दीपिका देशमुख : कोरोना लॉकडाऊनमध्ये 150 जणींना रोजगार देणारी महिला
पतीच्या आजारपणामुळे त्यांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर घरगुती जोडधंदे करत, हळूहळू महिलांना सोबत घेऊन ज्वेलरीपासून ते पापड, कुरडया आणि लोणची विकणं सुरू केलं. पण कोरोना लॉकडाऊनच्या ऐन कसोटीच्या काळात त्यांनी भरारी घेतली. त्याचं नाव आहे दीपिका देशमुख...
लॉकडाऊनच्या काळात संधी साधून त्यांनी वेगवेगळे मास्क बनवण्याचा काम सुरू केलं. प्रतिकूल परिस्थितीत पुढे येत गृह उद्योगाच्या माध्यमातून अकोल्याच्या दीपिका देशमुख यांनी अनेक गृहिणीच्या आयुष्यात नवा 'सूर्योदय' आणला आहे.
लग्नानंतर सुरुवातीच्या काळात गृहिणी अशीच दीपिका देशमुख यांची ओळख होती. संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू असताना पतीच्या आजारपणामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांचे पती सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या आजारपणामुळे दीपिका यांनी सायकल दुरुस्तीच्या व्यवसायात पुढाकार घेतला. पण पतीच्या औषधांचा खर्च सायकल व्यवसायातून अपुरा पडायचा, असं दीपिका सांगतात.
"मी एक महिला असून मोठ्या हिमतीने सायकलचं दुकान सांभाळत होते. दुकानावर दोन कर्मचारी होते. तरीही पंक्चर काढणे, सायकल दुरुस्त करणे अशी कामे त्यांच्याकडून शिकून घेतली. त्यातून मिळकत व्हायची पण पतीच्या औषधाला हा पैसा अपुरा पडायचा. त्यामुळे दुकानातूनच पूरक व्यवसाय सुरू करण्याच ठरवलं."
"सूक्ष्म कलागुण तसा माझ्यात होताच, त्यामुळं लाह्या आणि बत्तासे यापासून दागिने तयार केले. त्याला चांगली मागणी मिळत असल्याचं पाहून पुढील व्यवसायाला चालना मिळाली."
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या दागिन्यांमधूनच दीपिका यांना नव्या कल्पना सुचत गेल्या. त्यातून डोहाळे जेवण सजावट, लग्नासाठीचा मेकअप अशा विविध उपक्रमांना त्यांनी सुरुवात केली.
त्या सांगतात, "या उपक्रमातून तेल्हाऱ्यात आमच्या वस्तूंची मागणी वाढायला लागली. म्हणून 2017 मध्ये आम्ही सूर्योदय बहुउद्देशीय महिला मंडळ संस्थेची स्थापना केली. त्यातून गृहउद्योग सुरू केला. ग्रामीण भागातील अनेक महिला आमच्या गृहउद्योगाशी जुळल्या. त्यातून महिलांना आवड असणाऱ्या कामाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं.
वस्तू तयार करण्यात ज्या महिलांचा हातखंडा असेल ते काम त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आलं. मग त्यातून कुणी चकल्या, लोणची, पापड्या, कुरवड्या, पापड किंवा डोहाळ्यासाठीचे जेवण असेल ते आम्ही तयार करायला लागलो. आमच्या गृह व्यवसायातून फुलांपासून तयार केलेले दागिने तर असायचेच, पण हळदीपासून तयार केलेले दागिने आमची विशेष ओळख होती, हलव्यापासूनही आम्ही दागिने तयार केले. आणि त्याची विक्री आमच्या गृह उद्योगातूनच व्हायची."
दीपिका यांचा व्यवसाय तेजीत असताना कोरोनाची लाट आली. लॉकडाउन जाहीर झाला. याकाळात अनेकांच्या संसाराची आर्थिक घडी विस्कटली, हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे संसार उघड्यावर आले. पण दीपिका देशमुख यांनी लॉकडाऊनमधील संधी हेरली.
"कोरोना काळात आर्थिक अडचण होतीच. महिलांचा रोजगार हिरावला जाणार का, हा धोकाही होता. मग यावर उपाय म्हणून आम्ही मास्क तयार करण्याचं काम सुरू केलं. आणि ते लक्षवेधी ठरलं. आम्ही तयार केलेल्या नक्षीदार मास्कला प्रचंड मागणी आहे. जवळपास सव्वा लाख मास्कची विक्री आम्ही कोरोना काळात केली आहे.
त्यात पैठणी मास्क, डायमंड मास्क, शालूवरचे मास्क, नवरदेव- नवरीचे मास्क निर्मितीच्या माध्यमातून कोरोनाकाळात दीडशे महिलांना रोजगार तर दिलाच मात्र या काळात या अर्थजनातून त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवण्यात हातभार लावला," असं दीपिका सांगतात. व्यवसायला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यावर दीपिका देशमुख यांचा आत्मविश्वास बळावला, त्यासोबत इतर महिलांना सक्षम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून सूर्योदय बहुउद्देशीय गृह उद्योगाचा पसारा उभा राहिला. गावातील महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहे.
नितेश राऊत (बीबीसी मराठीसाठी)
No comments:
Post a Comment