चिमाजीआप्पांचे पुण्यस्मरण आणि नारोशंकराची घंटा
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठी सैन्याने अभूतपूर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या किल्ल्यामधील चर्चच्या घंटा या लढाईतील विजयाचे स्मरण राहावे म्हणून पेशवे १७३९ सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले. ही घंटा सध्या दिसते तिथे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारच्या वरती बांधण्यात आली. आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे. या घंटेच्या बाजूला असलेला महीरप हा देखील राजपूत शैलीचा आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात. या विजयाचे शिल्पकार असलेले चिमाजीआप्पा यांची आज पुण्यतिथी आहे. ही घंटा नाशिककरांना चिमाजीआप्पा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचे सतत स्मरण करुन देत राहील.
कै. चिमाजी अप्पांचे नांव निघाले, की वसईचा किल्ला आठवतो ! पोर्तुगीजांच्या ताब्यातून किल्ला घेण्यात कुचराई होते आहे, अपयश येते आहे, या शंकेसरशी - ‘या तोफेला माझे शिर बांधा, आणि लावा बत्ती ! माझा देह तरी या किल्ल्यात पडेल ! मग कळवा राऊला, तुमचा चिमा परत आला नाही. किल्ल्यात त्याने देह ठेवला !’
तापलेल्या शिशासारखे हे शब्द, आमच्या मराठा सैनिकांच्या कानांत पडले, आणि कळीकाळाला देखील न घाबरणाऱ्या, सैनिकांनी ‘वसईचा किल्ला’ आपल्या पराक्रमाने जिंकून स्वराज्यात आणला !
सहावीच्या शालेय पुस्तकात, कवि दु. आ. तिवारी यांची ‘मोहरा इरेला पडला’ या नांवाची कविता होती. ती आपल्यासाठी —
मोहरा इरेला पडला !
बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||
बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||
तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||
गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||
मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||
वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||
गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||
- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून
No comments:
Post a Comment