Thursday, 11 February 2021

श्रीगुरू गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अनुग्रह दिलेले स्थान : गहिनीनाथ गुंफा

श्रीगुरू #गहिनीनाथांनी श्री #निवृत्तीनाथांना अनुग्रह दिलेले स्थान ः #गहिनीनाथ #गुंफा

#ञ्यंबकेश्वर हे नाथसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. या ठिकाणी नवनाथ व ८४ सिद्धांनी साधना केली आहे असा विविध पुराणे व धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. त्र्यंबकेश्वर स्थित #ब्रह्मगिरी पर्वतावर गोरक्षनाथ व गहिनीनाथ यांची तपश्चर्या स्थाने आजही पहावयास मिळतात. नवनाथापैकी एक असलेले श्री गहिनीनाथ महाराज व  वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांची प्रथम भेट इथेच झाली होती व त्यांना अनुग्रहही दिला होता. 

एकदा श्री संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई या आपल्या भावंडासह ञ्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करत होते. ब्रम्हगिरीचा पर्वत त्याकाळी अत्यंत खडतर व दाट जंगलाने व्यापलेला होता. ती अवघड वाट काढत सर्व भावंडाचा प्रवास सुरु होता. तेवढ्यात त्या जंगलात त्यांना एक वाघ दिसला. वाघाला पाहुन सर्व जण घाबरले व मार्ग शोधत पळू लागले. त्यावेळी निवृत्तीनाथांना तिथे एक गुफा दिसली. वाघाच्या भितीने ते त्या गुहेत शिरले. या गुहेत त्यांना एक तेजपुंज योगी साधना करताना दिसले. ते साक्षात करभंजण नारायणाचे अवतार श्री चैतन्य गहिनीनाथ होते. त्यांना पाहिल्यावर निवृत्तीनाथांचे सर्व भय पळाले. याच ब्रम्हगिरीच्या गुहेत श्री गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. व पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह दिला. अशा रितीने नाथसंप्रदायातुन #वारकरी संप्रदायाचा उगम झाला. 

श्री #ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात या गुरुपरंपरेचे वर्णन केले आहे. 

      आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा |

         मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥

      मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला |

        गोरक्ष वोळला गहिणी प्रती ॥

        गहिणी प्रसादे निवृत्ती दातार |

           ज्ञानदेवा सार चोजविले ॥

अशा प्रकारे ब्रह्मगिरी हे स्थान नाथसंप्रदाय व वारकरी संप्रदाय यांचे संगमस्थान ठरले आहे.






No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....