सांडव्यावरची देवी म्हणजे साक्षात सप्तश्रृंगनिवासिनी चे प्रतिरुप
देवीच्या साडेतीन पीठांतले महत्त्वाचे ‘सप्तशृंगनिवासिनी’चे अर्धेपीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरांची आणि भक्तांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत सप्तशृंगनिवासिनी देवीची मंदिरे स्थापन झालेली दिसून येतात. एकट्या नाशिक शहरात सप्तशृंगनिवसिनीची पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहेत. परंतु, त्या सर्व मंदिरांत पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरच्या देवीचे मंदिर आहे. थेट गोदापात्रातच हे मंदिर असल्यामुळे गोदावरीच्या पुरात मंदिर दर वर्षी न्हाऊन निघते. २०१६ साली नवरात्री सुरू होण्याला आठ दिवस राहिले असतानाच गोदावरीला महापूर आला होता. देवी मंदिराशेजारच्या नारोशंकराच्या घंटेला त्यावेळी पुराचे पाणी लागले होते. देवी मंदिर तर पूर्णपणे पुरात बुडून गेले होते. त्यावेळी मंदिर काही वाचत नाही असेच सर्वांना वाटत होते. परंतु, मंदिराचा पुढचा सभामंडप, फरशा आणि दीपमाळ पुरात वाहून गेले. देवी आणि तिचा गाभारा मात्र जसेच्या तसे सुखरूप राहिले. त्यानंतर मोठ्या घाईने नवरात्रीची तयारी करावी लागली. त्यावर्षीच चंद्रकांत राजेबहाद्दर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली. दगडी दीपमाळ हेदेखील सांडव्याच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते.
अठरा हातांची भव्य मूर्ती
सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.
गोदावरीच्या पत्रात हल्ली अनेक पूल तयार झालेले आहेत. पूर्वी मात्र एवढे पूल नव्हते. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा किंवा कॉजवे होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले.
सप्तशृंगगडावरची देवी थेट नाशिकला (गोदावरीत) कशी आली याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, ‘मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.’ आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सध्या नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
नारोशंकर राजेबहाद्दर यांचे दहाव्या पिढीतील वंशज
१. सदाशिव त्र्यंबक राजेबहाद्दर २. चंद्रकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ३. निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ४. मधुसूदन त्र्यंबक राजेबहाद्दर आहेत. देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने दिले जातात.
देवी मंदिराशेजारी नारोशंकराचे मंदिर आहे. या मंदिरावरील मोठी घंटा हे नाशिकचे भूषण आहे. महापालिकेच्या लोगोमध्येसुद्धा या घंटेचा समावेश केलेला आहे. इसवी सन १७२१ मध्ये ही घंटा दोन हत्तींवरून नाशिकला आणली गेली होती. २०२१ मध्ये या घंटेचा तीनशेवा वर्धापनदिन आहे.
No comments:
Post a Comment