जिद्द आणि संघर्षांची अनोखी कहाणी मजुराची बायको झाली पोलिस उपनिरिक्षक! तिच्या कर्तृत्वाला सलाम!
नाव: पद्मशीला तिरपुडे
जिल्हा: भंडारा.
ही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खूप काही सांगून जाणारी एका मजूरी करणा-या माणसाची पत्नी गावकुसाबाहेरच्या पालावर राहणा-या या कुटूंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. दोन लहानगी लेकर घेवून संसाराचा गाडा ओढताना या पती-पत्नीने यातून बाहेर पडण्याची जी असामान्य धडपड केली तिला आज यश आले आहे, त्या मजूरांच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तिर्ण तर केलीच पण त्यांनतर तिने चक्क पोलीस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली आहे. ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य महिलेची!
मुळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्या सांगतात “ पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.”
पद्मशीला सांगतात. “आयुष्यात एक दिवस असा आला, की घरात अन्नाचा दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. खूप वाईट वाटले. खूप रडलो तसेच उपाशी झोपलो, पण त्या दिवशीच निश्चय केला कि, मोठ्ठ अधिकारी व्हायचं.”. पद्मशीला शिकल्या अन् मोठी अधिकारी व्हायचं या स्वप्नासाठी त्यांनी खूप कष्ट केले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पद्मशीला यांचे पती पेव्हर ब्लॉकचे मजुरीचे काम करुन घर चालवत होते.
नाशिकच्या गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह त्यांनी संसार थाटला होता. पण त्यांच्या मनात यातून बाहेर पडण्याची भरारी घेण्याची जिद्द होती, त्यांना त्यांच्या पतीची साथ होती त्यामुळे अनेक आव्हानांशी लढत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर एमपीएसीच्या परिक्षेत उत्तिर्ण होत त्यांची निवड राज्य पोलिस दलात आज उपनिरिक्षक पदावर झाली आहे.
जीवनात वाईट स्थिती आली म्हणून तिथेच न थांबता त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क पोलिस फौजदार होवून अनेकजणींसमोर आदर्श तर ठेवलाच आहे पण स्वत:च्या जीवनाला असामान्य वळण देण्याची किमया साधली आहे.!
सलाम तिच्या मेहनतीला
No comments:
Post a Comment