Sunday, 7 February 2021

संतश्रेष्ठ श्री संतनिवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

 आज षष्ठतिला पौष वद्य स्मार्त एकादशी....

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 

आपले श्रीगुरु श्री गहिनीनाथ महाराज यांच्याकडून आलेली ज्ञान शिदोरी आपले अनुज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे सोपवणारे, संस्कृत भाषेतील भगवदगीतेचे तत्वज्ञान मराठीत आणण्याची ज्ञानदेवांना आज्ञा करणारे,  विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्यानंतर मायबाप म्हणून ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचे संगोपन करणारे, असे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा आज संजीवन समाधी सोहळा.

प्रत्यक्षात निवृत्ती महाराजांचा समाधी सोहळा ज्येष्ठ महिन्यात असतो, त्यादरम्यान सर्व वारकरी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला गेलेले असतात, त्यामुळे तेव्हा त्र्यंबकेश्वरला नाथांच्या समाधीस्थळी काही मोजकेच भाविक उपस्थित असतात.

सर्व वारकऱ्यांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून संप्रदायातील काही ज्येष्ठश्रेष्ठ मंडळींनी निर्णय घेतला आणि पौष महिन्यातील वद्य एकादशी या तिथीला संत निवृत्तीनाथांना समाधी सोहळा साजरा करण्याचे ठरवले.

ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर लगेच सोपान काकांनी सासवडला समाधी घेतली, मुक्ताईचे परमशिष्य चांगदेव महाराज यांनीदेखील पुणतांबा या ठिकाणी समाधी घेतली, त्यानंतर मुक्ताई देखील लवकरच तापीतिरी निजधामास गेल्या. पुढे नामदेव महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज हे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे आले. ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण आपल्या समाधीसाठी निश्चित केले. 

समाधीची वार्ता सर्वत्र पसरली, त्यामुळे सर्व साधुसंत दर्शनासाठी त्रंबकेश्वर नगरीत दाखल झाले. समाधीला काही दिवस बाकी असताना निवृत्तीनाथांचा मोठा उत्सव करण्यात आला. पुढे समाधीचा दिवस उजाडला. भक्त पुंडलिक , भगवान पंढरीनाथ आणि संत नामदेव महाराज यांच्या साक्षीने संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वरात संजीवन समाधी घेतली. याप्रसंगी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. 

संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्या अभंगातून संत निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन करत आहेत.

निवृत्तीनाथ बैसले समाधी स्थितीत !

चिन्मय ते ज्योत उजळली !!

पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा !

अवघियाच्या डोळा असू येती !!

विठोबाचे हृदय आलेसे भरुन !

झाकीले नयन निवृत्तीनाथे !!

पुंडलिके अनिले विठोबासी बाहेर !

केला नमस्कार वैष्णवांसी !!

राही रखुमाई बैसल्या गहिवरत !

आणिक संत महंत ओसंडती !!

नामा म्हणे हरि शुद्धी नाही सकळ !

झाला आता शिळ समाधीसी !!









No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....