नाशिकची ग्रामदेवता व चिबुकस्थान शक्तीपीठ : माता भद्रकाली
भद्रं करोति इति भद्रकाली | भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी|
याचा अर्थ जी नेहमीच कल्याण करते ती भद्रकाली. पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांच्या राजवटीत देवदेवतांच्या मुर्तींची विटंबना होत होती. त्यावेळी मुर्तीची विटंबना मोडतोड किंवा ती भंग होऊ नये म्हणून गावांतील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन त्यावेळचे सरदार श्री.पटवर्धन यांना मंदिरासाठी जागा द्यावी म्हणून विनंती केली. सरदारांनी तिवंधा चौकाजवळील आपली जागा मंदिरासाठी दिली व सदर जागेवर श्री.पटवर्धन सरदार व श्री.दीक्षित यांनी भद्रकालीचे मंदिर बांधले. सदर मंदिराचे बांधकाम सन १७९० मध्ये पूर्ण झाले. भद्रकाली देवीचे मंदिर मोठे प्रशस्त असून वरती दोन मजले बांधलेले आहेत पण मंदिरावर कळस नाही. कारण त्यावेळी मंदिरे व देवतांची विटंबना इस्लामी राजवटीत होत होत्या. म्हणूनच मंदिरावर कळस नाही. श्री भद्रकाली देविची मुर्ती साधारणता, १५”पंधरा इंच उंचीची असून मुर्ती पंचधातुची आहे. तिला १८ हात आहेत. त्या प्रत्येक हातात शस्त्र व अस्त्रे आहेत. ती अशी शुल चक्र शंख शक्ती धनुष्य बाण घंटा दंड पाश कमंडलू त्रिशुल माळा तलवार तेज ढाल चाप इत्यादि आयुधांनी शस्त्रसज्ज आहे.
या भद्रकाली शक्तीपीठाच्या मागे एक पौराणिक आख्यायिका आहे. पूर्वी राजा दक्ष प्रजापतीने मोठया यज्ञााचे आयोजन केले होते. या यज्ञामध्ये भगवान शंकर सोडून सर्व देव ऋषी मुनी यक्ष गंधर्व व सर्व मंडलिक राजे यांना आमंत्रण दिले गेले. पण भगवान शंकर हे त्याचे जावर्इ असूनही त्याला आमंत्रण दिले नाही. त्यावेळी देवी सतीने शंकरांना विनंती केली. माझ्या वडिलांचे घरी यज्ञ आहे आपण जाऊ. तेव्हा शंकरांनी सांगितले आपणास बोलाविल्याशिवाय कोणाकडेही जाऊ नये. मात्र सतीच्या हट्टामुळे तिला जाण्यास परवानगी दिली. सती जेव्हा दक्षप्रजापतीच्या घरी गेली तेव्हा सर्वांनी तिची व शंकराची निंदा केली. सतीने सांगितले, यो निन्दति महादेवं निन्द्यमानं शॄणोति वा | तावुभौ नरकं यातो यावच्चंद्रदिवाकरौ ||
जो शंकराची निंदा करतो वा ऐकतो तो जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत नरकात रहातो. निंदा श्रवण केल्याने सतीने आपल्या देहाचे यज्ञकुंडात समर्पण केले. त्यावेळी शिवगणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरूवात केली. तेव्हा भॄगुमुनीने अपहता असुरा|, रक्षांसि वेदिषदा| ही आहुति दिल्याने अनेक ऋभु नामक प्रबलवीर प्रकट झाले. त्यांचे व शिवगणांचे युध्द झाले.
भगवान शंकर तेथे आले व शोकविव्हळ होऊन यज्ञकुंडातील सतीचा जळता देह घेवून कैलासाकडे निघाले असता बाकी सर्व देव मुनी ऋषी घाबरले. त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली की आता शंकरांना शांत आपणच करू शकता. भगवान विष्णुंनी आपले सुदर्शन चक्र सोडले व त्या चक्राने सतीच्या देहाचे अनेक तुकडे झाले व ते सर्व भाग या भूमंडलावर पडले. त्यापैकी हनुवटीचा भाग हा नाशिक येथे पडला. हनुवटीलाच चिबक असे म्हणतात. म्हणून नाशिकला चिबकस्थान किंवा जनस्थान असे म्हणतात. सतीच्या हनुवटीचा बाग जेथे पडला तेच स्थान भद्रकाली शक्तीपीठ होय.
No comments:
Post a Comment