Saturday, 24 October 2020

आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा

 आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा

विजयादशमी अर्थात दसरा. याच दिवशी आदिमाया जगदंबेने महिषासूराचा वध करुन सर्वसामान्यांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केल्याचे मानले जाते. त्यामुळे आज आपण महिषासूरमर्दिनी म्हणून ओळखल्या जाणा-या आदिशक्ती भगवती सप्तशृंगीमातेची माहिती जाणून घेऊया.

नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले जाते. महाराष्ट्र-गुजरात यांच्या सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगांमधील सप्तशृंग तथा वणीचा डोंगर निसर्गरम्य आहे. येथे पूर्वी घनदाट वनराई होती. गिरिजा नदीचा उगम त्या डोंगरातून आहे. हे स्थान नाशिकपासून उत्तरेस ६५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.

सप्तशृंगी मातेचे रूप हे आदिमाया आदिशक्तीचे मूळ रूप आहे, नि ते तसे पूर्ण रूप आहे असे मानले जाते. शिवाय ती महिषासुरमर्दिनी देवी म्हणजे साक्षात् महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीही आहे. 

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. सप्तश्रृंगी गडावर अनंत कालापासून महामाया आदीशक्त्तीचे वास्तव्य आहे.तिच्या दर्शनासाठी व मनोवांछीत फलप्राप्तीसाठी अनेक थोर तपस्वी , महामुनी , संत , महंत, आणि भक्त गडावर आल्याचे उल्लेख आढळतात. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका.

एकपीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर | तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी।।

देवीने महिषासुराचा वध महापराक्रमाने केल्यानंतर ती विसाव्यासाठी त्या सप्तशृंगगडावर आली अशी आख्यायिका आहे. प्राचीन काळी दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. जे कोणी पूजापाठ उपासना करत त्यांना पकडून तुरुंगात डांबून ठेवले जात असे! जप-तप करणाऱ्या ऋषिमुनींचे आश्रम जाळणे, गुरेढोरे पळवणे, सोनेनाणे लूटून नेणे असा दुराचार चालू असल्याने देवलोकही चिंताग्रस्त झाला होता. अंती ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्र येऊन दिव्य शक्ती निर्माण केली, त्या महादिव्य शक्तीने महापराक्रमाची ज्या पवित्र अशा चार ठिकाणी प्रचीती दाखवली ती ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली यांच्या त्रिगुणात्मक रूपातील साडेतीन शक्तिपीठे! अवघ्या असुरातील अत्याचारी महिषासुर आणि त्याचे दोन बंधू यांनी असुरी प्रवृत्तीने पापांची परिसीमा गाठली होती. त्यांनी आम्हीच तुमचे देव। आमचीच पूजा करा असा आदेशच आमजनांना दिला असल्याने तो मोडून देवपूजा करणाऱ्यांना मरण पत्करावे लागत असे. तशा बलदंड असुरांपैकी महिषासुरांच्या दोन्ही भावांचा त्यांच्याशी प्रखर लढा देऊन आदिशक्ती देवीने वध केला. मात्र महिषासूर रेड्याच्या शरीरात प्रवेशून राहत असल्याने त्याला मारणे अवघड झाले होते. अखेर, देवीने सारे सामर्थ्य पणाला लावून त्या रेड्याचा शिरच्छेद केला तेव्हा महिषासूर एवढ्या ताकदीने पळाला, की त्याच्या उड्डाणाने डोंगराला मोठे खिंडारच पडले. महिषासुराने चवताळून जाऊन देवीशी निकराचे युद्ध सुरू केले जे देवीनेही अफाट शक्तिसामर्थ्यांने नऊ दिवस करून महिषासुराचा अंती वध केला. देवीने महिषासुराचा वध करताच देवदेवतांनी स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी केली. देवीने विसाव्यासाठी नि पुढे भक्तांच्या चिरंतन सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, या गडावर वास्तव्य केले. तोच तो सप्तशृंगीमातेचा सप्तशृंगगड. 

सप्तश्रृंग गड हा पुर्वी दंडकारण्याचा भाग होता. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. राम-रावण युद्धात लक्ष्मणाला ज्यावेळी मूर्छा आली त्यावेळी मारुतीने आवश्यक औषधी वनस्पती न मिळाल्याने त्याच्या उपचारासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. त्यावेळी द्रोणागिरीचा काही शिळाखंड खाली पडला, तोच हा सप्तशृंगगड अशीही आख्यायिका महानुभावीय ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात आलेली आहे. मार्कण्डेय ऋषी , पाराशर ऋषी इ. महान ऋषींनी याच ठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख आढळतो. आदिशक्तीचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेस झाला असल्याने तेथे चैत्रोत्सवही होतो. सुरथ राजाला देवीच्या कृपेने राजपद लाभल्याने त्यानेच हा उत्सव सुरू केल्याचे सांगतात. शंकराचार्यांनीही तेथे नवचंडी याग केला, तेव्हा दूधगंगा प्रकट झाली होती अशी आख्यायिका आहे.नाथ संप्रदायाच्या नवनाथ भक्तीसार या पोथीत उल्लेख केल्यानुसार नाथांची सर्वात प्रबळ अशी शाबरी विद्या त्यांना सप्तशृंगगडावर तपश्चर्या केल्यानंतर आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादानेच प्राप्त झाली आहे. 

सप्तश्रृंग माता ही ज्ञानेश्वरांचीही कुलदेवता आहे. ज्ञानेश्वरीच्या  १८व्या अध्यायामधील एका ओवीत संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत सप्तश्रृंग गडावर आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.संत निवृत्तीनाथांच्या भजन मालिकेत पहिल्या सात अभंगात संत नामदेवांनी सधु संतांच्या नात्या गोत्यांचे वर्णन केले आहे.संत निवृत्तीनाथ पांडुरंगाची आळवणी करताना म्हणतात -

आता खरे चला तुम्ही सप्तश्रृंगा|

कार्य पांडुरंगा कार्य सिद्धीस न्यावे ॥

संत ज्ञानेश्वर नामदेव व मुक्ताबाई या लहान भावंडांनी त्या पुर्वीच समाधी घेतली होती. साहजिकच निवृत्तीनाथांना समाधी घेण्याची घाई झाली म्हणुन तीन दिवस गडावर येउन ध्यानस्त बसले. निवृत्तीनाथ भगवतिची परवानगी घेण्यासाठी गडावर आले होते. याचा उल्लेख ही शके बाराशे बारोत्तरीत आहे. कुलदेवता असलेल्या आदिशक्ती भगवतीची परवानगी घेऊन संत निवृत्तीनाथ शेवटी त्र्यंबकेश्वरी जाउन समाधीस्थ झाले अशीही आख्यायिका आहे. सोळाव्या शतकातील संतकवी त्र्यंबकराज यांना तिने प्रकाशज्ञान दिले, म्हणून त्यांनी सप्तशृंगगडावर येऊन तिचे अखंड ध्यान केले. समर्थ रामदास स्वामींनी रचलेला ‘ज्वालामुखी ते अंबिका । सप्तशृंगीची चंडिका ’ हे स्तोत्र तीर्थावली दंडीगाण (दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍या, गोसाव्यांची एक जमात) यात सापडते. सप्तशृंगी देवी माता | चरणी ठाव देई आता । असे मागणेही भक्तांकडून मागितले जाते. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. संत गाडगे महाराज ही समाज प्रबोधन करत करत गडावर थांबल्याचा उल्लेख आहे. देवीचे परमभक्त संत दाजीबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते. सप्तशृंगगड हा एक किल्ला ही आहे.

हे मंदिर म्हणजे डोंगरात असलेल्या गुहेमध्येच देवीची मूर्ती आहे. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. मूर्ती शेंदुरचर्चित आहे.  हि मूर्ती अठरा हातांची असून आठ फूट उंचीची आहे. ती खूपच भव्य आहे. तिच्या हातात अठरा शस्त्रे व साधने - कमळ, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, मणिमाला, कुऱ्हाड, गदा, ढाल; यांसोबत पाश, शक्ती, शंख, घंटा, दंड, धनुष्य, पानपात्र, कमंडलू - आहेत. देवीचे प्रखर तेज डोळ्यांत न मावणारे आहे. तिला अकरा वारी साडी, रोज एका विशिष्ट रंगाची अशी आठवडाभर नेसवली जाते. तिच्या चोळीसाठी तीन खण वापरले जातात. तिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातील कर्णफुले आदी अलंकारही शोभून दिसतात. 

देवीचे दर्शन गडाच्या दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्या चढून गेल्यानंतर, दोन शिखरांमध्ये गुहेसारख्या एका भागात शिरल्यावर होते. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

म्र्तीची उंची आठ फूट असल्यामुळे तिची विधिवत पूजा शिडी लावून करावी लागते. मूर्तीला स्नान थंड जलाने नित्य घालतात. मात्र मंगळवारी नि शुक्रवारी तिला गरम जलाने अभिषेक करून भरभरून शेंदूर लावतात. देवीच्या भुवया नि पापण्या रंगाने कोरतात, भलेमोठे कुंकू लावतात, सौंदर्य न्याहळण्यासाठी तिला आरसा दाखवतात. तिला केवळ नवरात्रोत्सवात अलंकार, नथ, गळसरी लेवून खीरपुरीचा महानैवेद्य दाखवतात, नाना वाद्यांच्या गजरात तिची त्रिकाळ आरती होते. तिच्या पराक्रमाची, तिने महिषासूर व चंडमुंड अशा असुरांच्या केलेल्या वधाची आणि तिच्या अमाप शक्तिसामर्थ्याची वीरगाथा तिच्या सिंहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो । वधुनी महिषासूर मर्दियले चंडमुंड हो ।। या आरतीतून गायली जाते. अपराध सहस्त्र भाजनं पतितं देवी भवानी भूतले । अगदि शरणागतं शिवे कृपया देहि पदेषु देहि मां ।। असा तिच्या स्तोत्राचा प्रारंभ आहे. ते सप्तशृंगगडावर सकाळ-सायंकाळ गायले जाते; सायंकाळी, आरतीच्या वेळी, दुर्गासप्तशतीतील शक्रादिस्तुतीच्या चौथ्या अध्यायाचे पठन होते. त्या सोबत श्रीमद्शंकराचार्यरचित ‘अपराधक्षमापन' स्तोत्रही म्हटले जाते. सप्तशृंगी मातेचा महिमा "ऐशी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो । अमर दुर्लभ रमणे करिसी सप्तशृंग निवास हो।। "असा तिच्या आरतीतूनही आर्तपणे आळवला जातो.

गडावर सुमारे पाच हजार वस्ती आहे. मात्र तेथे एकही कावळा नसल्याचे सांगतात. अठराव्या शतकात सरदार दाभाडे यांनी गडावर जाण्यासाठी डोंगर फोडून केलेल्या पायऱ्या फार उंच आहेत. त्या गडाच्या अवघड पायऱ्या चढून पठारापर्यंत पोचताना सहा शिलालेख पाहण्यास मिळतात. त्यांत तेथील विकासकार्यासंबंधी, बांधकामाविषयीची माहिती असल्याचे आढळून येते. एक शीलालेख संस्कृत भाषेतील तर बाकीचे मराठी भाषेतील आहेत. सप्तशृंगीदेवीचे दर्शन आठशेबावीस पायऱ्या चढून गड गाठल्यावर घडते. देवीभक्त अंबाबाई दाभाडे यांनी त्या पायऱ्या इसवीसन १७१० मध्ये बांधून दिल्या आहेत. पायऱ्यांचा पहिला टप्पा तीनशेपन्नास पायऱ्यांचा तर दुसरा चारशेबहात्तर पायऱ्यांचा आहे. कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन देवीउपासक भावंडांनी मिळून त्या पायऱ्यांची पुनर्रचना  १७६८ मध्ये केली. त्याच तीन बंधूंनी भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, तिच्याजवळ गणपतीचे सुंदर मंदिर नि रामतीर्थ नावाचे कुंडही बांधून गड सुशोभित केला. जुन्या रडतोंडीच्या मार्गाने, तर नांदुरी मार्गे गडावर जाता येते. आधी महिषासुराचे नि गणेशाचे पायथ्याशी दर्शन घ्यायचे. नंतर पायऱ्या चढून कुलस्वामिनीचे मंदिर गाठायचे असा सर्वसाधारण प्रघात आहे. 

गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. देवीची यात्रा नवरात्रात पहिल्या माळेपासून पंधरा दिवस असते. त्यात गाथा, सप्तशतीचे नि अन्य पुराणांचे पाठ, कवन, आरत्या, आदींचे पठण होते. काही जण त्या सात शिखरांना तीन किलोमीटर पाऊलवाटेने प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणावाटेवर परशुराम बाबांचे दर्शन घडते. 

पुर्वी सप्‍तश्रृंग गडावर १०८ कुंडे असल्‍याचा उल्‍लेख आहे. मात्र सध्‍या प्रत्‍यक्षात केवळ १० ते १२ कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत असे अनुमान आहे. गडावरून पुर्व दिशेने गेले की मारूतीचे मंदिर व थोडे पुढे गेले की दाजीबा महाराजांची समाधी लागते. दाजीबा महाराजांच्‍या समाधीपासुन जवळच सुर्यकुंड व कालीकुंड हे लागतात. ही दोन कुंडे पेशवेंचे सरदार छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडाचा पाण्‍याचा वापर श्री. भगवतीच्‍या दैनंदिन स्‍नानासाठी केला जातो.

जलगुंफा - या नावाने एक तिर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पोखरणी देवीच्‍या पायापासुन उगम पावली असे मानतात. ते‍थे भंयकर अंधार असल्‍यामुळे पाण्‍याचा किती थांग आहे हे सांगता येणार नाही. पोखरणीचे मुख पुर्वेकडे असल्‍यामुळे सकाळच्या सूयकिरणांनी अधुंक उजेड पडतो. तिर्थावरील पाणी बफासारखे थंड आहे. जलगुंफेतील या तीर्थास मछतीर्थ असेही म्हणतात.


शिवतिर्थ - सप्‍तश्रृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नामक एक पुण्यकारक तिर्थ आहे. हेच ते गिरीजातिर्थ व शिवतीर्थ होय.  ब्रह्मदेवाने नारदाला या तीर्थस्थानाने शुचिर्भूत होऊन नंतर देवीचे दर्शन घेण्यास सांगितले असा पुराणात उल्लेख आहे. पूर्वी याचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. परंतु त्याची पडझड झाल्याने ट्रस्टने त्याचा नुकताच जिर्णोध्दार केला असून तेथे स्नानाबरोबरच वस्त्रांतर गृहाची व्यवस्था केली आहे. या कुंडात स्नान केल्यास विविध तापापासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या तिर्थात सर्व देवांनी स्नान करुन जो कोणी पिंड श्राध्द करील तो पितरासहित जगदंबा स्वरुपास प्राप्त होईल. तिर्थाजवळ आणखी एक हेमाडपंथी सिध्देश्वर मंदिर आहे. जवळच एक मारोतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता. मल्लखांबाचे मुळ स्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरु बाळंभट दादा देवधर यांना श्री मारुती या विद्येचे येथे धडे दिले व येथूनच मल्लखांब विद्या पुढे सुरु झाल्याची उदाहरणे सापडतात.


तांबुलतिर्थ - सप्‍तश्रृंग देवीच्या मागील बाजूला थोडे उत्तरेकडे एक अष्टकोनी कुंड आहे. या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाउन या बाजूला टाकल्यामुळे पाणी व जमिनीचा काही भाग तांबडया रंगाचा झाला. त्यामुळे या तिर्थाला तांबूल तिर्थ असे म्हणतात. तसेच एक काजल तिर्थ आहे. याचे पाणी काळे आहे. देवीने काजळ घातलेले डोळे येथे धुतले म्हणूण यास काजळ तीर्थ असे म्हणतात. शिवालय तलावाच्या पश्चिमेस गंगा यमुना नावाची दोन कुंडे शेजारी-शेजारी आहेत. यमुना कुंडाचे पाणी काळेभोर व रुचकर आहे. या कुंडापासून थोडे दक्षिणेस गेल्यास पूर्वाभिमुख गणपती मंदिर आहे. पूर्वी वणी कडून गडावर येण्यासाठी याच दगडी पाय-यांच्या मार्गाने गडावर येऊन गणेश मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबत असत. येथे पण दगडाचे कोरीव तळे असून त्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असत.


मार्कंण्डेय दर्शन - सप्‍तश्रृंग परिसरात अनेक पवित्र स्थळे आहेत. त्यात मार्कंण्डेय पर्वताचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्‍तश्रृंगीचे मुख पुर्वेकडे आहे. तेंव्हा समोरील मार्कंण्डेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंण्डेय भृगृ वंशातील त्रेता युगात झाले. प्रारंभी ते अल्पायुशी होते, परंतु सप्तर्षींचे आशिर्वादाने दिर्घायु झाले. धर्मराज वनवासात असताना मार्कंण्डेय ऋषींनी त्याला अनेक वृतांत कथन केले. कल्पांतीच्या वटवृक्षाचे व प्रलयाचे दर्शन मार्कंण्डेय ऋषींना झाले होते. वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दिर्घायुष्य प्राप्तीसाठी जी शांती करतात तिच्यात प्रमुख देवता मार्कंण्डेय हीच असते. याच गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. मार्कंण्डेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवात श्रेष्ठ ठरले.


शितकडा - याला सतीचा कडा असेही म्हणतात. शिवालय तिर्थापासून थोडयाच अंतरावर शितकडा नावाची दरी आहे. ही दरी सुमारे १२०० फूट खोल असून हा कडा खूप ऊंच व सरळ आहे. या कडयाचा वापर बलिदानासाठी उपयोगी होईल. गडावर काही संकट आल्यास काही होऊ नये म्हणूण तेथे पशू बळी देण्याची पध्दत होती. याला भाग देणे असे म्हणत. तसेच देवीची कृपा व्हावी म्हणूण या कडयावरुन लोटून बळी दिला जाई. या कडयाबद्दल एक विचित्र अख्यायिका आहे. फार फार वर्षापूर्वी एका बाईने नवस केला होता की, तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह सप्‍तश्रृंग गड चढून येणार होती व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करुन बैलगाडीतून शितकडा उतरणार होती. शितकडा म्हणजे कुठलीही वस्तू कडयावरुन खाली टाकली तर तिचे भाताच्या शिता सारखे तुकडे तुकडे होणे. देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला. नवस फेडण्यासाठी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत बसली. आपल्या नव-याला तिने गाडी शितकडयावरुन नेण्यास सांगून मी केलेला नवस फेडावयाचा आहे. असे सांगितले. तिचा नवरा तयार होईना. शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालविण्यास तयार झाला. सर्वांनी देवीची करुणा भाकली. घरगडी, बैलगाडी, बाई व मुलगा कडयावरुन सुखरुप खाली उतरले. हा भयास नवस देवीने बाईकडून फेडून घेतला. आजही शितकडयावर गाडीच्या चाकोर्या दिसतात. या कडयाच्या वरच्या बाजूस वा-याचा झोत मोठा असतो. सध्या येथे कडयाचा वरील भाग कुंपन घालून सुरक्षित केलेला आहे. हा कडा पवित्र समजून लोक दर्शन घेतात. 

गडाच्या पायथ्याशी वणी गावात साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वीपासून असलेले जगदंबा मंदिर प्रसिद्ध आहे. तेथील देवीची मूर्ती सप्तशृंगी मातेच्या प्रतिरूपात पाहण्यास मिळते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर जगदंबा मातेचे दर्शन घडले, की यात्रा सफल होते अशी धारणा आहे. प्रभुरामचंद्रांनी सप्तशृंगगडवासिनीच्या सोबत वणीच्या जगदंबेचे दर्शनही घेतले अशी कथा आहे. ते मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरची दीपमाळ आणि तेथील गणेशतळ लक्षणीय आहे. तेथील मूर्ती आकर्षक व तेजस्वी आहे. 

(संकलन)























3 comments:

  1. Live darshan through App not working since many days. Please check and resolve this issue.

    ReplyDelete
  2. दर्शन बुक सेंटर हे संस्थान ने चालु केले आहे का

    ReplyDelete

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....