संकलित केले. त्याला अनेक कवींनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातील दर्जेदार काव्य निवडून, त्यातील सातशे गाथा त्या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘हाल सातवाहन’ स्वतः कवी होता. त्याची ती कृती महाराष्ट्री भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी करणारी ठरली. त्याने द्विपदी स्वरूपातील ‘गेय’ अशा सातशे गाथा संपादित करून तत्कालीन महाराष्ट्राचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि मानवी मनातील भावभावनांचा आविष्कार असणारे आद्यकाव्य संकलित केले असे म्हणता येते. त्याने मुद्रणकला अस्तित्वात नसताना केलेले हस्तलिखित स्वरूपातील ते प्रकाशन हा प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ ठरतो! तसाच, तो पहिलाच संपादित ग्रंथ असल्याने ‘हाल’ राजास महाराष्ट्रातील पहिला संपादक असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ते काव्य गोदावरीच्या तीरावर घडले. त्यामुळे ‘गोदावरी’ नदीला संस्कृतिवाहिनीचेही महात्म्य लाभते. 


‘गाथासप्तशती’ या काव्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण आले असले तरी ते वर्णन ग्राम्यता टाळून केले गेले. अभिजातता आणि सौंदर्य यांचे सुरम्य साहचर्य त्या काव्यात  दिसते. त्यातील ‘शृंगार’ आणि ‘कामजीवन’ यांचे चित्रणही सूचकतेने, संयतपणे, कलात्मक वृत्तीने अभिव्यक्त झाले. त्यात अश्लीलता, बीभत्सता आढळत नाही. निसर्गातील विविध प्रतिमा-प्रतीकांचा वापर आणि विशेष म्हणजे तो शृंगार दैनंदिन व्यवहारातील अनेक घटना- प्रसंगाच्या माध्यमातून आविष्कृत झाला. त्यातील प्रणयप्रसंग उत्कट आणि कल्पनारम्य आहेत. गाथेत स्त्रियांचे चित्रण नवयौवना, नवविवाहिता, गृहिणी, प्रौढा, कुमारिका अशा विविध वयोगटांतील आले आहे. मानवी मनातील प्रेमभावना आहे. त्यातील अलवारता, तरलता, उत्कटता, विरह या संवेदना हृदयस्पर्शी व मनोहारी आहेत. हे रसरशीत सौंदर्य कोणाही आस्वादकाला प्रभावित करेल असेच आहे. 

यातील काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा भौगोलिक परिसर चित्रित झाला आहे. गाथेला मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती असा, मराठी मातीचा अस्सल गंध आहे. त्यातील कितीतरी शब्द गोदावरीच्या तीरावर बोलीभाषेत प्रचलित आहेत. तेथे ‘महुमास’ हा शब्द चैत्रमासासाठी उपयोजला गेला तोच शब्द ‘मधुमास’ म्हणून वर्तमान काव्यातून झंकारत आहे. शेती व्यवसाय, ग्रामीण भागातील संथ आणि शांत जीवन, गावगाड्यातील ग्रामणी (गावाचा प्रमुख), त्याचे वर्चस्व, तत्कालीन ग्रामव्यवस्था तेथे दिसते. राजकीय संघर्ष अथवा अराजक याबाबतचे चित्रण त्यात आले नाही. समृद्ध ग्रामजीवन त्यात चित्रित झाले. साळी, तूर, कापूस, ऊस, ताग, हळद इत्यादी पिकांचे तर बोर, आंबे, जांभूळ, काकडी या फळांचे उल्लेख तेथे येतात. झाडे, पशू, पक्षी; तसेच गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा, गिरणा इत्यादी नद्यांचे उल्लेख येतात. 

सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील बारीक सारीक घटनांचे चित्रण ह्या गाथांमध्ये आढळते. त्यामुळे वाचकाला तत्कालीन समाजाची उत्तम ओळख होते. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्याही  हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. गोदावरीचे अनेक उल्लेख गाथांमध्ये आढळतात. वड, पळस, बेल, आंबा, जांभूळ इ. वृक्षांचे; तर कमळ, मालती, माधवी, केतकी वेलींचे उल्लेख गाथांमध्ये दिसतात. रानावनात फिरणाऱ्या, शेती करणाऱ्या लोकांनी ह्या गाथा रचल्या असल्यामुळे झाडे, वेली, फळे, फुले यांचे उल्लेख स्वाभाविकपणे आले आहेत.

तत्कालीन देव-देवता, पौराणिक कल्पना, सामाजिक चालीरीतीं यांचे वर्णन गाथांमध्ये आढळते. गाहा सत्तसईच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी शंकराला नमन केले आहे. पती-पत्नीच्या सुखी संसारासंदर्भातील वर्णनामध्ये अग्नीचे उल्लेख बऱ्याचदा येतात (रंधणकम्मणिउणिए ! मा जूरसु, रत्तपाडलसुअंधं ।मुहमारुअं पिअंतो धूमाइ सिही, णपज्जलइ ।। गाथा क्र. १४). याशिवाय कृष्णाच्या रासलीला, समुद्र-मंथन, सतीची प्रथा यांबद्दलची वर्णनेही आढळतात.  शुभाशुभ शकुनांवर लोकांचा विश्वास होता. मंगलकलश ठेवणे, डावा डोळा लवणे इ. गोष्टी लोक मानत असत. तत्कालीन समाज अल्पसंतुष्ट, आनंदी, समाधानी, साधाभोळा होता. त्यामुळे या गाथा म्हणजे ह्या ग्रामीण जीवनाची जणू भावगीतेच होता.

प्राकृत भाषेचे सौंदर्य-माधुर्य, उत्तम निसर्गचित्रण, लोकव्यवहार, नीतीनियम तसेच प्रणयाचे सात्विक पण बहुरंगी स्वरूप मांडण्याच्या उद्देशाने हाल राजाने या गाथांची निवड केली असावी. अनेक गाथा शृंगारप्रधान असल्या तरी हा केवळ शृंगारिक गाथांचा संग्रह नाही. वास्तव जीवनानुभव मानवी भाव-भावनांचे विविध कंगोरे दाखविणाऱ्या अशा या गाथा आहेत. नैसर्गिक सहजता व प्रासादिक रचनांमुळे या गाथा आपले चित्त वेधून घेतात. एकूणच, गाथा माणूस आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण कवेत घेत सिद्ध झाली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र यांची दोन सहस्त्रकांतील वाटचाल कशी झाली? त्या दृष्टीने ‘गाथासप्तशती’ हा काव्यकोश म्हणजे महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित आहे.







Saturday, 20 March 2021

वसंत कानेटकर जन्मशताब्दी

आज २० मार्च...
आज मराठीतील प्रतिभावंत व चतुरस्त्र नाटककार आणि साहित्यिक #वसंत_कानेटकर यांचा जन्मदिन. आजपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.

वसंत कानेटकर यांचा जन्म २० मार्च १९२० साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या शहरात झाला. त्यांचे वडील शंकर केशव कानेटकर म्हणजे कवि गिरीश हे सुप्रसिद्ध रविकिरण मंडळातील कवि होते. त्यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले.

इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी (एचपीटी) महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. विषयाचे सखोल ज्ञान, शिकवण्याची उत्कृष्ट हातोटी त्यामुळे विद्यार्थीप्रिय अशा कानेटकर सरांच्या वर्गात ज्यांचा तो विषय नाही असे विद्यार्थी सुद्धा त्यांचे लेक्चर ऐकायला त्या वर्गात बसत असत. अशा आठवणी आजही सरांबद्दल सांगितल्या जातात. २५ वर्षे अध्यापन केल्यानंतर नाट्यलेखनासाठी सरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.

प्रेक्षकांच्या मनोविश्वाचा ठाव घेणारी नाटके त्यांनी लिहिली. वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. विविध सामाजिक विषय आपल्या नाट्यकृतींतून त्यांनी परिणामकारक रीत्या हाताळले. मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, मत्स्यगंधा, मीरा-मधुरा आदी दर्जेदार नाटकांद्वारे पुनरूज्जीवन केले. मेलोड्रामाटीक, सुखात्मिका, ऐतिहासिक, पौराणिक, प्रायोगिक अशा सर्व प्रकारची नाटके कानेटकरानी लिहीली. त्यांनी चाळीस नाटके आणि अकरा विनोदी एकांकिका लिहून मराठी रंगभूमी गाजवली होती. तसेच त्यांनी पंख , घर , तेथे चल राणी , आणि पोरका ह्या कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या नाटकांनी इतिहासच रचला नाही तर कलावंतांना नावलौकिकही मिळवून दिला.

त्यांच्या अश्रूंची झाली फुले गाजलेल्या नाटकावरून हिंदीमध्ये ' आसू बन गये फूल ' हा चित्र तयार झाला. त्यात अशोककुमार, निरुपा रॉय , प्राण आणि देब मुखर्जी या नामवंत कलाकारांनी काम केले होते. त्या चित्रपटाच्या कथेसाठी वसंत कानेटकर याना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते. त्यांची जवळजवळ सगळीच नाटके गाजली. त्यांच्या ओघवत्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली होती.

१९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. भारत सरकारने १९९२ मध्ये पद्मश्री ने त्यांना सन्मानित केले होते.

अशा सिद्धहस्त नाटककाराचे ३१ जानेवारी २००० रोजी नाशिक येथे निधन झाले.




जागतिक चिमणी दिवस

आज २० मार्च* 

आज हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो.

या चिमण्यांनो, 
परत फिरा रे....
घराकडे आपुल्या..... 
हे ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आजच्या दिवसाला लागू होते. हल्ली या चिमण्यांनो असेच म्हणावे लागते. 
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी , बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात.
कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सामान्यत: आढळणारी चिमणी म्हणजेच ‘इंडियन कॉमन स्प्रॅरो’चेही दर्शन दुर्मीळ होत असताना पर्यावरण संवर्धनामुळे निमशहरी भागातील काही परिसरात विविध प्रकारच्या चिमण्या सकाळ-सायंकाळ गुंजारव करताना आढळतात. यासाठी आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची. 
चिमण्यांनाही द्या जागा... 
- फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते. 
- घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील. 
- शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
- घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा.
- चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात.
- घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल.


Thursday, 18 March 2021

अंजनेरीची प्राचीन मंदिरे

 अंजनेरीची प्राचीन मंदिरे


नाशिकपासून अवघे वीस-बावीस किलोमीटर अंतरावरील अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमानाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र हेच अंजनेरी गाव जवळपास अकराव्या-बाराव्या शतकातील जुन्या प्राचीन भग्न मंदिरांसाठी सुद्धा ओळखले जाते. अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बारा मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत. अंजनेरी प्राचीन काळातील एक मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते, हे या मंदिरांवरून स्पष्ट होते. अंजनेरी प्रमुख व्यापारी पेठ असल्याने येथे येणाऱ्या राजे, महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्यामुळे या परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले असावे असा अंदाज आहे. या मंदिरांच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव दिसतो. इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत.

 यादवांच्या राज्याची सुरुवातीची राजधानी नाशिक जवळील सेऊणनगर (सध्याचे सिन्नर) येथे होती. यादवांनी विशेषतः सेऊणचंद्र तिसरा यांने हिंदू धर्माबरोबरच जैन धर्माला आश्रय दिलेला येथील शिलालेख व काही ताम्रपटांमधून आपल्याला समजतो. त्याची साक्ष अंजनेरी येथील दगडी प्राकारातील जैन मंदिरातील एका भिंतीवर सेऊणचंद्र यादव (तृतीय) ह्याचा स्पष्ट असा देवनागरी भाषेतील शिलालेखात आढळून येते.

या प्राकारातील मंदिरे तुलनेने लहान आकाराची असून बहुतांशी मंदिरांवर नागर पद्धतीची उंच शंखू शिखरे आढळतात. प्राकाराला लागून अनेक खोल्यांची शिखर विरहित जैन मठाची इमारत आहे. आज महानुभाव ठाणे असलेल्या एका मंदिरात ललाटबिंबावर (दारावरची मधली शिल्पचौकट) ध्यानस्थ तीर्थांकर दिसतात तसेच सर्पफणा असलेले पार्श्वनाथ व सुपार्श्वनाथ कोरलेले आहेत. याचे छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे व गाभाऱ्यात जैन तीर्थंकराचे दगडी कोरीव आसन रिकामे आहे. 

या मंदिराच्या आवारात अनेक हिंदू व जैन मूर्ती, हत्ती, गणपती, नाग शिळा, वीरगळी विखुरलेल्या आहेत तसेच जैन मुनींच्या यम-सल्लेखना (religious suicide) दर्शवणाऱ्या स्मारकशिळा आहेत. जैनधर्मीयांमध्ये संथारा किंवा यम-संल्लेखना व्रत (प्राणातिंक उपोषण) अंगिकारुन  प्राणत्याग करणा-या व्यक्तीची स्मारकशिळा 'चौमुखी' नावाने ओळखले जाते. एका अज्ञात जैन मुनीच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे. या चौमुखी वर दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन मुनी अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवले आहेत. 

हिंदू मंदिरांमध्ये उंच जागेवर असलेले विष्णू मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. अनेक लघु शिखरांच्या रांगांची चवड रचलेले भूमीज पद्धतीचे, त्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचलित असलेले शिखर आपल्याला इथे दिसते. मंदिराची अवस्था आज वाईट असली तरी बाह्य भिंतीवरील देवकोष्टांमधील विष्णूच्या वराह अवतार, त्रिविक्रम विदर्ण-नरसिंह व योगेश्वर विष्णूमूर्ती महत्वपूर्ण आहेत. गर्भगृहात नंतरची नरसिंह हिरण्यकक्षिपूवधमूर्ती आहे व पीठावर विष्णूचे वाहन गरुड स्पष्ट दिसते. 

ही मंदिरे पाहिल्यानंतर लक्षात येणारे वैशिष्ट्य म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते, असे दिसते. मागील अंजनेरी किल्ला व ब्रह्मगिरीच्या शिखरांच्या पार्श्वभूमीवर ही पुरातन मंदिरे विलक्षण दिसतात. एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेले अंजनेरी गाव व इथली बाजारपेठ देशोदेशींच्या व्यापारी व नागरिकांनी गजबजून गेले होते. हिचे वैभव जगभर पसरले होते. अंजनेरीच्या अवतीभवती  असलेल्या या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा ‘त्या’ वैभवशाली दिवसांची आठवण करून देतात.

या पर्वताच्या कुशीत एकेकाळी वैभवाने मिरवलेली, सजलेली, पुजलेली व आता भग्नावशेष बनून शिल्लक राहिलेली ही प्राचीन मंदिरे अनास्था व दुर्लक्षामुळे अखेरचा श्वास घेत आहेत. या मंदिरांची पुनर्बांधणी अत्यंत आवश्यक आहे. ही मंदिरे पुन्हा उभी राहिली तर अंजनेरी परिसराचे व पर्यायाने नाशिकचे महत्व पर्यटनाच्या नकाशावर आधिकच वाढेल यात शंका नाही.


























































वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....