Wednesday, 30 September 2020

सांडव्यावरची देवी म्हणजे साक्षात सप्तश्रृंगनिवासिनी चे प्रतिरुप

सांडव्यावरची देवी म्हणजे साक्षात सप्तश्रृंगनिवासिनी चे प्रतिरुप 

देवीच्या साडेतीन पीठांतले महत्त्वाचे ‘सप्तशृंगनिवासिनी’चे अर्धेपीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरांची आणि भक्तांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत सप्तशृंगनिवासिनी देवीची मंदिरे स्थापन झालेली दिसून येतात. एकट्या नाशिक शहरात सप्तशृंगनिवसिनीची पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहेत. परंतु, त्या सर्व मंदिरांत पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.

गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरच्या देवीचे मंदिर आहे. थेट गोदापात्रातच हे मंदिर असल्यामुळे गोदावरीच्या पुरात मंदिर दर वर्षी न्हाऊन निघते. २०१६ साली नवरात्री सुरू होण्याला आठ दिवस राहिले असतानाच गोदावरीला महापूर आला होता. देवी मंदिराशेजारच्या नारोशंकराच्या घंटेला त्यावेळी पुराचे पाणी लागले होते. देवी मंदिर तर पूर्णपणे पुरात बुडून गेले होते. त्यावेळी मंदिर काही वाचत नाही असेच सर्वांना वाटत होते. परंतु, मंदिराचा पुढचा सभामंडप, फरशा आणि दीपमाळ पुरात वाहून गेले. देवी आणि तिचा गाभारा मात्र जसेच्या तसे सुखरूप राहिले. त्यानंतर मोठ्या घाईने नवरात्रीची तयारी करावी लागली. त्यावर्षीच चंद्रकांत राजेबहाद्दर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली. दगडी दीपमाळ हेदेखील सांडव्याच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते.

अठरा हातांची भव्य मूर्ती
सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.

गोदावरीच्या पत्रात हल्ली अनेक पूल तयार झालेले आहेत. पूर्वी मात्र एवढे पूल नव्हते. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा किंवा कॉजवे होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले.

सप्तशृंगगडावरची देवी थेट नाशिकला (गोदावरीत) कशी आली याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, ‘मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.’ आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सध्या नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

नारोशंकर राजेबहाद्दर यांचे दहाव्या पिढीतील वंशज
१. सदाशिव त्र्यंबक राजेबहाद्दर २. चंद्रकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ३. निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ४. मधुसूदन त्र्यंबक राजेबहाद्दर आहेत. देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने दिले जातात. 

देवी मंदिराशेजारी नारोशंकराचे मंदिर आहे. या मंदिरावरील मोठी घंटा हे नाशिकचे भूषण आहे. महापालिकेच्या लोगोमध्येसुद्धा या घंटेचा समावेश केलेला आहे. इसवी सन १७२१ मध्ये ही घंटा दोन हत्तींवरून नाशिकला आणली गेली होती. २०२१ मध्ये या घंटेचा तीनशेवा वर्धापनदिन आहे.




 सुंदर नारायण मंदिर, नाशिक


मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत. कालौघात तसेच पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज सुरू झाली आहे. या मंदिरांच्या यादीत पुरातन काळातील अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराचा समावेश आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. सुंदरनारायण मंदिर पुर्वाभिमुख आहे. चौथर्‍यावर हे मंदिर वसले आहे. 20 मीटर उंचीवर वसलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष वेधून घेते. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कलशाच्या खालच्या बाजूला अनेक उपशिखरं उतरत्या क्रमाने रचली आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवलेला हा घुमट आकर्षक दिसतो.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत तिन्ही बाजूंना ह्या छत्र्या आहेत. ह्या छत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केले आहे.

मंदिरामध्ये विष्णूची मुर्ती मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला वृंदा आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती आहेत.

या मंदिराबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते की वृंदा ही जालंधर नावाच्या असूराची पतिव्रता पत्नी होती. वृंदेच्या पतिव्रत्येमुळे जालंधर अजिंक्य झाला होता. विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी वृंदेचे पतिव्रत्य भंग केले. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिने विष्णूला मन:शांती नष्ट होण्याचा शाप दिला. परिणामी तिच्या शापाने भगवान विष्णूंना कृष्णवर्णरूप प्राप्त झाले. (त्याला आपण शालिग्राम म्हणतो.) या शापातून नष्ट होण्यासाठी श्री विष्णू नाशिकला बद्रिकाश्रमात आले. तिथल्या तीर्थावर स्नान करुन शापमुक्त झाले व आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले. त्याच ठिकाणी या मंदिराची स्थापना करण्यात आली व भगवान विष्णूंचे हे रूप सुंदरनारायण म्हणून प्रसिध्द झाले.

सोळाव्या शतकात हे मंदिर औरंगजेबाने उध्वस्त करून तेथे थडगे बांधले होते, मात्र पेशव्यांच्या आज्ञेवरून १७५६ मध्ये सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी ते थडगे काढून तेथे सध्याचे भव्य मंदिर पुन्हा बांधले. दिशासाधन करून बांधलेल्या व पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे विषुवदिनाच्या दिवशी म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीच्या चरणावर पडतात.

कपालेश्वर आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका मंदिरातून दुसर्‍या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला हरीहर भेट सोहळा होतो. हरीहर भेट सोहळा नाशिकच्या गोदातीरावर वसलेले श्री कपालेश्वर भगवान आणि श्री सुंदरनारायण भगवान यांच्या मध्ये होतो. भगवान श्री कपालेश्वर यांच्या चांदीच्या मुखवटयाला अश्या पद्धतीने सजवले जाते की अर्धी प्रतिकृती भगवान श्री शंकराची आणि अर्धी प्रतिकृती ही भगवान श्री विष्णूची असते. भगवान श्री शंकराच्या प्रतिकृती ला भगवान श्रीविष्णूंचे गंध लावले जाते तर भगवान श्री विष्णूंच्या प्रतिकृतीला भगवान श्री शंकराचे गंध लावले जाते. श्री कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विष्णूंच्या प्रतिमेला बेल वाहला जातो तर भगवान श्री शंकराच्या प्रतिमेला तुळस वाहिली जाते. ह्या भेटी मधून श्री शिवशंकर भगवान (हर) आणि श्री विष्णू भगवान (हरी) हे वेगळे नसून एकच आहे हा संदेश दिला जातो.
कार्तिक पौर्णिमेला मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. नदीकडे उतरणार्‍या पायर्‍या आणि मंदिरावर लुकलुकणारे असंख्य दिवे बघतांना मन हरखून जाते. दिव्यांची ही आरास पेशव्यांच्या काळापासून अखंडपणे सुरु आहे. स्थापत्यशैलीचा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले सुंदरनारायण मंदिर नाशिकला भेट दिली तर आवर्जून बघितले पाहिजे असेच आहे!


The Sundarnarayan temple is built by Gangadhar Yashwant Chandrachud in 1756 at a distance of 1 km from Central Bus Stand. The entrance of the temple is to the East. The architecture is attractive and the round dome is made by little ornamental cordons. The arched recesses are impressions of Mughal sclupture. The main deity is of Lord Vishnu - also called Narayana. To the left and right are Laxmi and Saraswati respectively. Fine design is carved on the stones of the temple. On the road leading towards Godavari River there is Badarika Sangam Pond. It is said that the king of Devgiri bathed and performed rites in this pond. We also find a mention of this pond in the holy book Dnyaneshwari. One remarkable thing about this temple is that it is built at such an angle that on 21st March, rays of the rising Sun first fall exactly upon the idols.


























Monday, 28 September 2020

 #मांगी-मुंगी येथे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर भगवान #ऋषभदेव यांची १०८ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

'स्टॅच्यू ऑफ अहिंसा' या नावाने ओळखली जाणारी, काळ्या ग्रॅनाइटच्या अख॔ड दगडातली कोरलेली जगातील सर्वात उंच मूर्ती आहे.
The Statue of Ahimsa is located at Mangi-Tungi, in #Nashik. It is the tallest #Jain statue in the world.
The statue depicts the first Jain Tirthankara, Rishabhadev. The statue is 108 feet tall.



पंचप्राणांचा प्राण

सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात — ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे *अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण
आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे.माझी खात्री आहे की हा लेख संपेतोवर तुम्हि तमाम रसिक मंडळी माझ्यासारखीच ईश्वरचरणी प्रार्थना कराल की , 'हे जगन्नियंत्या करुणानिधे , पंचप्राणांच्याही या प्राणांचं तू सदैव रक्षण कर!'
चला तर मंडळी या प्रवासाला......
मूळ आडनांव हर्डिकर असणार्या परंतू गोमंतकांत मंगेशी येथे स्थायिक झालेल्या एका कुटुंबातील एका प्रतिभावान माणसाचं नुकतंच लग्न झालेलं.जोडपं रहायला गोव्यात.सुस्वरूप व ऐन बाविशीतली पत्नी रोज मंगेशीच्या मंदिरात देवदर्शनाला जायची.एक दिवस तिथल्या गुरुजींनी तिच्या हातावर तीर्थ देताना तीर्थाबरोबर गोमुखातून तिच्या हातावर तिर्थासोबत एक सुपारीहि आली.हा कसलातरी शुभसंकेत होता.तिनं हि गोष्ट पतीच्या कानावर घातली.काहि कालाने तिला दिवस गेले.प्रतिभावान् अशा त्या गृहस्थाला ज्योतिषविद्याहि अवगत होती.त्याने तिला सांगितलं , "तुझ्या पोटात जे बाळ आहे ते अत्यंत प्रतिभाशाली असेल व अखिल जगतात नांव कमावेल!ते बघण्याचं सूख तुला लाभेल , हां .... पण ते बघायला मी मात्र जिवंत असणार नाहि !"
हे ऐकून तिच्या डोळ्यांत आसू अन् ओठावर हसू होतं! यथावकाश ती प्रसूत झाली व तिला मुलगी झाली.मुलीचं नांव ठेवण्यांत आलं ह्रृदया .....या मुलीनंतर तिला पुढे आणखीन तीन मुली झाल्या व या पहिल्या चार मुलिंच्या पाठीवर एक मुलगा झाला.
मंडळी तो प्रतिभावान् गृहस्थ म्हणजे मराठी नाट्यसंगीताचे दिग्गज मास्टर दीनानाथ मंगेशकर , त्या गृहस्थाची ती पत्नी म्हणजे शुद्धमती ऊर्फ माई मंगेशकर आणि या उभयतांनी अखिल भारतालाच नव्हे तर अखिल जगताच्या संगीताला ज्या पंचप्राणांचा अमोल ठेवा दिला ते संगिताचे पंचप्राण म्हणजेच :
२८ सप्टेंबर १९२९ रोजी रात्री ९.३३ वाजता मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी) च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे जन्मलेली ह्रृदया ऊर्फ लता
७ सप्टेंबर १९३१ रोजी जन्मलेली मीना
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेली आशा
१५ डिसेंबर १९३५ रोजी जन्मलेली उषा आणि
२६ आॅक्टोबर १९३७ रोजी जन्मलेला ह्रृदयनाथ
मंडळी , आता मी तुम्हाला सांगणार आहे या पंचप्राणांचा प्राण असलेल्या लता ची हकीकत.....लौकिकार्थाने आज लता ९० वर्षांची झाली व आज तिचा वाढदिवस ! लताला उदंड निरामय आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि पुढिल भागाकडे वळतो ....
लता मंगेशकर हि एक व्यक्ति नसून ते एक संगीतक्षेत्रातलं विद्यालय आहे! — खरं तर या एवढ्या एका वाक्यातंच हा लेख संपला असं जाहिर करायला हरकत नव्हती , जर का या लेखाचा उद्देश हा लताने गेल्या ८० वर्षांत किती गाणी गायली? असा असता तर.....असंख्य संगीतकारांनी लताला घडवलं अशा वदंता ऐकल्या पण खरं तर अगणित गीतांना , गीतकारांना , संगीतकारांना , साजिंद्यांना लतानी घडवलं असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरावं...पण हा मुद्दा अलाहिदा.....
२४ एप्रिल १९४२ ला मास्टर दीनानाथ इहलोक सोडून गेले आणि तेंव्हापासून आजतागायत् लताने ह्या ७९+ वर्षांत मंगेशकर कुटुंबाला एकखांबी तंबू होऊन कसं सांभाळलंय , आभाळाएवढ्या पित्याचं छत्र हरवलेल्या लताला अकाली प्रौढ व्हावं लागलं , लताच्या विनम्र वागणुकीमागचे नियतीचे असंख्य आघात , कठीण प्रसंग सोसत तिने आत्यंतिक मायेने सांभाळलेलं घर ..... एक माणूस म्हणून लता किती उच्चस्थानी आहे ....हे सगळं तुम्हाला कळावं एवढा एकमेव उद्देश आहे या लेखाचा ! आयुष्यभर खपलेल्या या माझ्या लता माऊलीला तिच्या कष्टांचं यथायोग्य श्रेय तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्या मनाच्या गाभार्यापासून मिळावं यासाठी हा सारा खटाटोप.....
मास्टर दिनानाथ यांनी 'बळवंत संगीत मंडळी' हि नाटक कंपनी सुरु केली होती.दीनानाथ , चिंतामणराव कोल्हटकर व दिनानाथांच्या बहिणीचे यजमान कृृष्णराव कोल्हापुरे ( म्हणजे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचे वडील! ) असे तिघे या संस्थेचे पार्टनर्स होते. रणदुंदुभी सारखी गाजलेली नाटकं संस्थेने रसिकांना दिली.नंतर सिनेमायुगामुळे बळवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन हि कंपनी काढून कृष्णार्जुन युद्ध हा सिनेमा काढला.पण अगदी याचवेळी दिनानाथांची खोटि सहि करून आर्थिक व्यवहार करून दिनानाथांना व पर्यायाने कंपनीला एकानं गोत्यात आणलं.दीनानाथ व चिंतामणराव न्यायालयापुढे हजर झाले.पुढे फोर्जरी सिद्ध झाल्याने दीनानाथ निर्दोष सुटले व कालांतराने चिंतामणरावहि.पण या मानसिकतेनं दिनानाथांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला.बोलपटांचा जमाना आल्याने नाटकांना प्रेक्षक मिळेनात.मग नाटक कंपनी बंद केली. पण ते कंपनीचं प्रचंड सामान ठेवण्यासाठी धुळ्याला जागा घ्यावी लागली.सामान ठेवलेल्या जागेच्या चाव्या विश्वासाने ज्यांच्याकडे सोपवल्या त्या पाटणकरांनी विश्वासघात करत सामान हडप केलं.
नाटक कंपनी बंद झाल्यावर दीनानाथ काहि काळ गोव्यात होते व मग पुण्यात स्थायिक झाले.चरितार्थासाठी शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सुरु केले.एके काळी २०० हून अधिक माणसांचे अन्नदाते असलेल्या दिनानाथांसोबत लताहि कार्यक्रम करू लागली.मंडळी , वयाच्या दहाव्या— अकराव्या वर्षी लता बाबांबरोबर सोलापूर , पुणे , सांगली सारख्या ठिकाणी स्टेज शोज् मधून खंबावतीसारखे राग व नाट्यपदं म्हणत होती.आणि असंच दोन एक वर्ष चालल्यावर एके दिवशी अचानक दीनानाथ हा इहलोक सोडून गेले! ( २४ एप्रिल १९४२ ) .जेमतेम १३ वर्ष वयाच्या लताला ससून हाॅस्पिटलमधून परतलेल्या माईकडून — म्हणजे स्वत:च्या जन्मदात्या आईकडून ही दु:खद हकीगत जाणून घेण्यासाठी उषा व ह्रृदयनाथला स्वयंपाकघरात कोंडावं लागलं ! खेळण्या—बागडण्याच्या वयात लता अकाली प्रौढ झाली ! सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्योतिष जाणकार दिनानाथांनी सांगितल्याप्रमाणेच हे अशुभ घडलं होतं.....
सुबत्ता असताना महिनोन् महिने घरी येऊन रहाणारे नातेवाईक लुप्त झाले.दिनानाथांच्या मोठ्या फोटोपुढे बसून लता रियाझ करू लागली.....सहा एक महिन्यांनी लता १३ वर्षांची झाली त्याच दिवशी मास्टर विनायक ( म्हणजेच अभिनेत्री नंदा चे वडील. )घरी आले व त्यांनी लताला नवयुग पिक्चर्स साठी करारबद्ध केलं ! महिना ८०/— ₹ मानधनावर संसाराचा गाडा सुरु झाला.यावेळी लता कोल्हापुरात रहात होती.
१९४३ साली दिनानाथांची पहिली पुण्यतिथी साजरी केली — मास्टर विनायकांनी व अत्यंत हृद्य कंठांनी लताने तिच्या आद्य गुरुंची — दिनानाथांची आवडती नाट्यपदं त्या कार्यक्रमात म्हटली.नंतर चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मा.विनायकरावांना मुंबईत जावं लागलं आणि पर्यायानं लताला पण.माई व इतर भावंडं इंदोरला निघून गेली व लता मुंबईत आली.आणि इथेच लताच्या जीवनाला कलाटणी मिळाली.लौकिकार्थाने शालेय शिक्षण संपलं पण विनायकरावांमुळे लताने भेंडीबाजारवाले खाँ साहेब अमान अली खाँ यांचं शिष्यत्व पत्करलं.पण जेमतेम वर्षभरातंच ते तळेगांवला निघून गेल्याने लताचं हेहि शिक्षण खंडित झालं.मग लता अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे शिकू लागली.पण वर्षभरातंच तेहि गावाला निघून गेल्याने लताचं हेहि शिक्षण खंडित झालं.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या *किती हसाल* (इ.स. १९४२) ह्या मराठी सिनेमासाठी गायलं, पण हे गाणे नंतर सिनेमातून वगळलं गेलं. मास्टर विनायकांनी लताला नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) ह्या मराठी सिनेमात एक छोटीशी भूमिका दिली. ह्या सिनेमात लतानं नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी संगीतबद्ध केलेलं गाणं स्नेहप्रभा प्रधानसोबत म्हटलं.लताने वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) ह्या हिंदी सिनेमासाठी पा लागूं कर जोरी हे गाणं गायलं ( संगीतकार : दत्ता डावजेकर ). लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी सिनेमात ( बडी माँ - १९४५ ) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या सिनेमात लतानं माता तेरे चरणोंमें हे भजन गायलं.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला.पण त्याच साली मा.विनायकरावांचं निधन झाल्यानं लतावर परत पारतंत्र्य कोसळू पहात होतं.पण कुठेतरी बाबांचा आशीर्वाद कामी आला.विनायकरावांच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी लताला सूद प्राॅडक्शनचं काम मिळालं व लताने त्यांच्या एका आगामी सिनेमासाठी २—३ गाणी गायली.पण दुर्दैवाने तो सिनेमा प्रदर्शितंच झाला नाहि!
१९४७ साली लताला खरा तारणहार भेटला : संगीतकार गुलाम हैदर ! गुलाम हैदरनं लताचं गाणं ऐकलं व तो तिला निर्माते शशधर मुखर्जींकडे घेऊन गेला — जे त्यावेळी शहीद सिनेमा बनवत होते.लताचं गाणं ऐकल्यावर मुखर्जींनी *लहान मुलीसारखा लताचा आवाज असल्याचं* कारण दिलं.पण गुलाम हैदर लताला काम मिळवून देण्याचा जणू चंगंच बांधून आलेला!तो गोरेगांवहून लताला घेऊन मालाडला आला : बाॅम्बे टाॅकीज हाऊस ला.मालकीण देविकाराणी हि रशियन नवर्याबरोबर निघून गेलेली.त्यामुळे बाॅम्बे हाऊस चालवत होते अशोक कुमार आणि सावक वाच्छा .तिथे लताने मजबूर साठी मुकेशसोबत अंग्रेजी छोरा चला गया गायलं.नंतर लताला इथेच आयुष्याला कलाटणी देणारं महल मधलं 'आएगा आनेवाला' हे गाणं खेमचंद प्रकाशच्या संगीतात गायला मिळालं आणि लतासाठी यशाचा 'महल' उघडा झाला !
खेमचंद प्रकाशच्या 'आएगा आनेवाला' नं लताला 'नौशाद' नावाचं संगीताचं कोंदण मिळवून दिलं...आधी 'दुलारी' , मग 'अंदाज' मधलं 'उठाए जा उनके सितम्' गाजलं ... मग गाण्यांची 'बरसात' झाली व लता बहरत गेली.एंव्हाना माई व भावंडं पण मुंबईत आली होती व लता स्थिरावत चालली होती.
१९७६ साली आशाने लतावर लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं :
दीदीची आठवण येणारं एकंच दृष्य — पहाटेच्या गडद अंधारात आपल्या उंचीपेक्षा मोठा तंबोरा घेऊन ती गात्येय.दोन लांबलचक काळ्याभोर वेण्या जमिनीवर काळ्या नागिणीसारख्या लोळतायत ! पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या आमच्या राहत्या घरात मी , मीना उषा व बाळ एकाच रजईत झोपलोय.हि थोरली केंव्हा उठते कळतंच नाहि.हळूहळू तिच्या गोड आवाजाच्या धुंदीत मी परत झोपून जाते!
माईंनी सांगितल्याप्रमाणे मी जेंव्हा २—३ महिन्यांची होते तेंव्हा दीदी मला घेऊन खूप पळापळ करायची.तिला माझे गुबगुबीत गाल व गालावरच्या खळ्या खूप आवडायच्या.असंच एकदा मला घेऊन दीदी पळत असता पहिल्या मजल्यावरून धाडकन गडगडत खाली आली.दीदीच्या डोक्याला जबरदस्त खोक पडली.माझ्याहि डाव्या भुवईखाली लागल्यामुळे झालेला व्रण मला आजहि दीदीच्या माझ्यावरील प्रेमाची आठवण करुन देतो !
माझा जन्म झाला त्यावेळच्या पद्धतीनुसार १३ दिवस माईला किसमिस घातलेला साजूक तुपातला हलवा खायला देत असत.माई इकडे हलवा खाई व पांढर्या दुपट्यात गुंडाळलेली मी झोपलेली असायची.हे बघून जेमतेम ४ वर्षाची दीदी कळवळून जायची.असंच एकदा कळवळून दीदीने तिला आवडणार्या किसमिसचा एक दाणा माझ्या तोंडात टाकला.तो माझ्या घशात अडकला.शेवटी मला उलटं करुन पाठीत २—३ धपाटे घातल्यावर तो दाणा निघून गेला..... पण दीदीला मात्र खूप बोलणी बसली.
दीदी जिथे काम करी तिथल्या मालकाची पत्नी अतिशय गर्विष्ठ व संस्कार—मर्यादाशून्य होती.ती दीदीला खूप घालून पाडून बोलायची."भिकारीण कुठची ! कधी जन्मात चांगलं—चुंगलं खाल्लंय का ?"पण आमची दीदी संस्कारक्षम व विनयशील....तिने कधीही त्या बाईवर डूख धरला नाहि.त्या बाईचे वाईट दिवस आल्यावर दीदी कार्यक्रमाच्या माध्यमातून पैसे गोळा करून तिला पाठवत असे!
दीदीला डाॅक्टर व्हायचं होतं.पण परिस्थितीअभावी दीदीला आमच्यासाठी खस्ता खाव्या लागल्या... मी १३—१४ वर्षांची असताना शेजारच्या रेशनिंग अधिकार्याशी लग्न करून घर सोडून आले तेंव्हा दीदी खूप नाराज झाली.माझा नवरा दीदीला शिव्या देई व बदनाम करी. माझ्या नाकातून रक्त येई व मग मी बेशुद्ध होई.मला असा डिप्थेरिया झाल्याचं कळल्यावर ( तेंव्हा मी एका मुलाची आई होते व दुसरा पोटात होता! ) मला अंगात ताप होता.पण दारात बघते तो दीदी — माई , मीनाताई , उषा व बाळला घेऊन हजर ! मी "तुम्हि सगळे इथे कसे?" म्हटल्यावर दीदीने मला बघायला आल्याचे सांगितले.भरल्या डोळ्यांनी व दाटल्या कंठानी "मी मेले असते तरी चाललं असतं, पण तू इथे यायला नको होतंस!" असं म्हटल्यावर दीदी म्हणाली की "अगं वेडे , माफ करण्यात जी मजा आहे ती बदला घेण्यात नाहि!"
पुढे दुर्दैवगतीने राहत्या वस्त्रांनिशी मी मुलगा हेमंत , मुलगी वर्षा व पोटातल्या बाळासह रस्त्यावर आले ! तेंव्हा दीदीने मला भरभक्कम आधार दिला.पुढे मी प्रसूत झाल्यावर मुलाचं नाव दीदीने आनंद ठेवलं.एकवेळ मी मुलांवर चिडले तर मला दीदीची बोलणी खावी लागली आहेत ! दीदींनी मुलांचे अतोनात लाड केलेत!
दीदीमधे एक छोटीशी बाहुली लपलेली आहे.साध्या सरळ आयुष्याशी जोडली गेलेली , कुणाहि सर्वसामान्य माणसासारखीच अतिशय कमी गरजा असलेली दीदी हि एक आदर्श दीदी आहे!
मंडळी , आता मी काहि किस्से सांगणार आहे की जे ऐकल्यावर लताबद्धलचं तुमचं प्रेम व आदर द्विगुणित होईल !
पुण्याला रहायला आल्यावर 'खजांची' मधल्या गाण्यांची
एक स्पर्धा होती.लताच्या मावशीचे यजमान गोडबोले दादांनी मास्टर दीनानाथांची परवानगी न घेताच लताचं नांव त्या स्पर्धेत दाखल केले.नंतर हे कळल्यावर मास्टर दीनानाथ भयंकर चिडले व लताला म्हणाले , "आता माझे नांव घालवणार तू! जा! या स्पर्धेत पहिली ये नाहितर पुन्हा घरी येऊच नकोस!" आणि लताने खजांची मधलं गाणं म्हणून स्पर्धेत पहिलं येण्याचा मान पटकावला ! पुढे याच खजांची च्या संगीतकार गुलाम हैदरनी लताच्या आवाजाची सिनेक्षेत्रात शिफारस केली !
सोलापूरच्या नूतन संगीत थिएटरला ९ सप्टेंबर १९३९ ला रात्री जलशामधे मास्टर दीनानाथ यांच्या बरोबरीने लताने स्टेजवर पहिलं पाऊल ठेवलं ! उण्यापुर्या १० वर्षाच्या लताने तेंव्हा 'आलीरी मैं जागी' ही खंबावतीतील चीज म्हटली ! त्यानंतर ब्रह्मकुमारी मधील 'मधुमिलनात या' हे दीनानाथांचं पद म्हटलं !
१९४२ साली दीनानाथ हे जग सोडून गेले.आणि लताने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पहिली मंगळागौर सिनेमात तिनं काम केलं व बाबूराव गोखले यांनी लिहिलेलं तिचं पहिलं गाणं स्नेहप्रभा प्रधान सोबत रेकाॅर्ड झालं : 'नटली चैत्राची नवलाई'
१९४३ साल : गजाभाऊसिनेमातल्या गाण्याचं शूटिंग होतं.लताच्या अंगात १०४ डिग्री फॅरनहाईट एवढा ताप होता.त्या भर तापाच्या अवस्थेत लता शूटिंगला गेली.तिला परीचे कपडे घातलेले व पंखांना दोर्या बांधून टांगून ठेवलेले! पण ते सगळं सहन करत तिने शूटिंग पार पाडलं ! याच मराठी सिनेमात लताने आपल्या आयुष्यातलं पहिलं हिंदी गाणं गायलं : माता एक सपूतकी दुनिया
एकदा बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या गायनाचा कार्यक्रम एके ठिकाणी चालू होता.सारे श्रोते तल्लीन होते.अचानक जवळंच कुठेतरी लताचं गाणं वाजायला लागलं. 'कदर जाने ना , मोरा बालम बेदर्दी' लताचे सूर कानावर पडल्यावर खाँ साहेबांनी स्वत:ची भैरवी गाणं बंद केलं आणि ते डोळे मिटून स्वस्थपणे लताचं गाणं ऐकू लागले.गाणं संपल्यावर खाँसाहेब म्हणाले , "तौबा तौबा ! विलक्षण मुलगी , कधीच बेसूर होत नाहि.जो प्रभाव आम्हि ३ तास गायल्यानंतरहि पाडू शकत नाहि तो ती ३ मिनिटांत पाडते ! काय जबरदस्त देणगी आहे अल्लाहची !"
एकदा बाळासाहेबांनी म्हणजे पंडित ह्रृदयनाथनी अमीर खाँसाहेबांना विचारलं , "खाँसाब , दीदीके गानेके बारेमें आपकी क्या राय है?" बर्याच वेळाच्या स्तब्धतेनंतर भावनाविवश होत ते म्हणाले , "हमनें बरसो रियाज़ किया , ख़ाक किया! जो बात हम तीन घंटोंमें पैदा करतें हैं , वो सिर्फ तीन मिनटमें पैदा करती है! बाल , क्या दीवान—ए—ग़ालिब फिरसे लिखा जाएगा ? नहीं ना ? तो फिर लता जैसी आवाज ख़ुदा भी फिरसे कैसी पैदा करेगा ?"
कुमार गंधर्वांनी लतावर लिहिलेल्या लेखात लताला चित्रपटसंगीताची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हटलंय.असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो !
पंकज पुरोहित सुबीर नामक एका पत्रकाराला कुणीतरी विचारलं की "तुला जीवन व मरण कसं काय हवं?" यावर सुबीर म्हणाले , "कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मी एखाद्या निर्मनुष्य डोंगरावर बसलेला असावा.चंद्रावर कॅसेट रेकाॅर्डर ठेवलेला असावा.आणि तिथून लताजींचा आवाज हळूहळू माझ्यापर्यंत पोचावा. नीला आसमाँ सो गया! हे लताजींचं गाणं माझ्यासाठी जीवन आहे.मला जेंव्हा मृत्यू येईल तेंव्हा लताजींचा स्वर ऐकतंच यावा. कभी तो मिलेगी , कहिं तो मिलेगी , बहारोंकी मंलि राही! — हे गीत ऐकत असताना मृत्यू आला तर विचारायलाच नको !"
मंडळी हा लेख संपवण्यापूर्वी मी एक महत्वाचं विवेचन नोंदवू इच्छितो :
अनादी कालापासून एखाद्या कलाकाराने कुणाचीही लकब जशीच्या तशी साकार करून दाखवली की तो कलाकार " 'न' कलाकार " ठरतो ! ( मराठीची करामत ! — सप्रेम punch ! ) आणि आपण अशा कलाकाराचं वारेमाप कौतुकच करत आलोय ! पण ज्या कलाकाराकडून वर्षानुवर्षे शेकडो अभिनेत्रींचा प्ले बॅक दिला जातो आणि तोही अशा प्रकारे की नऊ रस अनेक वेळा पडद्यावर अभिनयातून दिसोत वा ना दिसोत पण गात्या गळ्यातून मात्र चपखल व्यक्त करणार्या लतासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराचं कौतुक करताना मात्र आपण हात थोडासा आखडताच घेतो असं मला कायम वाटत आलंय ! जगात कुणालाही सहज यश मिळत नसतं आणि तसंच लतालाही ते मिळालं नाहिये ! रात्रंदिवस मेहेनत करून तिनं अथक परिश्रमाने पंचप्राणांचं , पाच अक्षरांचं मंगेशकर कुटुंब जपलंय ! गडगंज श्रीमंती अपार कष्टानं आपल्याकडे खेचून आणली आणि तरीही लताला कधीही फार झगमगत्या पोशाखांमधे , दागदागिन्यांनी मढून गेलेली व भपकेबाज , आपल्याच तोर्यात असणारी अशी मीच काय कुणीही पाहिलेली नाहि ! कायम साधी रहाणी आणि विनम्र स्वभावाने ती वावरत आली ! कल्पना करून बघा मंडळी , पगार झाल्याच्या दिवशी तुमच्या—माझ्यासकट तमाम दुनिया कशी धुंदीत वावरते ! मग लतानं असं वागायला काय हरकत होती ? — नव्हे , तसं ती वागती तर ते अगदी नैसर्गीकच नव्हतं काय? पण ती कायम साधी सोज्वळच राहिली ! हाताच्या पाच बोटांची मूठ शक्तिशाली ठरावी तशी ती कायम कुटुंबातील पांच जणांना एकत्र बांधून अविचल राहिली ! मास्टर दीनानाथांच्या अकाली जाण्यानं वयाच्या १३ व्या वर्षापासून ती अकाली प्रौढ झाली व आज ती ९० वर्षांची झाली आहे! ७८ वर्षं ! मंडळी , ७८ वर्ष तिनं कुटुंब एकत्र ठेवलंय ! तेही सगळ्या भावंडांची आपापली संगीत साधना करत असताना त्यांना पाठिंबा देत ! तिची फोटोग्राफी उत्तम आहे , ती उत्तम नकलाकार आहे , तिला बंगाली , पंजाबी , उर्दू अशा अनेक भाषा अस्खलितपणे बोलता येतात ! ती उत्तम चित्रकार आहे ! तिला नसेल वाटलं कधी हौसमौज करावीशी ? पण ती सगळ्यांची 'दीदी' झाली व आपल्या सगळ्या हौशींना तिनं मुरडच घातली ! खेळण्या बागडण्याच्या वयापासून ती झिजत्येय , अविरत झिजत्येय ! मान्य आहे की आपल्याच कुटुंबासाठी झिजत्येय , पण त्याचा परिणाम तिनं गाण्यावर होऊ दिला का ? — तर नाहि ! आज कित्येक तपं ( १२ वर्षांचं एक तप ) लताच्या आवाजाने आपल्याला पहाटेच्या भूपाळीपासून ते रात्रीच्या अंगाई गीतापर्यंत , प्रचंड आनंदापासून ते अतीव दु:खापर्यंत आपल्या सगळ्या भावभावनांना साक्ष देणारी अनेक गाणी , श्रृंगाररसापासून ते भयावह प्रसंगांपर्यंत सगळे भाव , हुबेहूब आपल्या अंतरीच्या भावनांना वर्षानुवर्ष लताच्या आवाजानं व्यापून टाकलंय ! माझ्यासकट तमाम जनता कुठल्याही गायक—गायिकेबद्धल शेरेबाजी करायला , त्यांचं व्यक्तिगत जीवन चव्हाट्यावर मांडायला उत्सुक असतात , का ? तर त्या सार्वजनीक प्रसिद्ध व्यक्ति म्हणून ? आपल्या चुका जाहीरपणे कुणी मांडल्या तर आवडेल आपल्याला ? नाही ना ? मग जी गोष्ट आपल्याबाबत इतरांनी करु नयेसं आपल्याला वाटतं तीच गोष्ट आपणही अशा व्यक्तींच्या बाबत करु नये असं मला प्रामाणिकपणाने वाटतं ! लताच्या जीवनातल्या अनेक खाचखळगे जसे मला माहित आहेत तसे तुम्हालाही माहित आहेत ! पण आज तिच्या वाढदिवशी किंबहुना कधीही ते आपण मांडू नयेत असं मला वाटतं ! लतासारखे कलाकार हजारो वर्षांतून एकदा जन्म घेतात ! आपण भाग्यवान आहोत की आपण अशा देशात जन्म घेतला जिथे लताच्या आवाजाने दिवस उगवतो व तिच्याच लोरीने आपल्या घरातली तान्हि बाळं झोपी जातात ! लता , आम्हि धन्य झालो की तुझ्या सूरमयी आवाजाच्या टाॅनिकवर लहानाचे मोठे झालो! आणि याच तुझ्या आवाजाशी व तुझ्या या अनुपम सुरावटींच्या बरसातीशी आम्हाला आमरण कृतज्ञ राहू देत !—हीच त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडे प्रार्थना !
मंडळी लता गाते तसंच ती एक उत्कृष्ट नकलाकार आहे.एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहे.तशीच एक उत्कृष्ट चित्रकारहि आहे!
मंडळी , लताच्या भावना मास्टर दिनानाथांविषयी 'कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला!' अशा असल्या तरी या लतामाऊलीनं मंगेशकर कुटुंबियांसाठी केलेला त्याग पाहता असं म्हणावसं वाटतं की "कल्पवृक्ष कन्यारूपी लावुनिया बाबा गेला!"
लताने एकूण किती गाणी गायली , कुणासाठी गायली , किती पुरस्कार मिळवले हे सांगणारे कितीतरी लेख झाले असतील व तिच्या असामान्य कर्तृत्वामुळे इथून पुढेहि होतंच रहातील.पण एक माणूस म्हणून लता हि एक सह्रृृदय वात्सल्यमूर्तीच आहे आणि हे तिचं प्रेमळ रूप जे मला भावलं ते तुमच्यापर्यंत पोचवावं एवढा एकमेव उद्देश मनात ठेऊन हे लिहायचं साहस केलंय ! सगळ्यांना दीदी म्हणून लताला आदरार्थी एकेरी न संबोधणार्या तमाम रसिक लोकांच्या मनाविरूद्ध मी लताचा उल्लेख एकेरी केलाय , करतोय आणि कायम एकेरीच करत रहाणार ..... कारण आईला कुणी अहो जाहो करतं का हो ?
हे जगन्नियंत्या परमेश्वरा , मंगेशकर कुटुंबातील पंचप्राणांचाहि प्राण असणार्या या माझ्या माऊलीला निरामय आरोग्य दे , तिच्यातील लहान मूल जे मिश्किल हसतं , हुबेहुब कुणाच्याही नकला करतं , निरागस हसतं — ते चिरंतन लहान राहूदे आणि तिला आज तिच्या ९० व्या वाढदिवशी देतोय.
(सदर लेख व्हाॅटस् अप फाॅरवर्ड आहे. त्यामुळे लेखकाचे नाव देता आले नाही. कुणाला माहिती असल्यास कळवावे म्हणजे योग्य ती दुरूस्ती करता येईल).

 

Wednesday, 23 September 2020

 

कसारा घाट

कसारा घाटाचे नयनमनोहर विहंगम दृष्य
Beautiful Aerial View of Kasara Ghat


PC : @AhireSushil

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....