Sunday, 11 October 2020

त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा

त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा

त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा २०० वर्षांपूर्वी मराठे-इंग्रज युद्धानंतर इंग्रजांनी लुटून इंग्लडला नेला होता.

सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे २० कोटींपेक्षा जास्त किंमतीचा हा अष्टकोनी हिरा जगातील सर्वाधिक महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जातो. त्र्यंबकेश्वराच्या मुकूटात विराजमान झालेला असल्याने त्याला `आय ऑफ शिवा’ असेही म्हटले जाते. जगातील सर्वाधिक आकर्षक हिऱ्यांमध्ये त्याचे आघाडीचे स्थान आहे.  ९० कॅरटचा (१८ ग्रॅम वजनाचा) हा हिरा त्र्यंबकेश्वरमधील रामचंद्र ताम्हणकर यांच्या घरात जमिनीत लपविलेल्या खजिन्यात होता. या खजिन्यात शेषशायी विष्णूच्या मूर्तीसकट एकूण ४३ किलो सोने, १३० किलो चांदी आणि सोन्याच्या मोहरा, अमूल्य रत्ने असलेल्या अनेक पेट्या होत्या. हा सर्व खजिना इंग्रजांनी १८१८ मध्ये लुटला. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी `नास्सक` (Nassak, Nassuck) असा केला गेला. त्यानंतर नास्सकचा अनेकदा लिलाव झाले. हिरे व्यापाऱ्यांनी त्याला अधिक आकर्षक करण्यासाठी दोनदा पैलू पाडले. त्यामुळे त्याचे वजन निम्म्याने घटले. 

सध्या नास्सक ४३.३८ कॅरेटचा (८.६८ ग्रॅम वजन) असून, त्याची किंमत २० कोटी पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. १९७० ला नास्सक रॉबर्ट मोवाड (Robert Mouawad) या लेबनान येथील जवाहि-याने तो विकत घेतला. तेव्हापासून तो त्यांच्या संग्रहात असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यानंतरही नास्सकचा लिलाव झाल्याचे समजते. 

नास्सकचा पूर्वेतिहास इतिहास मोठा रोमांचक आहे.
नास्सक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाना (पूर्वीचे आंध्र प्रदेश), महबूबनगर जवळील आमरागिरी खाणीत सापडला व त्यानंतर तो म्हैसूरच्या खजिन्यात दाखल झाला. मुगलांनी म्हैसूरच्या खजिना लुटला. त्यानंतर नास्सक मुगलांच्या खजिन्याची शान बनला. पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळविल्यानंतर मुगलांचा जामदारखाना (खजिना) पेशव्यांच्या ताब्यात आला तेव्हा नास्सक पेशवाईत दाखल झाला.  त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वराला नवस केला होता. या नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराला मुगलांच्या खजिन्यात मिळालेला सोन्याचा रत्नजडीत मुकुट त्र्यंबकेश्वराला अर्पण केला. या मुकुटात सर्वात मोठा हिरा नास्सक होता. म्हणून त्याला शिवाचा डोळा (आय ऑफ शिवा) असे म्हटले गेले. 

त्र्यंबकेश्वर ते इंग्लंडचा प्रवास !
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन  नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला. त्र्यंबकच्या लुटीचे वर्णन तत्काल‌िन कॅ. ब्रीजचे रिपोर्ट व १६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नास्सक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त वाचायला मिळते. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी नासक (Nassak, Nassuck) असा केला गेला. इंग्रजांच्या हाती आलेल्या हिरा मिळविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यातून मिळणाऱ्या बक्षिसावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हा वाद इंग्लडच्या कोर्टात गेला. या वादाचे पडसाद इंग्लडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. अखेर पंधरा वर्षांनंतर १८३६-३७ मध्ये या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला. 

त्र्यंबकेश्वराचा मुकुट वाचला
‘देवळांना अथवा त्यांच्या संपत्तीला हात लावायचा नाही’ इंग्रजांच्या या धोरणामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटाची इंग्रजांनी लूट केली नसावी. मात्र, लुटीच्या भीतीने त्र्यंबकेश्वराचा खजिना म‌ंदिरातून बाहेर काढून रामचंद्र ताम्हणकरांच्या घरात जमिनीत गाडण्यात आला आणि इंग्रजांच्या झडतीत नास्सक हिरा व इतर संपत्ती इंग्रजांच्या हाती लागली. त्यामुळे इंग्रजांनी मंदिरातील त्र्यंबकेश्वर मुकुटाकडे दुर्लक्ष केले असावे. अथवा मुकुट इतरत्र लपविल्यामुळे वाचला, असाही कयास बांधला जातो.

नास्सकचे अनेक लिलाव 
इंग्लडच्या पार्लमेन्टमध्ये नाशक हिऱ्यासह भारतातून लुटलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरले. त्यानुसार १८३६ मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव झाला. लंडनच्या रूंदेल आणि ब्रिज (Rundell and Bridge) या जोहरींनी नाशक तीन हजार पाऊंडला विकत घेतला. त्यांनी नास्सकला पैलू पाडले तेव्हा त्याचे वजन ९० कॅरेटने घटून ७८.६२५ कॅरेट झाले. त्यानंतर जुलै १९३७ मध्ये सुप्रसिद्ध विलीस रूममध्ये नास्सक पुन्हा एकदा विक्रीला आला. तेव्हा इंग्लंडच्या राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती असलेले वेस्टमिन्स्टर रोबेर्ट ग्रोसवेनोर (Robert Grosvenor) यांनी तो विकत घेतला. असे म्हटले जाते की, इंग्लंडच्या राणीच्या समारंभात रॉबर्ट यांनी आपल्या तलवारीच्या मुठीत हा हिरा बसविला होता. १९२७ मध्ये नाशक संघराज्यात आला. १९३० मध्ये नास्सकची गणना जगातील पहिल्या २४ हिऱ्यांमध्ये केली गेली. १९४० साली हॅरी विन्स्टननी हा हिरा विकत घेऊन त्यांना पुन्हा पैलू पाडले. त्यामुळे नास्सकचे वजन झाले ४३.३८ कॅरेट. म्हणजे मूळ वजनाच्या निम्मे झाले. हा हिरा एडवर्ड हँड यांनी विकत घेतला. त्यानंतर झालेल्या रॉबरीमध्ये तो गहाळ झाला. अमेरिकन ज्वेलर हॅरी विनस्टंन (Harry Winston) यांनी १९४० मध्ये तो पॅरीसमधून मिळविला. त्यानंतर नास्सकने जगभरातील श्रीमंतांना आपल्या प्रेमात पाडले. मधल्या काळात त्याला जेमोलोजीकाल इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यात आले. १९६४ मध्ये जी. रोबेर्ट या शास्त्रज्ञाने संशोधनासाठी तो मिळवला. न्यू यार्कमध्ये १९७० मध्ये एडवर्ड जे यांनी पाच लाख डॉलरला तो विकत घेतला अन् हा जगातील सर्वात महागडा हिरा ठरला. त्यानंतर इंग्लंडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खलीदिबन अब्दुल अझीझ असा नास्सकचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यानंतर २००७ मध्ये लेबनान येथील रॉबर्ट मोवाड यांच्या संग्रहात नास्सक दाखल झाला. त्यानंतरही नासकचा दहा लाख डॉलर (५ कोटी) लिलाव झाल्याचे म्हटले जाते. 

नास्सक हिऱ्याची वैशिष्ट्य
मूळ वजन : ९० कॅरेट (१८ ग्रॅम)
सध्याचे वजन : ४३.३८ कॅरेट (८.६८ ग्रॅम)
मूळ पैलू : मुगल कट 
लांबी-रूंदी-उंची : २३.३५ X २१.७३ X ११.५१ एमएम 
रंग : पारदर्शक (कलरलेस)
कुठे मिळाला : आमरागिरी 
हिरा कधी मिळाला : १३ व्या शतकात 
सध्या कोणाकडे आहे : रॉबर्ट मोवाड, लेबनान 
सध्याची अंदाजे किंमत : २० कोटी

भारतातून लुटल्या गेलेल्या पहिल्या १० अनमोल वस्तूंमध्ये 'नास्सक' चा समावेश होतो.


(मजकूर सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या रमेश पडवळ यांच्या लेखावरून साभार. फोटो - आंतरजालावरुन)








वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....