स्वच्छतेचं माहेरघर आणि महिला सबलीकरणाचा आदर्श निर्माण करणारे ' गुलाबी ' गाव - #भिंतघर, सुरगाणा ( जि. नाशिक )
महाराष्ट्राचे #राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच भेट दिल्यामुळे सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महिला #सक्षमीकरणाचा अनोखा संदेश देणाऱ्या या गावाचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे.
राज्यातील पहिलं #गुलाबी गाव एवढीच या गावाची ओळख नाही तर, हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने वेढलेलं, महिला सबलीकरण व शिक्षणाचा संदेश देणारं, संपूर्ण गावाला एकच गुलाबी रंग दिलेलं, गोसंवर्धन व बचत गटाच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषध निर्मिती व इतर सह उत्पादने घेणारी जनकल्याण गोशाळा, पक्षी बचाव, वृक्षलागवड व संवर्धन इत्यादी वैविध्यपूर्ण उपक्रम हिसुद्धा या गावाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
भिंतघर हे खरं तर गाव नाही, तो आहे एक छोटासा #आदिवासी #पाडा. गावात अवघी ९० घरे आहेत व लोकसंख्या साधारणपणे ९०० च्या जवळपास आहे. मात्र या आदिवासी पाड्याने ग्रामविकासाचे एक नवीन मॉडेल उभे केले आहे. #जितेंद्र #गवळी या एका प्राथमिक शिक्षकाने मांडलेल्या संकल्पनेने, पुढाकाराने व त्याला गावक-यांनी दिलेल्या प्रतिसाद व सहकार्याने भिंतघरचा हा कायापालट घडून आला आहे. ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण हा विषय नेहमीच गौण ठरतो. या स्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंतघरचे शिक्षक जितेंद्र गवळी यांनी पुढाकार घेत पालकांमध्ये शिक्षणाविषयी प्रबोधन केले. गवळी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शाळेत शिकणा-या मुलीच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. गुलाबी रंग हा महिलांच्या सबलीकरणाचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे या मुलींना शाळेत नियमित पाठवावे यासाठी गवळी यांनी प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्याचे ठरवले. त्यासाठी सरकारी निधीचा वापर न करता तत्कालीन सरपंच रघुनाथ पवार यांच्या पुढाकाराने व गावातील लोकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून गुलाबी गाव करण्याचा संकल्प करत त्याला मूर्तरूप दिले. गावकरी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ म्हणून भिंतघर प्रकाशात आले.
गावात प्रवेश करताच सर्व घरे गुलाबी रंगांची दिसतात. महिला सबलीकरणाचं प्रतीक म्हणून घरांना गुलाबी रंग देण्यात आलाय. प्रत्येक घर हे आकर्षक आणि टुमदार दिसतं. घरासमोर लावलेली झाड ही आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतात. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक घरावर सुविचार बघायला मिळतात. घरातील कर्त्या पुरुषासोबत साथ देणाऱ्या महिला भगिनींचं नाव हे प्रत्येक घरावर दिसतात. गावातील स्वच्छता तर अगदी डोळ्यात भरणारी आहे. गावाचा नावलौकिक कायम राहावा, यासाठी गावात सकाळी सर्वत्र स्वच्छता करण्यात येते. गावातील प्रत्येक चौकात अगदी दररोज सडा-रांगोळी करत परिसर सुशोभित करण्यात येतो. गाव परिसरात ५०० हून अधिक झाडे लावत त्या झाडांची नावांचे फलक लावण्यात आले आहे. कचरा संकलित करत त्यापासून खत तयार करण्यात येते. हे खत सेंद्रीय शेतीसाठी वापरण्यात येते. शाळाही ‘संगणकीकृत’ झाली. गावाचे हे बदललेले रूप पाहून मुलेही खूश असून शाळेत नियमित येत आहेत. तसेच गावाने लोकवर्गणीतून गोशाळा उभारली आहे. त्यातील शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून औषधांची निर्मितीही केली जात आहे. ही भव्य दिव्य गोशाळा ही इथे येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे.
इथली अंगणवाडी प्राथमिक शाळाही डिजीटल आहे. अल्पावधीत गाव पर्यटन स्थळ झाल्याने शासनाने ६० लाख रुपये खर्च करुन विश्रामगृह बांधलं आहे. गावात आदिवासी सांस्कृतिक भवन ही उभं राहिलय ज्याचं नुकतंच राज्यपालांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.
आपणही एकवेळ अवश्य भेट द्यावं , असं हे गाव आहे.
No comments:
Post a Comment