"#कात्यायनी"
कात्यायन देवीची आख्यायिका सांगितली जाते ती अशी..
हजारो वर्षापूर्वी महिषासुराने या प्रुथ्वीतलावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्याने आपल्या दैत्यगणांच्या सहाय्याने इंद्राचे इंद्रपद देखील हिरावून घेतले होते. सर्व देवगण त्रस्त झाले. सर्व देवांनी ह्या परीस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी नारदमुनींची मदत मागितली. मग नारदासमवेत सर्व देव कात्यायन मुनींच्या आश्रमात पोहोचले. कात्यायन मुनींनी सर्व देवांचे सामर्थ्य, तेज एकत्र केले. त्यात आपल्या तपश्चर्येचे तेज मिसळले. आणि त्यातूनच निर्माण झाली एक शक्तीशाली देवी. तिचेच नाव ..कात्यायनी देवी.
नाशिक हे नऊ टेकड्यांवर वसलेले गाव. त्यातील डिंगर आळी या टेकावर साधारण २००-२५० वर्षांपासून कात्यायनी देवीचे हे पुरातन मंदिर आहे. अगदी अलीकडे या मंदिरातील एक घंटा चोरीला गेली. १८५१ साली ती घंटा मंदिराला अर्पण केल्याची त्या घंटेवर नोंद होती.
या देवीची अशीही ख्याती सांगितली जाते की .एखाद्या मुलीचे लग्न जमत नसेल, आणि तिने या देवीची ओटी भरली तर तिच्या मनोकामना पुर्ण होतात. असा अनुभव अनेक जणींना आल्याचे परीसरातील नागरिक सांगतात.
अतिशय सुबक लाकडी देव्हाऱ्यात स्थानापन्न असलेली देवीची दोन फुट उंचीची मुर्ती.. काळ्या पाषाणात घडवलेली आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली ही मुर्ती सिंहारुढ आहे. नाशिकमधील बहुधा सर्वात उंच असलेल्या या देवी मंदिरात नवरात्र उत्सव येथील धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळ साजरा करतात.
सुनील शिरवाडकर.
No comments:
Post a Comment