तसं बघितलं तर येथे रोज दर्शनाला येणारे फार नाहीत पण नवरात्रात हे दृश्य बदलते परिसरातील जुन्या वाड्यांमधील महिला हातात जपमाळ घेऊन देवीला १०८ प्रदक्षिणा घालू लागतात. संध्याकाळी भारतीय बैठक अंथरले जाते. ब्रह्मवृंद यजुर्वेद संहितेचे धीर गंभीर स्वरात सामुहिक पठण करू लागतात. त्यावेळेस मंदिराचा गाभारा भारला जातो. येथे खरोखरच आदिशक्तीचा निवास आहे असे जाणवू लागते.
मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील किर्तन संस्था... साधारण गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून अव्याहतपणे रोज संध्याकाळी येथे कीर्तन सेवा सादर केली जाते. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून तर अमावस्येपर्यंत एक कीर्तनकार नेमला जातो. संध्याकाळी भद्रकाली मंदिरात किर्तन झाले की किर्तनकार काळाराम मंदिरा कडे निघतात. रात्री त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम राम मंदिरात होतो. अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार मिळणे अवघड झाले आहे. एकंदर कीर्तन संस्थेला उत्पन्नाचा मार्ग नसतो. त्यामुळे बुवांची बिदागी, राहण्याची व्यवस्था करणे कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून भद्रकाली आणि काळाराम मंदिर दोन्ही कीर्तन संस्था मिळून एक कीर्तनकार नेमतात. बहुदा काळाराम मंदिरात त्यांच्या मुक्कामाची सोय होते. दोन्ही ठिकाणाहून मिळणारी बिदागी आणि आरतीच्या तबकात काय जमा होतील ते यावर दोन्ही संस्था परंपरा कशी काय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महिना संपला की अमावस्येला भद्रकाली मंदिरात गोपालकाला प्रसादाचे वाटप केले जाते. पूर्वी करमणुकीची साधने फारशी नव्हती. त्या काळात किर्तनाला श्रोत्यांची गर्दी असे नामांकित कीर्तनकार येथे कीर्तन सादर करणे हा आपला बहुमान समजत. सध्याच्या काळात मात्र कीर्तनाच्या वेळी मंदिर जवळपास रिकामेच असते. अशाही परिस्थितीत किर्तन संस्थेने या परंपरेत खंड पडू दिला नाही. मंत्रयुगा कडून यंत्र युगा कडे वाटचाल या शब्दात नाशिककरांचे वर्णन पदोपदी केले आहे. आता तर वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू केली आहे पण एकेकाळी नाशिक हे शहर नव्हते फक्त एक गाव आणि भद्रकाली होती ती या गावाची ग्रामदेवता.
नाशिककरांचे पाय नवरात्र सुरू झाले की देवीच्या दर्शनासाठी भद्रकाली मंदिराकडे वळतात. येथे मग जुने मित्र भेटतात, जुनी माणसे भेटतात जुन्या आठवणींची उजळणी होते एकमेकांना खुशाली विचारली जाते आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने जाणवते नाशिकचे ते गावपण.
No comments:
Post a Comment